डॉ. पायल नारंग
वाढत्या वयानुसार महिलांमध्ये मासिक पाळीतील बदल, पोट फुगणे, ओटीपोटात दुखणे किंवा रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव होणे अशी लक्षणं आढळतात. अनेकदा ती ‘वयामुळे होत असेल’ असे म्हणून दुर्लक्ष केले जाते. काही वेळा ही लक्षणे किरकोळ कारणांमुळेही असू शकतात; मात्र ती वारंवार होत असतील किंवा नेहमीपेक्षा वेगळी जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करणे भविष्यात गंभीर रूप धारण करू शकते.
पोट सतत फुगत असेल, तर ते अपचन किंवा गॅसमुळे होत असल्याचे गृहीत धरले जाते. ओटीपोटात अस्वस्थता जाणवत असेल तर ती वय वाढण्यासोबत येणारी सामान्य समस्या असल्याचे मानले जाते. रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव झाला तरी तो हार्मोन्समधील बदलामुळे झाला असे समजून दुर्लक्ष केले जाऊ शकते. मात्र, काही वेळा शरीरातील हे बदल एखाद्या गंभीर समस्येचे संकेत असू शकतात. गर्भाशय, गर्भाशयमुख, अंडाशय, योनी किंवा बाह्य जननेंद्रियाच्या कर्करोगांमध्ये अशी काही लक्षणे दिसू शकतात, जी सामान्य हार्मोनल किंवा पचनाशी संबंधित समस्यांसारखी वाटू शकतात. त्यामुळे आपल्या शरीरातील नेहमीच्या पद्धतीपेक्षा काही वेगळे जाणवत असल्यास वेळीच वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
मासिक पाळीतील रक्तस्रावामध्ये अचानक झालेला बदल हे महत्त्वाचे संकेत असू शकतात. मासिक पाळी नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात होणे, जास्त दिवस सुरू राहणे किंवा दोन पाळींमध्ये रक्तस्राव होणे असे बदल नव्याने जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा रक्तस्रावामागे कर्करोगाशिवाय इतर कारणेही असू शकतात; मात्र त्यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक असते. कधीतरी पोट फुगणे ही सामान्य बाब आहे. मात्र, सतत पोट फुगणे, ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे अथवा थोडेसे खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटणे ही लक्षणे वारंवार होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे नव्याने सुरू झाली असतील, वारंवार होत असतील किंवा त्यांची तीव्रता हळूहळू वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
ओटीपोटात वेदना होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. गर्भाशयातील सिस्ट, एंडोमेट्रिओसिस, संसर्ग किंवा पचनाशी संबंधित समस्यांमुळेही अशा वेदना होऊ शकतात. मात्र, कोणतेही स्पष्ट कारण नसताना वेदना सतत होत असतील, विशेषतः त्यासोबत मासिक पाळीतील बदल, रक्तस्राव किंवा लघवीशी संबंधित तक्रारी असतील, तर वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. असामान्य किंवा सतत होणारा योनीमार्गातील स्राव, विशेषतः त्यामध्ये रक्त आढळून आले असेल किंवा दुर्गंधी येत असेल, तर त्याची तपासणी करून घ्यावी. बाह्य जननेंद्रियाच्या भागात सतत खाज येणे, त्वचेच्या रंगात बदल होणे, जखम किंवा व्रण होणे, सिस्ट होणे किंवा झालेली जखम बरी न होणे यांसारख्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका.
याशिवाय वजन कमी होणे, सतत थकवा जाणवणे किंवा लघवी अथवा शौचाच्या सवयींमध्ये बदल होणे यांसारखी लक्षणे इतर तक्रारींसोबत दिसत असतील तर डॉक्टरांशी चर्चा करणे आवश्यक आहे. यापैकी अनेक लक्षणांमागे साधी किंवा कर्करोगाशी संबंधित नसलेली कारणे असू शकतात. महिलांना आपल्या शरीरातील नेहमीच्या बदलांची सर्वाधिक जाणीव असते. त्यामुळे एखादी गोष्ट नेहमीपेक्षा वेगळी जाणवत असेल, वारंवार होत असेल किंवा नेहमीच्या पद्धतीत स्पष्ट बदल झाला असेल, तर त्याबाबत डॉक्टरांशी चर्चा करणे महत्त्वाचे आहे. वेळीच वैद्यकीय तपासणी केल्यास कारण समजून घेणे आणि आवश्यक उपचार वेळीच सुरू करणे शक्य होते.