डॉ. निखिल देशमुख
पारंपरिक ब्रेसेसमध्ये धातूचे ब्रॅकेटस् दातांवर कायमस्वरूपी फिक्स केले जातात. उपचार पूर्ण होईपर्यंत ते काढता येत नाहीत. याउलट, इनव्हिझलाईन अलायनर्स हे प्लास्टिक ट्रेच्या स्वरूपात असतात. गरज पडल्यास ते कधीही काढता येतात आणि पुन्हा घालता येतात. दातांची योग्य रचना करण्यासाठी ओव्हरबाईट, अंडरबाईट किंवा क्रॉसबाईट यांसारख्या समस्यांवर हा उपचार अत्यंत उपयुक्त ठरतो.
या उपचाराचे उत्तम परिणाम मिळवण्यासाठी अलायनर्स नियमितपणे वापरणे अत्यंत आवश्यक आहे. दिवसातून किमान 20 ते 22तास हे अलाइनर्स दातांवर असणे गरजेचे असते. फक्त जेवताना आणि दात घासतानाच हे अलायनर्स तोंडातून बाहेर काढावे लागतात. साधे पाणी पिण्यासाठी हे काढण्याची आवश्यकता नसते. ते नियमितपणे वापरले नाहीत, तर दातांची हालचाल अपेक्षेप्रमाणे होत नाही. यामुळे उपचाराचा कालावधी वाढू शकतो आणि मनासारखे परिणाम मिळत नाहीत.
या उपचारादरम्यान स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागते. प्रत्येक वेळी जेवण केल्यानंतर आणि अलायनर्स पुन्हा लावण्यापूर्वी दात घासणे अत्यंत आवश्यक आहे. असे न केल्यास अन्नकण दातांमध्ये अडकून बॅक्टेरिया आणि अॅसिडमुळे दात सडण्याचा धोका निर्माण होतो.
पाणी सोडून इतर कोणतेही रंगीत पेये पिण्यापूर्वी अलायनर्स काढावेत अन्यथा त्यावर डाग पडू शकतात. प्रवासादरम्यानदेखील अलायनर्स ठेवण्याचा बॉक्स आणि ते स्वच्छ करण्याच्या गोळ्या सोबत ठेवणे गरजेचे आहे. अलायनर्स लावल्यानंतर सुरुवातीला दातांवर थोडा दाब जाणवणे, हलकी सूज, हिरड्यांमध्ये आखडलेपणा जाणवणे किंवा जीभ आणि गालाला थोडे अवघडल्यासारखे वाटणे या गोष्टी सामान्य असून त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.