Diabetes Skin Health | मधुमेहींच्या जखमा आणि त्वचेचे आरोग्य  
आरोग्य

Diabetes Skin Health | मधुमेहींच्या जखमा आणि त्वचेचे आरोग्य

पुढारी वृत्तसेवा

डॉ. महेश बरामदे

मधुमेह हा केवळ रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करणारा आजार नसून त्याचा शरीरातील अनेक नैसर्गिक प्रक्रियांवर खोल परिणाम होतो. विशेषतः जखमा भरून येण्याच्या गतीवर आणि त्वचेच्या आरोग्यावर तो गंभीर परिणाम करतो.

रक्तातील वाढलेली साखर शरीराच्या दुरुस्ती प्रक्रियेला धिमा करते. त्यामुळे जखमा उशिरा भरून येतात आणि त्यातून संसर्गाचा धोका वाढतो. ही केवळ जखम उशिरा भरून येण्याची गोष्ट नाही, तर गंभीर आजार, दीर्घकालीन जखमा आणि बर्‍याचदा नियंत्रित करणे कठीण असे संसर्गही निर्माण होऊ शकतात. या परिणामांचे ज्ञान असणे हे मधुमेहग्रस्तांसाठी तर महत्त्वाचे आहेच; परंतु मानवी शरीर कसे कार्य करते आणि एखाद्या आजारामुळे ही प्रक्रिया कशी बदलते, यामध्ये रस असणार्‍या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे.

1. रक्तप्रवाहातील अडथळे

रक्तवाहिन्या अरुंद व कठीण झाल्यास (ज्याचे प्रमुख कारण वाढलेली रक्तातील साखर असते) शरीराच्या टोकाच्या भागांपर्यंत रक्त पोहोचण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे त्या भागांना आवश्यक ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये कमी प्रमाणात मिळतात आणि जखमा लवकर भरून येत नाहीत. यासोबतच शरीराची रोगप्रतिकारक पेशी जखमेच्या ठिकाणी पोहोचण्याची क्षमता घटते, ज्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो.

2. रोगप्रतिकारक शक्तीतील कमतरता

रक्तातील जास्त साखर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते. त्यामुळे अगदी किरकोळ जखमाही संसर्गाचे प्रवेशद्वार बनतात. जखमा लवकर न भरता दीर्घकालीन स्वरूप धारण करतात, जसे की मधुमेही पायातील अल्सर. हे अल्सर गंभीर संसर्गामुळे पाय कापण्यापर्यंत परिस्थिती नेऊ शकतात. यामुळे रक्तशर्करा नियंत्रणात ठेवणे किती आवश्यक आहे, हे अधोरेखित होते.

3. त्वचेतील बदल

मधुमेहामुळे रक्तवाहिन्या व नसांचे नुकसान झाल्याने त्वचेवरही थेट परिणाम होतो. त्वचा कोरडी, भेगाळलेली आणि कमी लवचिक होते. यामुळे तिची संरक्षणात्मक भिंत म्हणून काम करण्याची क्षमता कमी होते. जखमा झाल्यास त्या लवकर भरून येत नाहीत. सूज व दाह अधिक काळ टिकून राहतात आणि जखमेची मजबुती कमी राहते. विशेषतः पायांसारख्या दाब येणार्‍या भागांवर याचा परिणाम अधिक दिसतो.

4. संसर्गाचा वाढलेला धोका

रक्तप्रवाह कमी होणे, नसांचे नुकसान, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आणि त्वचेतील बदल या सर्व गोष्टी एकत्र येऊन मधुमेही रुग्णांना संसर्गासाठी अधिक संवेदनशील बनवतात. किरकोळ जखमाही लवकर संसर्गित होऊ शकतात आणि गंभीर स्वरूप धारण करू शकतात. त्यामुळे जखमेभोवती लालसरपणा, वेदना, पू, विचित्र रंग किंवा वास आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

5. न्यूरोपथी (नसांवर परिणाम)

दीर्घकाळ उच्च रक्तशर्करेमुळे नसांची हानी होते. विशेषतः पाय व पोटर्‍यांमध्ये. त्यामुळे संवेदना कमी होतात आणि लहान-मोठ्या जखमा लक्षातच येत नाहीत. वेदना ही शरीराची धोक्याची सूचना असते; परंतु नसांची हानी झाल्याने ही सूचना मिळत नाही. त्यामुळे लहानशी जखम उपचार न मिळाल्याने गंभीर संसर्गात रूपांतरित होऊ शकते. म्हणूनच मधुमेह असणार्‍या लोकांनी पायांची नियमित तपासणी करणे आणि काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मधुमेहामुळे केवळ त्वचा आणि जखमा भरून येणेच प्रभावित होत नाही, तर हृदय व रक्तवाहिन्यांवरही प्रचंड ताण येतो. वाढलेली रक्तशर्करा, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यांचा एकत्रित परिणाम हृदयविकाराच्या धोक्याला अनेकपटींनी वाढवतो. स्थूलता, आनुवंशिक घटक आणि उच्च रक्तदाब यांच्यासह मधुमेह हा हृदयासाठी गंभीर आव्हान ठरतो. म्हणूनच नियमित हृदय तपासणी, तंतुमय व कमी चरबीयुक्त आहार, शारीरिक व्यायाम आणि रक्तशर्करेवर नियंत्रण हे सर्व उपाय अंगीकारणे अत्यावश्यक आहे. हृदयाची काळजी ही स्वतंत्र बाब नसून सर्वांगीण आरोग्य व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT