Lack Of Sleep Side Effects Canva
आरोग्य

Lack Of Sleep Side Effects| झोप पूर्ण न झाल्याने शरीरात होऊ शकतात हे ६ गंभीर आजार, तज्ज्ञांनी दिली माहिती

Lack Of Sleep Side Effects| दररोज पुरेशी झोप घेणे हे आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी अन्न आणि पाण्याइतकेच महत्त्वाचे आहे.

shreya kulkarni

Lack Of Sleep Side Effects

दररोज पुरेशी झोप घेणे हे आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी अन्न आणि पाण्याइतकेच महत्त्वाचे आहे. झोप म्हणजे केवळ आराम करणे नव्हे, तर शरीराची दुरुस्ती, मेंदूची स्वच्छता आणि मानसिक शांतीसाठी ती एक आवश्यक प्रक्रिया आहे. झोपेच्या वेळी आपले शरीर अनेक महत्त्वाची कामे करते, जसे की - स्नायूंची दुरुस्ती करणे, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे, हार्मोन्स संतुलित करणे आणि मेंदूत साठवलेली माहिती व्यवस्थित लावणे. जर रोज झोप पूर्ण झाली नाही, तर हळूहळू त्याचा परिणाम प्रत्येक अवयवावर आणि शरीराच्या कार्यप्रणालीवर दिसू लागतो.

झोपेच्या कमतरतेमुळे कोणत्या आजारांचा धोका वाढतो?

प्रौढ व्यक्तींनी दररोज ७ ते ९ तास झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना तर यापेक्षाही जास्त झोपेची गरज असते. पण आजच्या धावपळीच्या जीवनात अभ्यासाचा ताण, मोबाईल किंवा लॅपटॉपचे व्यसन, कामाचे टेन्शन किंवा रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर सक्रिय राहणे, ही सर्व झोप चोरणारी कारणे बनली आहेत.

१. एकाग्रता कमी होणे आणि चिडचिड

झोपेच्या कमतरतेचा सर्वात पहिला परिणाम तुमच्या एकाग्रतेवर होतो. तुम्हाला दिवसभर थकल्यासारखे वाटते, छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडचिड होते आणि मेंदू नीट काम करत नाही. यामुळे स्मरणशक्ती कमी होणे आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

२. हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका

सतत झोप कमी घेतल्याने रक्तदाब (Blood Pressure) वाढू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

३. मधुमेहाचा (Diabetes) धोका

झोपेच्या वेळी शरीर इन्सुलिनला संतुलित करते. पण जेव्हा झोप पूर्ण होत नाही, तेव्हा शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव कमी होतो आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका निर्माण होतो.

४. वजन वाढणे आणि लठ्ठपणा

झोपेच्या कमतरतेमुळे शरीराची चयापचय क्रिया (Metabolism) मंदावते, ज्यामुळे वजन वाढू लागते. पचनसंस्थेवरही परिणाम होतो, ज्यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि भूक न लागणे यांसारख्या समस्या सुरू होतात.

५. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे

झोप पूर्ण न झाल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. अशा व्यक्तींना वारंवार सर्दी, खोकला, इन्फेक्शन यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते, कारण त्यांचे शरीर संक्रमणाशी नीट लढू शकत नाही.

६. त्वचेच्या समस्या

झोपेच्या कमतरतेचा परिणाम त्वचेवरही दिसतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे, पिंपल्स (मुरुमे) आणि त्वचेत कोरडेपणा यांसारख्या समस्या दिसू लागतात.

चांगल्या झोपेसाठी काय करावे?

  • रोज ध्यान (मेडिटेशन) करा.

  • झोपण्याच्या १ तास आधी मोबाईल किंवा लॅपटॉप वापरणे टाळा.

  • रात्री चहा किंवा कॉफी पिऊ नका.

  • त्रास जास्त होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT