आरोग्य

दुधामधील भेसळ आणि आरोग्य | पुढारी

Pudhari News

डॉ. अविनाश भोंडवे 

दुधातील भेसळीचे तीन मुख्य प्रकार सापडतात. पहिला म्हणजे अशुद्ध पाणी मिसळणे, दुसरा वेगवेगळ्या प्रकारची रसायने आणि काही अयोग्य पदार्थ मिसळणे आणि तिसरा प्रकार म्हणजे बेकायदेशीररीत्या बनवलेले रासायनिक दूध.

मानवी जीवनात जन्मापासूनच मातेच्या दुधाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नवजात बालकाचे पोषण ते एक वर्षाचे होईपर्यंत मातेच्या स्तनपानावरच मुख्यत्वे होत असते. त्यानंतरसुद्धा आयुष्यभर दूध हा आपल्या आहाराचा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. दुधातून आपल्याला शरीराच्या वाढीसाठी अत्यावश्यक असलेले प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोदके, कॅल्शियम असे प्रमुख अन्‍नघटक तर मिळतातच; पण  अ, बी6, बी12, क, ड, इ, के, थायमिन, बायोटिन, रायबोफ्लेवीन, फॉलिक अ‍ॅसिड, पँटोथेनिक अ‍ॅसिड अशी शरीराला अत्यंत जरूरीची अशी जीवनसत्त्वेदेखील मिळतात आणि त्यामुळेच मानवी जीवनात दूध हे एका प्रकारे जीवनदायी अमृतच ठरते; पण हेच अमृत, फक्‍त पैसा मिळवण्यासाठी, नीतिमत्तेची आणि कायद्याची कदर न बाळगणार्‍या आणि त्यात भेसळ करणार्‍या नराधमांच्या हातात पडते, तेव्हा मानवी मूल्यांना पायदळी तुडवणार्‍या या राक्षसांच्या कृत्यांनी हे अमृत, जीवन समृद्ध करणारे निर्भेळ आणि शुद्ध राहत नाही, तर रोगांच्या, दुर्धर आजारांच्या आणि प्रसंगी मृत्यूच्या खाईत लोटणारे विष ठरू शकते. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेने केलेल्या अभ्यासात दूधभेसळीमुळे क्षयरोग होत असल्याचे दिसून आले आहे. 

दुधातील या भेसळीचे तीन मुख्य प्रकार सापडतात. पहिला म्हणजे अशुद्ध पाणी मिसळणे, दुसरा वेगवेगळ्या प्रकारची रसायने आणि काही अयोग्य पदार्थ मिसळणे आणि तिसरा प्रकार म्हणजे बेकायदेशीररीत्या बनवलेले रासायनिक दूध.

पाण्याची भेसळ

एक लिटर दुधाचे दीड लिटर करण्यासाठी त्यात पाणी मिसळले जाते. आपल्या देशात अजूनही बर्‍याच भागात गवळ्यांमार्फत हंडा, घागर, चरव्या किंवा अल्युमिनियमच्या बरण्यांमधून दूध पुरवले जाते. साहजिकच, या दुधाची कुठलीही तपासणी होत नसल्याने त्यात मिळेल ते पाणी मिसळले जाते. हे पाणी तळ्याचे, नदीचे किंवा हातपंपाचे असते. बिहार आणि झारखंड या राज्यात शासकीय आणि सहकारी संस्थांचे दुधाचे टँकर अंशतः रिकामे करून त्यात हातपंपाचे आणि वेळप्रसंगी डबक्यातील पाणी भरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुग्ध संस्थांनी हे टँकर सीलबंद न केल्यामुळे हे प्रकार घडतात. या संबंधातली नियमावली करूनही हे प्रकार घडत असतात. पुण्या-मुंबईत प्रसिद्ध संस्थांचे पॉलिथिन बॅगमधील दूध इंजेक्शनच्या सिरिंजने काढून त्यात पाणी भरण्याचे असंख्य प्रकार उघडकीला आले आहेत; पण ते राजरोसपणे चालू असतातच.

अशुद्ध पाण्याच्या भेसळीमुळे दुधातील सत्त्वांश कमी तर होतोच; पण टायफॉईड, जुलाब-उलट्या, कावीळ, जंत, आतड्यांचे विकार, सिस्टोसोमियासिस, नारू असे आजार होतात आणि त्यांच्या साथीदेखील मोठ्या प्रमाणात पसरू शकतात.

रासायनिक पदार्थांची भेसळ

डिटर्जंट – पाणी मिसळलेले दूध घट्ट दिसावे यासाठी त्यात साबणाचे आणि डिटर्जंटचे मिश्रण केले जाते. यामध्ये युरिया, कॉस्टिक सोडा, फॉरमॅलिन असे रासायनिक घटक असतात. या रसायनांमुळे अत्यंत गंभीर स्वरूपाची विषबाधा होऊन प्रमाणाबाहेर उलट्या-जुलाब होऊन माणसे दगावू शकतात. हे पदार्थ अतिशय तीव्र अल्कली असल्याने शरीरातली जीवनावश्यक प्रथिने नष्ट होऊन स्नायू आणि मांसपेशींना तीव्र इजा होऊ शकते व हाता-पायांना कायमचे पंगुत्व येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर, अन्‍ननलिकेचे, जठराचे व आतड्यांचे अल्सर, हृदयविकार, कर्करोग असे दुर्धर आजार नशिबी येतात.

युरियासारख्या विषारी पदार्थामुळे मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात आणि मेंदूच्या चलनवलन क्रियेत घातक गोष्टी घडू शकतात.

कॉस्टिक सोडा हा उच्च रक्‍तदाब आणि हृदय विकाराच्या रुग्णाला मृत्यूच्या दारात उभा करू शकतो.

फॉरमॅलिन – दूध न नासता जास्त काळ टिकावे म्हणून त्यात हा विषारी पदार्थ मिसळतात. फॉरमॅलिनसारख्या विषारी रासायनिक संयुगामुळे यकृताचे आणि मूत्रपिंडाचे असाध्य विकार उद्भवतात. अशा प्रकारचे भेसळयुक्‍त दूध शाळेत दिले गेल्यामुळे 2009 मध्ये पूर्व भारतातली 6 मुले मृत्युमुखी पडली होती. तर, 60 मुले गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावी लागली होती.

अमोनियम सल्फेट – पाण्याच्या भेसळीमुळे पातळ झालेल्या दुधामध्ये तपासणीसाठी लॅक्टोमीटर टाकला तर ते लास्कात येऊ नये म्हणून अमोनियम सल्फेट टाकतात. या पदार्थांमुळेदेखील उलट्या-जुलाबासारखे आतड्यांचे, मूत्रपिंडाचे आणि रक्‍तातील घटकांचे विकार उद्भवतात.

आम्ले (अ‍ॅसिड्स) – दूध जास्त काळ टिकावे म्हणून वेगवेगळी विषारी आम्ले त्यात मिसळली जातात. बेंझोईक अ‍ॅसिड, सॅलीसायलिक अ‍ॅसिड ही यामध्ये येतात. यांच्यामुळे उलट्या-जुलाब, अल्सर्स, मूत्रपिंडे, यकृताचे असाध्य आजार असे त्रास संभवतात.

स्टार्च-साखर-तवकील – हे पदार्थ दूध जास्त घट्ट दिसावे म्हणून मिश्रित केले जातात. यांच्यामुळे फार गंभीर आजार जरी होत नसले, तरी दुधातील सत्त्वांश कमी होतो आणि मिसळलेल्या दूषित पाण्याचे सर्व विकार सहज व्हायरल व्हायला ते मदत करतात. एकूण काय, तर ही भेसळसुद्धा आरोग्याला अपायकारकच ठरते.

मेलामाइन – 2008 मध्ये चीनमध्ये झालेल्या या पदार्थाच्या दुधातील भेसळीमुळे जगभर हाहाकार उडाला होता. खरं तर प्लास्टिक कारखान्यात वापरली जाणारी ही पावडर. भरपूर पाणी घातलेल्या दुधामध्ये मिसळल्यावर तिच्यामुळे दुधातली प्रथिने जास्त दिसतात आणि पाण्याची भेसळ लपून जाते. पण, यामुळे मूत्रपिंडात खडे निर्माण होतात. चीनमध्ये ही प्रक्रिया अवैधपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर घडली. त्यामुळे हजारो लहान मुले मूत्रपिंडाच्या, डोळ्यांच्या, त्वचेच्या अनोख्या विकारांनी आजारी पडली. त्यातली कित्येक दगावली. तिथल्या प्रसिद्ध दुधाच्या पावडरीमध्ये, बेबी फूड्समध्येही भेसळ सापडली.  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT