जेवण किंवा न्याहारी झाल्यानंतर पोट फुगण्याची समस्या, गॅसेस, अपचन आणि वारंवार ढेकर येणं ही आजकाल फार सामान्य गोष्ट झाली आहे. विशेषतः सकाळी उठल्यानंतर पोटात जडपणा किंवा फुगलेपणा जाणवत असेल, तर ती स्थिती ब्लोटिंग म्हणून ओळखली जाते. ही समस्या थेट आहारशैलीशी व जीवनशैलीशी संबंधित असते.
रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपी जाणं, उशिरा अन्न खाणं, पुरेशा प्रमाणात पाणी न पिणं, जेवणानंतर हालचाल न करणं, आहारात साखर व मीठ यांचे प्रमाण अधिक असणार्या अन्नपदार्थांचा समावेश असणं, पचायला जड असणारे पदार्थ यासारख्या काही कारणांमुळे ब्लोटिंगची समस्या उद्भवते.
कोणत्याही व्याधीमध्ये किंवा आजारामध्ये तो जडण्याची कारणे ज्ञात असतील, तर प्रतिबंधही सोपा होतो आणि व्याधी जडल्यानंतरचे उपचारही. ब्लोटिंगचा विचार करता ही समस्या टाळण्यासाठी जीवनशैलीत काही बदल गरजेचे ठरतात. त्यानुसार रात्री झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी जेवण करणे आवश्यक आहे. तसेच न चुकता जेवणानंतर संथ गतीने किमान 15 मिनिटे चालणे गरजेचे आहे. दिवसभरात भरपूर पाणी पिण्यापेक्षा किमान 8 ते 10 ग्लास पाणी पोटात जाईल याकडे लक्ष द्या. फास्टफूड, पॅकड् फूड, साखर आणि पचायला जड असणार्या अन्नपदार्थांपासून दूर राहावे. जेवताना बिलकूल घाई करू नका. अन्न जास्तीत जास्त चावून खाल्ल्यास पचन यंत्रणांवरचा ताण कमी होतो आणि ब्लोटिंगसह अनेक समस्या दूर राखता येतात. याखेरीज सकाळी उठल्यानंतर घरच्या घरी बनवलेली काही पेयेही यामध्ये लाभदायक ठरतात. यामध्ये आले पाण्यामध्ये उकळवून केलेला चहा घेता येईल. पोटफुगी, मळमळ कमी करण्याबरोबरच रक्तदाब, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही आले उपयुक्त ठरते. एक कप पाणी उकळून त्यात 1/2 चमचा किसलेलं आलं टाका. 5 मिनिटं उकळून गाळा आणि गरम गरम चहा प्या. हवं असल्यास थोडंसं लिंबू रस किंवा मध घालू शकता.
याखेरीज केफिर हे दुधापासून तयार होणारे एक फर्मेंटेड प्रॉबायोटिक पेय आहे. यामध्ये लाभदायक जीवाणू भरपूर असतात, जे आतड्यांचं आरोग्य सुधारतात. याच्या सेवनानेही पचनक्रिया सुधारते. याशिवाय यामध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. केफिर हाडे बळकट करण्यासही लाभदायक ठरते. तसेच यात लॅक्टोजचे प्रमाणही कमी असते. तेव्हा सकाळी उपाशीपोटी अर्धा कप प्लेन केफिर प्यावे; पण यानंतर कुठल्याही फळांचे सेवन टाळावे. याशिवाय, गरम पाणी, मध आणि दालचिनी यांचा काढाही ब्लोटिंगवर प्रभावी ठरतो. हा काढा आतड्यांतील जंतुसंसर्गाशी लढतो. मधुमेह, हृदयविकार यासह शरीरावरील जखमा भरून येण्यासही तो लाभदायक ठरतो. एक कप गरम पाण्यात 1 चमचा शुद्ध मध आणि 1/2 चमचा दालचिनी पावडर मिसळून हे पेय तयार करता येते. लक्षात घ्या, या घरगुती उपचारांचा वापर आपली प्रकृती पाहून आणि वैद्यांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.