Back Pain 
आरोग्य

Back Pain : तुमची गादी ठरत तर नाही ना तुमच्या पाठदुखीचे मूळ कारण ? वाचा सविस्तर

चांगल्या आरोग्यासाठी गादी ठरावीक कालावधीनंतर बदलणे आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संतोष काळे

आपल्या निरोगी आयुष्यामध्ये शांत आणि पुरेशी झोप अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते, पण अनेकदा रात्री वारंवार कूस बदलूनही सकाळी उठल्यावर शरीर मोकळे वाटण्याऐवजी पाठ, कंबर किंवा मान दुखू लागते. याचे मुख्य कारण तुमच्या झोपण्याची पद्धत नसून, तुमची जुनी झालेली गादी (मॅट्रेस) असू शकते. चांगल्या आरोग्यासाठी गादी ठरावीक कालावधीनंतर बदलणे आवश्यक असते.

गादीचा पृष्ठभाग सपाट राहिला नसेल आणि तुम्ही झोपता त्या भागात किंवा गादीच्या मधोमध खड्डा पडला असेल, तर ती त्वरित बदलणे गरजेचे आहे. कारण यामुळे झोपताना पाठीच्या कण्याला (स्पाईन) आवश्यक असणारा आधार मिळत नाही. परिणामी, सकाळी उठल्यावर तीव्र पाठदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास सुरू होतो.

तुम्ही ‘स्प्रिंग मॅट्रेस’ वापरत असाल आणि गादीवर बसताना किंवा कूस बदलताना त्यातून करकर असा आवाज येत असेल, तर आतील स्प्रिंग खराब झाल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे. काही वेळा गादीचा वरचा थर पातळ होऊन आतील स्प्रिंग शरीराला टोचू लागतात. अशा गादीवर झोपल्याने शरीराचे पोश्चर (बैठक/स्थिती) बिघडते. दीर्घकाळ अशा गादीचा वापर केल्यास पाठदुखीचे गंभीर आजार निर्माण होऊ शकतात. रात्री 7 ते 8 तासांची भरपूर झोप घेऊनही सकाळी ताजेतवाने वाटण्याऐवजी शरीरात जडपणा, थकवा किंवा स्नायूंमध्ये कडकपणा (स्टिफनेस) जाणवत असेल, तर तुमची गादी शरीराला आराम देण्यास असमर्थ ठरत आहे. गादीची लवचिकता (इलास्टिसिटी) संपल्यामुळे असे घडते.

वर्षानुवर्षे एकच गादी वापरल्यामुळे तिच्यामध्ये मृत त्वचा (डेड स्किन सेल्स), घाम, धूळ आणि ‘डस्ट माईटस्’ (सूक्ष्म कीटक) जमा होतात. गादीवर झोपल्यावर तुम्हाला अचानक खोकला, शिंका येणे, डोळ्यांतून पाणी येणे किंवा त्वचेला खाज सुटणे असा त्रास होत असेल, तर गादीमध्ये मोठ्या प्रमाणावर जंतुसंसर्ग झाला आहे हे ओळखावे. नियमित स्वच्छता करूनही हा त्रास थांबत नसेल, तर गादी बदलणे हाच एकमेव पर्याय असतो.

तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही चांगल्या दर्जाच्या गादीचे आयुष्य साधारणपणे ७ ते ८ वर्षे असते. गादी दिसायला वरून चांगली वाटली, तरी या कालावधीनंतर तिच्यातील अंतर्गत रचना कमजोर होते. त्यामुळे ८ वर्षांपेक्षा जास्त जुनी गादी वापरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT