Monsoon Care Tips for Diabetics | मधुमेहींनी पावसाळ्यात काय काळजी घ्यावी? 
आरोग्य

Monsoon Care Tips for Diabetics | मधुमेहींनी पावसाळ्यात काय काळजी घ्यावी?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संतोष काळे

पावसाळा हा ऋतू प्रत्येकासाठीच आल्हाददायक असतो, मात्र मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हा काळ आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतो.

दमट वातावरण आणि दूषित पाणी यांमुळे मधुमेही रुग्णांना पायांचे गंभीर संसर्ग होण्याचा धोका कैक पटींनी वाढतो. रक्तातील साखरेचे अनियंत्रित प्रमाण आणि पायांची दुर्लक्षित स्वच्छता यांमुळे लहानशी जखमही मोठ्या समस्येचे रूप घेऊ शकते. पावसाळ्यातील दूषित पाण्यातून जीवाणू किंवा बुरशीजन्य संसर्ग झाल्यास तो थेट हाडांपर्यंत पोहोचण्याचा आणि गँगरीन होण्याचा धोका असतो. त्यामुळे रुग्णांनी दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपले पाय, विशेषतः बोटांमधील फटी आणि तळपाय व्यवस्थित तपासावेत. तळपाय पाहण्यासाठी आरशाचा वापर करावा. कुठेही लालसरपणा, सूज, ओरखडा किंवा पांढरी पडलेली त्वचा दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

पाऊस किंवा घामामुळे पाय ओले झाल्यास ते स्वच्छ पाण्याने आणि जंतुनाशक साबणाने धुवावेत. त्यानंतर मऊ टॉवेलने पाय पूर्णपणे कोरडे करावेत. बोटांच्या दरम्यान असलेला ओलावा बुरशीला आमंत्रण देतो, म्हणून तिथे अँटी-फंगल पावडरचा वापर करावा. मात्र, बोटांच्या फटींमध्ये मॉइश्चरायझर लावणे टाळावे. पावसाळ्यात कधीही उघड्या पायाने किंवा चपलांशिवाय चालणे टाळावे. घरातही चपला वापराव्यात. प्लास्टिक किंवा रबराच्या घट्ट चपलांमुळे पायाला फोड येऊ शकतात. त्यामुळे वॉटरप्रूफ, मऊ आणि पायाला पूर्ण संरक्षण देणारे बूट वापरावेत. बूट घालण्यापूर्वी ते आतून कोरडे आहेत की नाही, याची खात्री करून घ्यावी.

पायाला घाम येऊ नये म्हणून नेहमी स्वच्छ आणि सुती सॉक्स वापरावेत. ओले झालेले सॉक्स जास्त वेळ घालून ठेवल्यास संसर्ग वेगाने पसरतो. मधुमेही रुग्णांनी पायाची नखे कापताना ती जास्त खोलवर कापू नयेत, कारण नखांच्या कोपर्‍यात जखम होऊन इन्ग्रोन नेलचा संसर्ग होऊ शकतो. पायाला कोणताही फोड आला, त्वचा काळी पडू लागली, जखमेतून पू येऊ लागला किंवा पायाला सूज येऊन ताप आला, तर घरगुती उपाय न करता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT