Migraine Vs Brain Tumor pudhari
आरोग्य

Migraine Vs Brain Tumor: साधी डोकेदुखी (मायग्रेन) की ब्रेन ट्युमर... फरक कसा ओळखायचा; कधी करायची टेस्ट? वाचा डॉक्टरांचा सल्ला

Anirudha Sankpal

Migraine Vs Brain Tumor: डोकेदुखी ही अत्यंत सामान्य समस्या असली, तरी ती वारंवार होऊ लागल्यास अनेकांच्या मनात थेट 'ब्रेन ट्युमर'ची (Brain Tumor) शंका डोकावू लागते. 'वर्ल्ड ब्रेन ट्युमर डे २०२६' च्या पार्श्वभूमीवर यशोदा मेडिसिटीचे सीनियर कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. लव बन्सल यांनी या दोन्हींमधील शास्त्रीय फरक स्पष्ट केला आहे. त्यांच्या मते, वारंवार होणारी बहुतेक डोकेदुखी ही मायग्रेनच असते, परंतु खालील लक्षणांवरून तुम्ही यातील फरक समजू शकता:

१. मायग्रेन (Migraine - साधी डोकेदुखी) कशी ओळखायची?

स्वरूप: मायग्रेन हा मेंदूच्या कार्यपद्धतीत होणाऱ्या बदलांमुळे होणारा त्रास आहे, यात मेंदूची कोणतीही अंतर्गत रचना खराब झालेली नसते.

दुखण्याचा पॅटर्न: यात डोक्याच्या एका बाजूला तीव्र किंवा ठणकल्यासारख्या (Throbbing) कळा येतात. हा त्रास साधारणपणे ४ ते ७२ तास राहू शकतो.

इतर लक्षणे: मायग्रेनमध्ये डोकेदुखीसोबत मळमळणे, उलट्या होणे, प्रकाश किंवा आवाजाचा त्रास होणे (Sensitivity) अशी लक्षणे दिसतात.

दृष्टीवर परिणाम: काही रुग्णांना डोळ्यांसमोर चमकणारे दिवे, नागमोडी रेषा दिसणे किंवा अंधारी येणे (Visual Aura) असा त्रास होतो.

महत्त्वाचा फरक: मायग्रेनची डोकेदुखी ठराविक काळाने कमी-अधिक (Episodic) होते. दोन अटॅकच्या मधल्या काळात व्यक्ती पूर्णपणे सामान्य असते.

२. ब्रेन ट्युमरची डोकेदुखी कशी वेगळी असते?

ब्रेन ट्युमर हा मेंदूतील गाठीमुळे निर्माण होणारा आजार आहे, जो मेंदूच्या ऊतींवर (Tissues) दबाव निर्माण करतो.

दुखण्याचा पॅटर्न: ट्युमरची डोकेदुखी अचानक येऊन थांबणारी नसते, तर ती सतत राहते आणि काही आठवडे किंवा महिन्यांत हळूहळू अधिक तीव्र (Progressive) होत जाते.

वेळ आणि कारण: ही डोकेदुखी सहसा सकाळी उठल्यावर जास्त तीव्र असते. खोकल्यामुळे, शिंकल्यामुळे किंवा वाकल्यामुळे डोक्यावरील दाब वाढून ही डोकेदुखी अधिक वाढते.

अचानक येणारे झटके: प्रौढ वयात पहिल्यांदाच फिट्स किंवा मिर्गीचे झटके (Seizures) येणे हे ट्युमरचे लक्षण असू शकते.

३. 'ब्रेन ट्युमर'चे इतर धोक्याचे संकेत (Warning Signs):

  • सकाळी उठल्या उठल्या मळमळ न होता थेट उलटी होणे.

  • शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा किंवा लुळेपणा जाणवणे.

  • बोलताना अडखळणे किंवा बोलण्यात अडचण येणे.

  • व्यक्तीच्या स्वभावात किंवा व्यक्तिमत्त्वात अचानक मोठा बदल होणे.

  • डोळ्यांच्या तपासणीत 'पॅपिलोएडेमा' (ऑप्टिक डिस्कला सूज येणे) आढळणे.

कधी करावी तपासणी?

मायग्रेन हा आजार खूप सामान्य आहे आणि त्या तुलनेत ब्रेन ट्युमरचे रुग्ण अत्यंत दुर्मिळ असतात. त्यामुळे केवळ भीतीपोटी निष्कर्ष काढू नका. मात्र, खालील 'रेड फ्लॅग्ज' (Red Flags) दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने MRI किंवा न्यूरोइमेजिंग चाचणी करणे आवश्यक आहे:

  • १. वयाच्या ५० वर्षांनंतर पहिल्यांदाच तीव्र डोकेदुखी सुरू झाली असल्यास.

  • २. डोकेदुखीच्या नेहमीच्या पॅटर्नमध्ये अचानक मोठा बदल झाल्यास.

  • ३. डोकेदुखीसोबत शरीरात काही न्यूरोलॉजिकल कमजोरी (अशक्तपणा, बोलण्यात बदल) जाणवल्यास.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT