Mango Health Benefits By Rujuta Diwekar
उन्हाळा आला की आंब्याचा हंगाम सुरू होतो आणि फळांचा राजा म्हणवल्या जाणाऱ्या या फळाची चव घेण्यासाठी अनेकजण आतुर असतात. मात्र अनेक लोक असा गैरसमज बाळगून असतात की आंबा गोड असल्यामुळे त्याचे सेवन केल्यास वजन वाढते किंवा डायबिटीज होऊ शकतो. त्यामुळे अनेकजण या स्वादिष्ट फळापासून दूर राहतात. पण प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी या बाबतीत स्पष्ट भूमिका घेतली आहे.
करीना कपूर यांची आहारतज्ज्ञ असलेल्या रुजुता दिवेकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की, दररोज एक आंबा खाल्ल्याने वजन वाढत नाही आणि डायबिटीजही होत नाही. त्या म्हणाल्या, “हे व्हिडीओ दरवर्षी मी याच उद्देशाने टाकते. तुम्हाला आठवण करून देण्यासाठी की उन्हाळा आला आहे आणि दररोज एक आंबा खाण्याची ही योग्य वेळ आहे. आंबा खाल्ल्याने ना वजन वाढते, ना डायबिटीज होते, ना पिंपल्स येतात.”न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर
त्यांनी यामध्ये पुढे सांगितले की, आंबा हा फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्सचा उत्तम स्रोत आहे. हे घटक शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे आंबा आरोग्यासाठी हानिकारक नसून फायदेशीरच आहे.
रुजुता दिवेकर यांच्या मते, आंबा खाण्याचीही एक योग्य पद्धत आहे. आंबा खाण्यापूर्वी किमान ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे त्यातील उष्णता कमी होते आणि पचनास मदत होते. अशा प्रकारे घेतलेला आंबा आरोग्यास कोणताही त्रास देत नाही.
रुजुता पुढे सांगतात की आंबा खाणे केवळ शारीरिक आरोग्यास नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्या म्हणतात, “आंबा खाणे हा एक आनंद आहे. त्याचा गोडवा, रस, आणि सुगंध हे सगळं अनुभवणं म्हणजे मानसिक समाधान आहे. रोज एक आंबा खाल्ल्याने नैराश्य दूर होऊ शकतं आणि तुम्हाला सकारात्मकता मिळू शकते.”
रुजुता दिवेकर यांनी असेही स्पष्ट केले की, ताज्या आणि नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांमध्ये शरीराला हानीकारक असा कोणताही पदार्थ नसतो. पॅकेज्ड फूड किंवा कृत्रिम गोडीच्या पदार्थांपेक्षा आंबा खूपच चांगला पर्याय आहे.
उन्हाळ्यात दररोज एक आंबा खा, पण योग्य प्रकारे. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून या आरोग्यदायी फळापासून स्वतःला वंचित ठेवू नका. आंबा तुमच्या शरीरासाठी तर उपयुक्त आहेच, पण तुमच्या मनालाही आनंद देतो.