आपल्या मुलाच्या जन्माची वाट पाहणारे बहुतेक पालक एकच प्रार्थना करतात की मुलगा असो वा मुलगी, तो पूर्णपणे निरोगी असावा. पण, अनेक वेळा ही प्रार्थना खरी ठरत नाही. नवजात बाळाशी संबंधित सर्वात सामान्य समस्या आणि आव्हानांपैकी एक म्हणजे बाळाचे सरासरी वजन कमी असणे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ज्या बाळांचे जन्माचे वजन अडीच किलोपेक्षा कमी आहे त्यांना कमी वजनाचे बाळ मानले जाते.
आपल्या देशात 20 टक्के नवजात बालकांचे वजन सामान्यपेक्षा कमी असते. विशेषतः मुदतीपूर्व प्रसूती झालेल्या किंवा प्रीमॅच्युअर बेबीचे वजन बरेचदा कमी असते. मातेच्या पोटात 40 आठवडे घालवणार्या मुलांचे वजनही सामान्यपेक्षा कमी असू शकते. अशा मुलांची काळजी आणि आहार यावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज असते. कारण ते संक्रमण आणि इतर आरोग्य समस्यांबाबत अधिक असुरक्षित असतात.
सर्व मुलांसाठी आईचे दूध सर्वात महत्त्वाचे आहे. कमी वजनाच्या नवजात मुलांसाठी तर ते अमृतासम आहे. आईच्या दुधात भरपूर पोषक आणि प्रतिपिंडे असतात जी मुलांच्या शारीरिक विकासासाठी खूप महत्त्वाची असतात. त्यामुळे जन्मजात बालकांना स्तनपान केलेच पाहिजे. विशेषतः बाळाचे जन्मावेळी वजन कमी असेल तर अशा मुलांना शक्य तितक्या वेळा स्तनपान करावे. या काळात मातांनी प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक घटक घेतल्यास आईच्या दुधाचे पोषण मूल्य आणि कॅलरी दोन्ही वाढते. अशा दुधाच्या सेवनाने मुलांचे वजन वाढते आणि आरोग्यही सुधारते. बरेचदा अशा बाळांची एकाच वेळी दूध पिण्याची क्षमता सामान्य वजनाच्या बाळापेक्षा कमी असते. त्यामुळे ते एकाच वेळी जास्त दूध पिऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन त्याला कमी प्रमाणात दूध जास्त वेळा द्या. यामुळे वजन वाढण्यास मदत होते.
बरेचदा मुलाला स्तनपान करवण्यास त्रास होतो. याचे कारण आई किंवा मुलामध्ये काही समस्या असू शकतात. अशा परिस्थितीत, प्रशिक्षित स्तनपान सल्लागार किंवा स्तनपान करणार्या थेरपिस्टची मदत घेण्यास कसलाही संकोच बाळगू नका.
वजन कमी असणार्या मुलांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. ही बाब वजन वाढण्यात अडथळा ठरू शकते. अशा परिस्थितीत मुलाच्या आणि त्याच्या सभोवतालच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. आजारी लोकांच्या संपर्कात येण्यापासून त्याचे संरक्षण करा. हाताळताना स्वच्छतेची आणि संसर्ग न होण्याची काळजी घ्यावी.
नवजात बालकांचे शरीर अतिशय नाजूक असते. त्यामुळे मुलाचे वजन वाढवण्याची घाई करू नका. ते हळूहळू आणि निरोगी रीतीने वाढू द्या.
नवजात बाळाचा आईशी वारंवार होणारा त्वचेपासून त्वचेचा संपर्क, त्याच्या विकासात आणि वजन वाढण्यात सकारात्मक भूमिका बजावतो. जेव्हा बाळाची त्वचा आईच्या त्वचेच्या थेट संपर्कात येते तेव्हा त्याला आईची भावनिक आणि शारीरिक उबदारता जाणवते. यामुळे वजन वाढण्यास मदत होते.
अशा मुलांना विकसित होण्यासाठी जास्त कॅलरी लागतात. ती गरज स्तनपानाने पूर्ण होत नसतील, तर डॉक्टर पूरक आहार घेण्याची शिफारस करतात. त्यानुसार असा आहार आवर्जून द्या. पण, मनमानीपणाने कोणताही आहार बाळांना देऊ नका.