Foot Palm Malish | झोपण्यापूर्वी दोन मिनिटे... 
आरोग्य

Foot Palm Malish | झोपण्यापूर्वी दोन मिनिटे...

पुढारी वृत्तसेवा

डॉ. भारत लुणावत

रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना दोन मिनिटे मालिश करणे ही एक अत्यंत सोपी, पण आरोग्यदायी सवय आहे. ही सवय आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर दूरगामी सकारात्मक परिणाम घडवून आणते.

दिवसभराच्या धावपळीनंतर शरीराची थकलेली स्नायूंची यंत्रणा शांत करण्यासाठी ही एक प्रभावी पद्धत मानली जाते. पायांना मालिश केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते, ज्याचा थेट परिणाम आपल्या हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर होतो आणि उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही या सवयीची मदत होऊ शकते. पायांना मसाज केल्याने मन शांत होते आणि दिवसभराचा मानसिक तणाव कमी होण्यास मदत मिळते.

अनेक लोकांना टाचदुखी किंवा प्लांटर फॅसिटिससारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे चालताना किंवा उभे राहताना वेदना होतात. तळव्यांवर मालिश केल्यास त्या भागातील स्नायूंना शिथिलता मिळतेच; पण वेदना कमी होऊन स्नायूंमधील जडत्व दूर होते. ही प्रक्रिया नियमित केल्यास झोपेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होते, कारण मसाजमुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यास आणि गाढ झोप लागण्यास मदत होते. चांगली झोप ही आरोग्यासाठी पायाभूत गरज आहे आणि अशा छोट्याशा सवयीमुळे आपण अनिद्रा किंवा झोपेच्या तक्रारींपासून दूर राहू शकतो.

याव्यतिरिक्त, आपल्या तळव्यांवर शरीराच्या विविध अवयवांचे दाबबिंदू असतात, ज्यांना मसाज केल्यामुळे संपूर्ण शरीराच्या अवयवांना चालना मिळते आणि शरीरातील ऊर्जा प्रवाहित होण्यास मदत होते. या मालिशसाठी कोणतेही महागडे तेल किंवा उपकरणांची गरज नसते, साध्या खोबरेल तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा वापर करूनही हे फायदे मिळवता येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT