डॉ. प्राजक्ता पाटील
धावपळीच्या आयुष्यात तणाव हा शब्द आणि अनुभव प्रत्येकाच्या वाट्याला कधीतरी येत असतो. तणाव नोकरीतील कामाचा असो किंवा घरातील समस्यांमुळे आलेला असो, तणावाचा शरीरावर नकारात्मकच परिणाम होतो. शरीराच्या विविध क्रियांवर तणावाचा परिणाम होत असतो. तणावामुळे पोटही बिघडू शकते, असे सांगितले तर विश्वास बसणे कठीण आहे; परंतु हे खरे आहे, की तणावामुळे पचनक्रियेवर नकारात्मकच परिणाम होतो आणि पचनक्रिया अस्वस्थ होते. पोटाची भट्टी बिघडली, की अनेक आजार शरीरात शिरकाव करायला तयारच असतात.
तणाव किंवा टेन्शन घेण्याची सवय आपल्यासाठीच घातक आहे. त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. पोटावरही तणावाचा विपरीत परिणाम झाल्याने पचनक्रियाही विस्कळीत होते. त्यामुळेच व्यक्ती आजारांना बळी पडतो.
सध्याच्या काळात तणाव हा आयुष्याचाच एक भाग झालेला आहे. करिअर, नोकरीची सुरक्षा, कुटुंबाच्या वाढत्या जबाबदार्या, वेळेची कमतरता, नात्यांमधील दुरावा आणि एकटेपणा आदी सर्वच गोष्टींचा आपल्या मेंदूवर दबाव वाढतो. जीवनात तणावाचा शिरकाव होतो. तणावाचा परिणाम केवळ मानसिक आरोग्यावर होतो असे नाही तर इतरही अनेक अडचणी निर्माण होतात. पचनक्रियेवर तणावाचा सर्वाधिक आणि नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे बद्धकोष्ठता, पोटात वायू होणे, घशाशी येणे, पित्त होणे सारखे त्रास होतात. त्याचा परिणाम अर्थातच शरीरावर दिसून येतो. अशक्तपणा येतो, वजन घटते किंवा अनियंत्रित वाढते.
आपल्या शरीरातील मेंदू आणि आतडे यांचा सतत एक संवाद सुरू असतो. हा संबंध शरीरातील गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टमला तणाव आणि भावनात्मक प्रतिक्रियांसाठी संवेदनशील करतो. आपण जेव्हा तणावात असतो तेव्हा मेंदू शरीराला अॅड्रेनालाईन सेरोटोनिन नावाचे हार्मोन जे आपल्या मनोवस्था किंवा मनोभावनांवर प्रभाव टाकत असते तसेच ते पचनसंस्थेतही मिळते, त्याचे उत्पादन करण्याच्या सूचना पाठवतो. त्याचबरोबर कार्टिसोल हार्मोन्सचा स्राव होतो. ही दोन्ही हार्मोन्स परस्परविरोधी प्रतिक्रिया निर्माण करू शकतात. पोटात रक्त आणि ऑक्सिजनच्या प्रवाहात कमतरता निर्माण करतात, आतड्यांतील जीवाणूंचे असंतुलन आणि आतड्यांमध्ये सूज येण्यास कारण ठरू शकते. ही लक्षणे भविष्यात गॅस्ट्रो इन्टेस्टायनल विकारांना जसे इरिटेबल बाऊल सिंड्रोम, पेप्टिक अल्सर किंवा पचनसंस्थेचे इतर आजार यांना आमंत्रण देऊ शकते. एखाद्या व्यक्तीमध्ये सतत पचनाची समस्या होत असेल, तर त्या व्यक्तीला इतरही काही आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सेवन केलेले अन्न योग्य प्रकारे न पचल्यामुळे इतर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. जेवण योग्य प्रकारे न पचल्याने इतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील एक समस्या सर्वसाधारणपणे भेडसावते ती म्हणजे बद्धकोष्ठता. त्यामध्ये पोटदुखीचा त्रास होतो. पोटदुखीने त्रस्त व्यक्तीला दिवसातून अनेकदा शौचाला जावे लागते. परंतु, पोट साफ न होण्याची समस्या सातत्याने भेडसावते. पोटात वायू होण्याची समस्या देखील भेडसावते.
अनेकदा पोटात वायू झाल्याने तीव्र डोकेदुखी म्हणजे मायग्रेनची समस्या निर्माण होऊ शकते. त्याव्यतिरिक्त ब्लॉटिंगची समस्याही भेडसावते. त्यामध्ये पोटात पाणी किंवा गॅस साठू लागतो. त्यामुळे पोट फुगते. अशक्तपणा, वजन कमी होणे किंवा वाढणे आदी समस्या खराब पचन समस्येमुळे निर्माण होतात. पोटाची अशी अवस्था दीर्घकाळ राहिली, तर अशा रुग्णांना अशक्तपणा जाणवतो, तसेच शारीरिक वजनही अधिक प्रमाणात कमी होण्याची शक्यता वाढते. तणावात असलेली व्यक्ती अतिआहार सेवन करते, साहाजिकच वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो, तसेच अन्न घशाशी येणे किंवा पित्त होणे याचाही तणावाशी थेट संबंध आहे. आतड्यांमधील अॅसिड जेव्हा बाहेर येते तेव्हा घशाशी येण्याचा त्रास होतो. त्यामुळे छातीत जळजळ होण्याचा अनुभवही येतो. तणाव कमी करण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो. सर्वप्रथम एक सवय लावून घ्या ती म्हणजे नियमित व्यायाम करण्याची सवय लावून घ्यावी. तणाव कमी करण्यासाठी व्यायामाचा खूप फायदा होतो.
त्याव्यतिरिक्त पोटाच्या आतले अवयव मजबूत करण्यासाठी व्यायामाची मदत होते. तणाव व्यवस्थापन करणे हेदेखील महत्त्वाचे आहे. शक्य असेल तर तणाव घेणे टाळावे. लोकांमध्ये मिसळावे, विविध उपक्रमांत सहभागी व्हावे. पुरेशी झोप मिळणेही गरजेचे आहे. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. पोटाची स्थिती किंवा पचन स्थिती चांगली राहाण्यासाठी तेलकट, तळलेले, जड आणि मसालेदार पदार्थ तसेच जंक फूड खाणे टाळावे. मद्यपान तसेच कॅफीनयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळावे. मका, गहू तसेच ग्लुटोन, अंडी, सोया आणि दूध यांच्यापासून केलेले पदार्थ सेवन करणे टाळावे. डबाबंद खाद्यपदार्थ, लाल मांस, रिफाईंड साखर आणि कृत्रिम गोडवा असलेले पदार्थ आहारात घेणे टाळावे. शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, अननस, जांभूळ, दाणे, मोडाची धान्ये, मसूर, अक्रोड आदींचे सेवन करणे गरजेचे आहे.
दैनंदिन जीवनात करा या गोष्टी
* शक्यतो तणाव येऊ नये यासाठी प्रयत्न करा.
* तेलकट, तळलेले, मसालेदार पदार्थ तसेच जंक फूड खाणे टाळावे.
* मद्यपान तसेच कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
* नियमित व्यायामाची सवय करून घ्यावी. आणि सकारात्मक राहाण्याचा प्रयत्न करा.
* योग आणि ध्यानधारणा यांच्या मदतीने तणावाची पातळी कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
* डब्बाबंद खाद्यपदार्थ, लाल मांस, रिफाईंड शुगर, कृत्रिम गोडपणा देणारे पदार्थ आहारात समाविष्ट करू नयेत.