आरोग्य

म्हाळुंग : एक दिव्य वनस्पती

Pudhari News

उमाकांत राणिंगा

भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून विज्ञानाच्या अनेक शाखांची प्रगती झाली होती. सर्व जगाला मार्गदर्शक ठरेल, अशी शस्त्रे भारतात शिकवली जात होती. आयुर्वेद या विद्याशाखेचा भारतीयांनी अतिशय सखोल अभ्यास केला होता. दुर्दैवाने अतिशय कष्टाने भारतीय विद्वानांनी संपादित केलेले हे ज्ञान विदेशात गेले. आपल्या ग्रंथातील संदर्भ म्हणजे कपोकल्पित पुराणकथा आहेत, ही समजूत द‍ृढ करून परकीयांनी त्या ज्ञानावर स्वत:च्या संशोधनाचे लेबल लावले. वास्तविक पाहता सध्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनेक औषधांच्या रचनेचे मूळ भारतीय आयुर्वेद शास्त्रात असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

मधरं मातुलुंग तु शीतं रूचिकर मधु ।

गुरु वृष्यं दुर्ज्जरं च स्वादिष्टं च त्रिदोषनुत ॥

पित्तं दाहं रक्‍तदिषान्विबंधश्‍वास्वकासकान ।

क्षयं हिक्‍कां नाशयेश्‍च पूर्वरेवमुदाहृतम् ॥

अर्थ – गोड म्हाळूंग हे शीतल, रुचिकारक, मधुर, भारी (जड) वीर्यवर्धक, दुर्जर, स्वादिष्ट तसेच त्रिदोष, पित्त, दाह, रक्‍तसंबंधित विकार, मलबंध, श्‍वासविकार, खोकला, क्षय आणि उचकी दूर करते.

म्हाळूंग हे अत्यंत गुणकारी फळ अशा दुर्लक्षित वैभवापैकीच एक आहे. या फळाची विविध भाषांतली केवळ नावे जरी पाहिली, तरी या औषधी वनस्पतीच्या महत्त्वाची जाणीव होते. संस्कृतमध्ये याला मातुलुंग म्हणतात. हिंदीत बीजफल किंवा बिजौरा या नावाने हे फळ परिचित आहे. सायट्रस मेडिका या पारिभाषिक नावाने परिचित अशा या फळाचे इंग्रजीतील अ‍ॅडम्स अ‍ॅपल हे नाव अतिशय समर्पक आहे. मानवी प्रजात्पतीसाठी आदीकरण ठरलेल्या या वनस्पतीची महती इस्लाम तसेच ख्रिश्‍चन व यहुदी या संस्कृतीने गौरवलेली आहे. भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये पण आदिशक्‍ती किंवा जगत्जननी या स्वरूपाच्या देवीच्या हातामध्ये हे फळ देवीने धारण केले आहे. कोल्हापूरची अंबाबाई म्हणजेच आदिशक्‍ती. तिच्या उजव्या हातात हे फळ धारण केलेले असून धर्मशास्त्राप्रमाणे या फळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर जैन मूर्तीशास्त्रात चोवीस तीर्थंकरांचे चोवीस यक्ष आणि चोवीस यक्षिणींपैकी तीस मूर्तींच्या हातात हे फळ असल्याचे उल्लेख पाहायला मिळतात. गणेश उपासनेत महागणपती या गणेशाच्या हातात पण म्हाळूंग आहे, तर आपल्या परंपरातील अनेक देव, देवतामूर्ती म्हाळूंग धारण केलेल्या पाहायला मिळतात. जगभरातील भिन्‍न भिन्‍न संस्कृतीमध्ये देव मूर्तींना हे फळ धारण केलेले दाखवले जाते. यामागे या वनस्पतीच्या महत्त्वाच्या औषधी गुणधर्माचे प्रतीक आहे.

आयुर्वेदाच्या अनेक प्राचीन तसेच अर्वाचीन ग्रंथात या वनस्पतीच्या विविध औषधी गुणधर्माचे वर्णन पाहायला मिळते. 'बृहत्निघंटु रत्नाकर' या ग्रंथमालिकेतील 'शालीग्राम निघंटु' या ग्रंथात म्हाळुंगाच्या विविध औषधी उपयोगाबाबत सविस्तर माहिती पाहायला मिळते. महाराष्ट्रातील जुन्या पिढीतील आयुर्वेद महामहोपाध्याय म्हणून गौरवल्या गेलेल्या शंकर दाजीशास्त्र पदे यांच्या 'वनौषधी गुणादर्श' या 1893 साली रचलेल्या ग्रंथात म्हाळूंग हे फळ बावीस प्रकारच्या आजारावर औषधी म्हणून गुणकारी असल्याचे म्हटले आहे. यातील सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे गर्भधारणेच्या प्रक्रियेमध्ये निर्माण झालेले अडथळे दूर करून सुलभ प्रसूतीसाठी केला जाणारा उपयोग होय. याशिवाय वेदनाशामक म्हणूनसुद्धा हे फळ गुणकारी आहे. या फळाच्या मुळामध्ये व सालीमध्येसुद्धा औषधी गुणधर्म आहेत. ही वनस्पती जगभर पाहायला मिळत असली, तरीही आपल्याकडे मात्र औषधी म्हणून तिचा वापर कमीच केला जातो. किंबहुना या फळाकडे श्री अंबाबाईला अर्पण करण्याचे फळ म्हणून धार्मिक महत्त्वच जास्त दिले गेलेले पाहावयास मिळते. वात, पित्त आणि कफ या तीनही प्रवृत्तीचे संतुलन करणारे हे फळ असून गुजरात आणि राजस्थानात याचे लोणचे आहारात वापरले जाते.

या वनस्पतीच्या अनेक औषधी गुणांचा अभ्यास व संशोधन होणे गरजेचे आहे. यातून प्राचीन भारतीय आयुर्वेदाला ज्ञात असलेली अनेक रहस्ये उलगडण्यास मदत होईल.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT