HbA1c वर डोळे झाकून विश्वास ठेवताय? मधुमेहाच्या निदानातील जाणून घ्या 'ही' मोठी त्रुट 
आरोग्य

Diabetes diagnosis accuracy | HbA1c वर डोळे झाकून विश्वास ठेवताय? मधुमेहाच्या निदानातील जाणून घ्या 'ही' मोठी त्रुट

पुढारी वृत्तसेवा

डॉ. महेश बरामदे

मधुमेहाच्या निदानासाठी रक्तातील साखरेची सरासरी म्हणजेच ‘एचबीए1सी’ तपासणे ही प्रचलित पद्धत आहे. परंतु, ही चाचणी केवळ मागील तीन महिन्यांतील साखरेचा सरासरी इतिहास सांगते. ही चाचणी भविष्यातील धोक्यांऐवजी, होऊन गेलेल्या स्थितीवर भाष्य करते. त्यामुळे मधुमेहाची पूर्वलक्षणे ओळखण्यासाठी ही तपासणी तोकडी पडते.

जेव्हा स्वादुपिंड पूर्णपणे प्रभावित होतो आणि शरीरातील इन्सुलिनचा प्रतिकार कमालीचा वाढतो, तेव्हाच ‘एचबीए1सी’ या चाचणीचा आकडा वाढलेला दिसतो. थोडक्यात, ही चाचणी भविष्यातील धोक्यांऐवजी, होऊन गेलेल्या स्थितीवर भाष्य करते. त्यामुळे मधुमेहाची पूर्वलक्षणे ओळखण्यासाठी ही तपासणी तोकडी पडते.

शरीरातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वादुपिंडाला किती कष्ट करावे लागत आहेत, हे ‘फास्टिंग इन्सुलिन’ चाचणीतून स्पष्ट होते. रक्तातील साखर सामान्य दिसत असली, तरी ती राखण्यासाठी जर शरीराला प्रमाणाबाहेर इन्सुलिन तयार करावे लागत असेल, तर तो मधुमेहाचा पहिला टप्पा मानला जातो. होमा-आयआर हे अशा प्रकारचे मोजमाप आहे जे साखर आणि इन्सुलिनच्या प्रमाणावरून शरीरातील मेटाबॉलिक आरोग्य किती बिघडले आहे, याचा अचूक स्कोर देते. दुर्दैवाने, अनेक आरोग्य तपासणी संचांमध्ये या महत्त्वाच्या चाचण्यांचा समावेश नसतो.

आपल्या रक्ताच्या चाचणीच्या अहवालातच एक मोठा इशारा लपलेला असतो, तो म्हणजे ट्रायग्लिसराइडस् आणि ‘एचडीएल’ (चांगले कोलेस्ट्रॉल) यांचे गुणोत्तर. जर हे प्रमाण 3.0 पेक्षा जास्त असेल, तर ते हृदयविकाराचा धोका आणि इन्सुलिन प्रतिकाराचे सबळ लक्षण मानले जाते. यासाठी कोणतीही वेगळी महागडी चाचणी करण्याची गरज नसते, फक्त उपलब्ध अहवालाचे योग्य विश्लेषण करणे गरजेचे असते. हे गुणोत्तर वाढणे म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याच्या प्रक्रियेची ती नांदी असते.

‘सीजीएम’, ‘एपीओ-बी’ आणि ‘एचएस-सीआरपी’

सीजीएम : ही यंत्रणा शरीरातील साखरेच्या चढ-उतारांवर सतत लक्ष ठेवते. जेवणानंतर रक्तातील साखर नेमकी किती वाढते, हे यातून स्पष्ट होते. अनेकदा सरासरी साखर सामान्य असूनही जेवणानंतर होणारी साखरेची वाढ शरीरातील अवयवांचे नुकसान करत असते.

एपीओ-बी : ही चाचणी रक्तातील त्या घातक कणांची संख्या सांगते जे थेट हृदयविकाराला निमंत्रण देतात. साध्या ‘एलडीएल’ तपासणीपेक्षा ही अधिक अचूक मानली जाते.

एचएस-सीआरपी : ही चाचणी शरीरातील छुप्या सुजेचे प्रमाण मोजते. शरीरात सातत्याने राहणारी ही सूक्ष्म सूज इन्सुलिनच्या कामात अडथळा निर्माण करते.

अशा प्रकारे, केवळ साखरेच्या आकड्यांवर लक्ष न देता शरीरातील चयापचय क्रियेचा सर्वांगीण आढावा घेणे हीच काळाची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT