Diabetes and Cancer Link | मधुमेह आणि कर्करोग यांच्यातील संबंध Pudhari File Photo
आरोग्य

Diabetes and Cancer Link | मधुमेह आणि कर्करोग यांच्यातील संबंध

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संतोष काळे

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत उच्च रक्तदाब, उच्च रक्तशर्करा आणि विविध प्रकारचे कॅन्सर हे शब्द इतके सामान्य झाले आहेत की, अनेकजण त्यामागील गंभीरता ओळखण्याआधीच मोठ्या धोक्यात सापडतात. शरीरात कुठे कॅन्सर तयार होत आहे, हे सुरुवातीला जाणवत नाही. कारण कॅन्सरची प्रवृत्तीच अशी की, तो दीर्घकाळ शांत राहतो आणि योग्यक्षणी आक्रमक रूप धारण करतो.

डायबेटिज आणि कर्करोग यांच्यातील परस्परसंबंध आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्रात अधिक ठळकपणे समोर येत असून, गेल्या काही वर्षांत या दोन्ही आजारांचे प्रमाण ज्या वेगाने वाढले आहे, त्याने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेलाच गंभीर धोक्याची जाणीव करून दिली आहे. मधुमेहाला ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते, याचे कारण हेच की, शरीरातील साखरेची पातळी दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास कोणताही तत्काळ त्रास जाणवत नाही; परंतु आतून पेशींवर, अवयवांवर आणि विशेषतः पचनसंस्थेवर त्याचा परिणाम सुरू असतो. अभ्यासकांच्या मते, ही अनियंत्रित रक्तशर्करा शरीरात सूज वाढवते आणि हीच सूज पुढे सर्वोच्च पातळीवर गेल्यावर कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण देते.

आहारातील असंतुलन, ताणतणाव, कमी झोप आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे शरीराच्या सूक्ष्म यंत्रणांमध्ये असंतुलन निर्माण होते. या पार्श्वभूमीवर मधुमेहाचा प्रभाव अधिक चिंताजनक ठरतो, कारण वाढलेली साखर शरीरातील सूज वाढवून प्रतिकारशक्तीला कमकुवत करते आणि पचनसंस्थेतील ‘गट मायक्रोबायोम’चे स्वरूप बदलते.

पोटाचा आरोग्यविषयक पाया म्हणजे आंत. आंतांमध्ये लाखो चांगले आणि वाईट जीवाणू अस्तित्वात असतात. हेच सूक्ष्मजीव पचन सुधारणे, जीवनसत्वे शोषून घेणे आणि रोगप्रतिकारशक्ती भक्कम ठेवणे या महत्त्वपूर्ण कामांमध्ये भाग घेतात; पण जेव्हा ब्लड शुगर सतत उंचावलेला राहतो, तेव्हा वाईट जीवाणूंचे प्रमाण वाढून ‘लीकी गट’ ही स्थिती उद्भवते. आंतांची संरक्षणभिंत कमकुवत होत गेल्यावर हे हानिकारक जीवाणू थेट रक्तप्रवाहात पोहोचू लागतात. या अवस्थेत शरीरात सूज वाढत जाते आणि ही सूज पुढे कधी कोलन कॅन्सरच्या, तर कधी पोटाच्या कॅन्सरच्या रूपाने प्रकट होते. दुर्दैवाची बाब म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात हा संकेत लोक बहुतेकवेळा सामान्य अस्वस्थता म्हणून दुर्लक्षित करतात.

मधुमेह नियंत्रित ठेवणे म्हणजे केवळ शुगर कमी करणे नव्हे, तर शरीरातील सूज कमी करणे आणि प्रतिकारशक्ती सक्षम ठेवणे देखील आहे. औषधोपचार हा एक मार्ग असला, तरी जीवनशैलीत सातत्यपूर्ण सुधारणा केल्याशिवाय दीर्घकालीन आरोग्य राखणे अशक्य आहे. आहारात हिरव्या भाज्या, जांभळे, अमरूद, संत्री, ओटस्, बीन्स, अलसी, साबूत धान्ये, लीन प्रोटिन आणि भरपूर फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे अत्यावश्यक ठरते. त्याउलट पांढरी साखर, केक, बिस्किटे, पॅकेट ज्यूस, परिष्कृत मैदा आणि तळलेले पदार्थ पूर्णतः टाळणे हीच शुगर नियंत्रणाची खरी सुरुवात ठरते. बदलणार्‍या परिस्थितीत दीर्घकालीन आरोग्याची गुरुकिल्ली ब्लड शुगर नियंत्रणात असल्याचे वैद्यकीय जगत अधोरेखित करत आहे आणि तेच पोटाच्या कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून बचावाचे भक्कम कवच ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT