Malignant Hyperthermia | शस्त्रक्रियेदरम्यानची जीवघेणी तापमानवाढ 
आरोग्य

Malignant Hyperthermia | शस्त्रक्रियेदरम्यानची जीवघेणी तापमानवाढ

पुढारी वृत्तसेवा

डॉ. आरती जाधव

आता सबंध वैैद्यकीय क्षेत्रात एका दुर्मीळ जीवावर बेतणाऱ्या परिस्थितीने खळबळ माजविली आहे, ज्याला मॅलिग्नंट हायपरथर्मिया, शरीरातील जीवघेणी उच्च तापमानवाढ असे संबोधले जाते. खरे पाहता, हा काही आजार नाही, तर शस्त्रक्रियेदरम्यान भूल देताना वापरण्यात येणाऱ्या औषधांना शरीराने अचानक दिलेली तीव्र प्रतिक्रिया आहे.

आपल्याकडे रोज हजारोंनी शस्त्रक्रिया पार पडत असतात; पण तसे पाहता ऑपरेशनदरम्यानची शारीरिक तापमान वाढून अशी गुंतागुंत खूपच दुर्मीळ म्हणजे लाखामध्ये एखाद्या रुग्णाच्या बाबतीत अशी प्रतिक्रिया येते. याचे प्रमुख कारण जनुकीय आहे. यामध्ये अचानक शरीराचे तापमान खूप जास्त म्हणजे अगदी 50 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. स्नायू ताठर होतात. हृदयाचे ठोके व नाडीची गती वाढू लागते. रुग्ण अस्वस्थ बनतो. ही अस्वस्थता जीवावर बेतू शकते.

तसेही ऑपरेशनदरम्यान हृदयाचे ठोके कमी-जास्त होणे, रक्तस्राव, लघवीचे प्रमाण रुग्णाचे तापमान यावर भूलतज्ज्ञ डॉक्टर डोळ्यात प्राण आणून लक्ष ठेवत असतात व गरजेनुसार औषधे देऊन परिस्थिती, रुग्णाचे आरोग्य उत्तम ठेवत असतात; पण ही दुर्मीळ अचानक उद्भवणारी गुंतागुंत असते. शिवाय कोणतीच रक्ताची, लघवीची वा अन्य कोणतीही अशी टेस्ट नसते जी अशी परिस्थिती आधी सांगू शकेल. ‌‘मसल बायोप्सी‌’ ही एक टेस्ट आहे; पण ज्यांना स्नायूंचा आजार आहे अशा रुग्णांना ‌‘प्रतिक्रिया‌’बद्दल सांगू शकतो व त्याचे रिपोर्ट येण्यास किमान 2 ते 3 आठवडे वेळ लागू शकतो. शिवाय सरसकट सगळ्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये ही टेस्ट होत नाही. तसेच सरसकट सगळ्या रुग्णांना अशी टेस्ट सांगितली जात नाही.

इथे एक गोष्ट लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. ही काही भूलतज्ज्ञ डॉक्टरांच्या चुकीमुळे किंवा भूलेच्या ओव्हरडोसमुळे रुग्णाचा जीव जात नसून रुग्णाच्या शरीराने भूलेच्या औषधांना दिलेल्या तीव्र प्रतिक्रियेमुळे रुग्णाचा जीव जातो, हे तथ्य आहे. आजवर हा आजार किंवा अशी गुंतागुंत दुर्मीळ आजारांत गणली गेली असल्याने त्यावर लागणाऱ्या औषधाचे भारतात उत्पादन केले जात नाही. परदेशातून ते आयात करावे लागते. त्यासाठी कमीत कमी एक महिना लागू शकतो. ‌‘डॅन्ट्रोलीन सोडीअम‌’ हे एकमेव औषध या आणीबाणीवर आहे व शक्य तितक्या लवकर देणे खूप महत्त्वाचे असते, तरच रुग्णाचा जीव वाचू शकतो. म्हणजेच औषधाचा साठा असणे महत्त्वाचेअसते. हे औषध परदेशातून मागवावे लागते. ही आणीबाणीची परिस्थिती कोणाबाबतीत उद्भवेल हे सांगणे डॉक्टरांनाही कठीण असते. शिवाय या औषधाचा डोस वजनानुसार व पुढील 24 ते 48 तास सलाईनमधून हे औषध द्यावे लागत असल्याने कमीत कमी 6 छोट्या बाटल्या उपलब्ध असणे आवश्यक असते. शिवाय परदेशातून औषध मागवायचे मग खर्चही भरपूर येतो. त्यामुळे याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करायला हवेत.

यावर उपाय म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संस्थांनी एकत्र येणे ही याची पहिली पायरी आहे. वैद्यकीय संस्थांबरोबरच सर्व मोठी हॉस्पिटल्स यांनीही याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे व औषध कसे मिळवता येईल, या दृष्टीने प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर समाजातील सेवाभावी संस्थानीही पुढाकार घेऊन ‌‘स्पेशल डॅन्ट्रोलीन फंड‌’ जमा करणे, यावरही विचार होणे खूप गरजेचे आहे आणि शेवटी शासकीय स्तरावर प्रयत्न करून निदान सरकारी रुग्णालयात हे औषध उपलब्ध करून देणे, हेच सध्या महत्त्वाचे पाऊल असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT