Nomophobia  File Photo
आरोग्य

Nomophobia | मोबाईलशिवाय जगणे झाले अशक्य; तरुण होताहेत नोमोफोबियाचे शिकार

१५ टक्के प्रमाण; तरुणांमध्ये मोबाईलविषयी आकर्षण वाढत चालले आहे

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

तरुणांमध्ये मोबाईलविषयी आकर्षण वाढत चालले आहे. मोबाईलशिवाय जगणे बऱ्याच जणांना अशक्य बनत चालले आहे. त्यामुळे नोमोफोबियाची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी नोंदवले आहे. (Nomophobia)

तरुणांमध्ये नोमोफोबियाचे १० ते १५ टक्के रुग्ण आढळले असून ते वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्कात असल्याची माहिती मानसोपचार तज्ज्ञांनी दैनिक पुढारी प्रतिनिधीशी बोलताना दिली. काही संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की, कॉलेजमधील युवा व युवतींमध्ये नोमोफोबियाच्या लक्षणांचे प्रमाण १० ते १५ टक्के इतके आहे.

लहान मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोमोफोबिया म्हणजे काय? नोमोफोबिया म्हणजे नो मोबाईल फोन फोबिया. मोबाइल किंवा इंटरनेटची उपलब्धता नसेल तर काय होईल, अशी अनाठायी भीती अशा रुग्णांना वाटते.

नोमोफोबियाची कारणे

महत्त्वाची माहिती, सामाजिक संवाद किंवा संधी गमावण्याची भीती व्यक्तींना त्यांचे फोन सतत तपासण्यास प्रवृत्त करते. मोबाइल डिव्हाइसवरून डिस्कनेक्ट होण्याची भीती चिंता विकार किंवा तणाव वाढवू शकतात.

नोमोफोबियाची प्राथमिक लक्षणे

मोबाईलचा अतिवापर, मोबाइलजवळ नसेल तर भयगंड निर्माण होणे, उदासीनता, अस्वस्थता, निद्रानाश ही प्रमुख लक्षणे जाणवतात. लहान मुलांमध्ये हट्टीपणा, चिडचिडेपणा दिसतो.

शारीरिक लक्षणे : जेव्हा फोन वापरता येत नाही तेव्हा घाम येणे, थरथर कापणे, वेगवान हृदयाचे ठोके किंवा मळमळ होणे.

नोमोफोबियाची तपासणी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नोमोफोबिया या मानसिक आजाराने ग्रस्त रुग्ण येतात. अद्यापही या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव पाहण्यास मिळतो. लहान मुलांना उपचार घेण्यासाठी पालक फार उशिरा येतात असे दिसून येते. अभ्यासावर परिणाम दिसू लागल्यावर पालक विषय गांभीयनि घेतात, अशी माहिती मानसोपचार तज्ञ डॉ. गौरव वडगांवकर यांनी दिली.

काय काळजी घ्याल?

  • स्क्रीन टाइम मर्यादित करा.

  • फोन वापरावर सीमा सेट करा.

  • संदेश आणि सोशल मीडिया तपासण्यासाठी विशिष्ट वेळ द्यावा.

  • परस्परसंवादाला चालना द्यावी.

  • मोबाइलचा वापर कमीत कमी करणे गरजेचे आहे.

  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांना मोबाइल न देणे होय.

नोमोफोबियाची लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे बंद करायला हवा. मोबाइल फक्त महत्त्वाच्या कामासाठी वापरावा.
डॉ. गौरव वडगांवकर, मानसोपचार तज्ज्ञ, वायसीएम.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT