डॉ. मनोज शिंगाडे
जगातील सर्वात आरोग्यदायी राष्ट्रांची वार्षिक यादी जाहीर होते तेव्हा जपान, सिंगापूर, स्वित्झर्लंड, स्पेन, आईसलँड आणि इटली ही काही नावे वारंवार दिसतात. आयुर्मान जास्त, जीवनशैली संतुलित, रोगांचे प्रमाण तुलनेने कमी आणि उत्तम दर्जाची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, हे घटक या देशांना अग्रस्थानी ठेवतात. यामागचे कारण अतर्क्य किंवा विलक्षण नाही. त्यांची वेगळी ओळख ही त्यांच्या दैनंदिन जीवनात सहज मिसळलेल्या आरोग्यविषयक मूल्यांमध्ये आहे. या देशांकडून शिकण्यासारखे धडे सामान्य आहेत; पण त्यांचे परिणाम असामान्यपणे प्रभावी ठरतात.
धडा पहिला : या आरोग्यशाली समाजांचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक, प्रक्रिया-मुक्तअन्नावर आधारित आहार. जपानी समाजात तर भाज्या, समुद्री अन्न, किण्वित पदार्थ आणि सोया हे आहाराचे मुख्य स्तंभ आहेत. ‘हारा हाची बु’ म्हणजे पोट केवळ 80 टक्के भरल्यावर जेवण थांबवणेहा त्यांचा पारंपरिक नियम अति भूक भागविण्याच्या मोहापासून बचाव करतो. भूमध्य सागरी देशांमध्ये ताज्या भाज्या, हंगामी फळे, ऑलिव्ह तेल, सुकामेवा आणि डाळधान्य ही जेवणाची अविभाज्य घटक आहेत आणि संशोधनाने सिद्ध केले आहे की, अशी आहारशैली हृदयरोग, मेटाबॉलिक विकार आणि विविध दीर्घकालीन आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करते. जगातील सर्वात निरोगी देशांच्या या आहार-वैशिष्ट्यांचा धडा इतकाच की, पचनसुलभ, नैसर्गिक, पोषक आणि संयमी आहारच दीर्घायुषी आरोग्याचा पाया असतो.
धडा दुसरा : व्यायाम म्हणजे जिमला जाणे, असा संकुचित द़ृष्टिकोन या देशांनी स्वीकारलेलाच नाही. स्वित्झर्लंडमध्ये चालणे आणि सायकलिंग ही प्रवासाची अत्यंत सामान्य माध्यमे आहेत. स्वीडनमध्ये ‘अल्यमान्स्रेटेन’ म्हणजेच प्रत्येकाचा हक्क ही संकल्पना लोकांना कोणत्याही ऋतूत निसर्गात राहण्यास प्रोत्साहित करते. चालण्यासाठी किंवा सायकलसाठी संरक्षित मार्ग, स्वच्छ सार्वजनिक जागा आणि पर्यावरणाच्या संगोपनाचा सामाजिक आग्रह, या घटकांनी तिथल्या लोकांना नैसर्गिकरीत्या सक्रिय ठेवले आहे. जगभरातील संशोधकांच्या मते, अशी सतत हालचाल रक्ताभिसरण सुरळीत ठेवते, हृदयरोगांचा धोका कमी करते, मन:स्वास्थ्य सुधारते आणि शरीर-मनाचा समतोल दीर्घकाळ टिकवते. या देशांचे उदाहरण स्पष्ट सांगते की, सक्रियता हा व्यायामाचा भाग नसून ती जीवनशैली आहे.
धडा तिसरा : आरोग्यवृद्धीतील तिसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे समूहासोबत जीवन आणि सामाजिक नात्यांची जपणूक. आईसलँडसारख्या छोट्या पण अत्यंत सुद़ृढ समाजांत कुटुंब आणि मित्रांशी असलेल्या संबंधांना ज्या प्रकारे प्राधान्य दिले जाते, ते भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनमोल ठरते. संशोधने सातत्याने दाखवतात की, ज्या समाजांत सामाजिक आधार मजबूत असतो, तिथे नैराश्य, चिंता आणि तणावजन्य आजारांचे प्रमाण कमी असते; उलट एकाकीपणा आणि सामाजिक अलिप्तता हे अकाली मृत्यूचे महत्त्वाचे कारण ठरतात. थोडक्यात, एकटेपणा नव्हे, तर समुदायाशी जोडलेले जीवनच दीर्घकाळ आरोग्य टिकवते.
धडा चौथा : आजारी पडल्यावरच उपचार शोधण्याची वृत्ती या देशांनी खूप आधीच बाजूला ठेवली आहे. सिंगापूरमध्ये तर नियमित तपासण्या, लसीकरण, स्क्रीनिंग, आणि लवकर हस्तक्षेप या गोष्टी सरकारी पातळीवर काटेकोरपणे राबविल्या जातात. लहान तक्रारीतून मोठे आजार निर्माण होऊ नयेत, हे तत्त्व त्यांच्या आरोग्यव्यवस्थेने खोलवर रुजविले आहे. अशी धोरणात्मक, प्रणालीबद्ध, सर्वांसाठी खुली आणि सुलभ असलेली आरोग्यसेवा समाजाच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. सरकार यासाठी व्यवस्था निर्माण करते; पण आपली जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असते. स्वत:च्या तपासण्या, लसीकरण आणि नियमित आरोग्यनियोजन यांच्या सातत्याने व्यक्ती दीर्घकाळ तंदुरुस्त राहू शकते.
सारांश, आरोग्य ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे, ती एखाद्या आठवड्याच्या आहार योजनेची किंवा महिनाभराच्या व्यायाम मोहिमेची देणगी नाही. जपानसारख्या दीर्घायुषी समाजांत, शंभर वर्षे जगलेल्या नागरिकांच्या आयुष्याचा अभ्यास सांगतो की, त्यांच्यासाठी तंदुरुस्ती ही एक कृती नसून ‘जीवनशैली’ आहे.