आरोग्य

जाणून घ्या ‘COPD’ या फुफ्फुसांच्या विकाराची कारणे, लक्षणे आणि उपाय

backup backup

नोव्हेंबर महिन्यातील तिसर्‍या बुधवारी जागतिक सीओपीडी दिन म्हणून, ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग्ज डिसीजेस ( ॠजङऊ) या जागतिक संस्थेच्या वतीने इ. स. 2002 पासून जगभर साजरा केला जातो. या निमित्ताने एक घोषवाक्य जाहीर केले जाते. यावर्षीचे घोषवाक्य आहे-फुफ्फुसे… तुमच्या जीवनासाठी!

सीओपीडी हा दीर्घकालीन टिकणारा चिवट श्वसनविकार आहे. दीर्घकाळ साथ करणारा, श्वसनास अडथळा आणणारा फुप्फुसांचा विकार म्हणजे सीओपीडी. जगभरात वेगाने वाढत चाललेल्या सीओपीडीचा मृत्यूच्या आकडेवारीत सीओपीडीचा तिसरा क्रमांक लागतो. कोणत्याही प्रकारचा धूर विशेषतः सिगारेट- विडीचा धूर हा सीओपीडीचा प्रमुख कारणीभूत घटक आहे. प्रदूषणकारी विविध घटक उदा. सल्फर डायऑक्साइड, नायट्रेटस, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डाय ऑक्साइड, वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म घटक (पार्टिक्युलेट मॅटर्स – पीएम), लेड, हवेतील बाष्प कण आणि इतर कण (व्होलाटाईल कंपऊंड) अशा वेगवेगळ्या घातक घटकांमुळे सीओपीडीचा त्रास संभवतो. विविध प्रकारे धुम्रपान करतात, त्या व्यक्तींना कालांतराने सीओपीडी होतोच; पण स्वतः धुम्रपान न करताही, जर आजूबाजूला धुम्रपान करत असतील तर त्यांनाही 'सीओपीडी'चा धोका संभवतो.

कारखाने, गिरण्या, पेट्रोल, डिझेलवर किंवा ज्वलनशील गॅसवर चालणार्‍या वाहनांमुळेही प्रदूषण होते. चुलीचा-बंबाचा धूर, लाकूड, शेण्या किंवा कचरा पेटविल्यामुळे होणारा धूर या सर्वांमुळे फुप्फुसातील सूक्ष्म श्वासवाहिन्या-वायुकोश यांच्या आकुंचन-प्रसरणावर परिणाम होतो. आणि फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते. यालाच सीओपीडी म्हणतात. प्रदूषित वातावरणात दीर्घकाळ राहणार्‍यांना तसेच, रस्त्यावर, चौकात ज्यांची कार्यालये किंवा दुकाने आहेत, उदरनिर्वाहासाठी, नोकरीसाठी, धंद्यासाठी ज्यांना रस्त्यावर आपला वेळ व्यतित करावा लागतो, ज्यांची घरे रस्त्यावर आहेत, अशा सर्वांना तसेच खाणकाम किंवा रस्त्याचे काम करणार्‍या व्यक्तींना सीओपीडीचा धोका संभवतो.
सुरुवातीच्या टप्प्यात, थोडासा दम लागणे श्वास लागणे किंवा व्यायामानंतर दम लागणे अशा तक्रारी दिसतात; अधूनमधून सौम्य खोकला येणे, सकाळी उठल्यावर वारंवार घशात कफ येणे या तक्रारी आढळतात. अशा व्यक्तींच्या बाबतीत दैनंदिन जीवनात काही बदल झालेले आढळतात; पायर्‍यांचा वापर करणे, शारीरिक श्रम करणे, भरभर चालणे अशा क्रिया या व्यक्ती टाळतात. नंतरच्या टप्प्यात छातीतून घरघर आवाज येणे, श्वास घेणे खूपच कठीण होत जाणे, थुंकीचा घट्टपणा किंवा थुंकीचे प्रमाण वाढणे,

वारंवार सर्दी, फ्ल्यू सारखी लक्षणे दिसणे एवढेच नव्हे तर श्वसनमार्गात जंतूसंसर्ग किंवा न्यूमोनिया होणे, अशक्तपणा येणे अशी लक्षणे दिसून येतात. सीओपीडीच्या रुग्णांनी जर आपल्या आजाराकडे दुर्लक्ष केले तर फुफ्फुसांची हानी होत जाते आणि नंतर लक्षणे अधिक तीव— होत जातात व ती कशामुळे आहेत हे लक्षात येत नाही. विनाकारण थकवा येणे, शांत बसले असतानाही धाप खूप वाढणे, वजन कमी होणे, पायावर सूज येणे, कोणत्याही गोष्टीत रस न वाटणे, नखे निळसर होणे, बोलताना देखील दम लागणे, विस्मरण होणे, नैराश्य येणे, हृदयाचे ठोके वाढणे किंवा अनियमित होणे अशा अनेकविध प्रकारच्या तक्रारी आढळतात.

सीओपीडीचे निदान पल्मोनरी फंक्शन टेस्ट या चाचणीद्वारे केले जाते आणि त्यावरून औषधोपचार ठरवले जातात.
याशिवाय छातीचा एक्स-रे, डीएलसीओ टेस्ट, आरटेरिअल ब्लड गॅस विश्लेषण. प्रयोगशाळेतील रक्त तपासण्या, ईसीजी, इको कार्डिओग्राफी आणि इतर अनुषंगिक चाचण्या व्यक्ती-व्यक्तीनुसार ठरवाव्या लागतात. सीओपीडीसाठी श्वासावाटे घ्यावयाची औषधे अत्यंत परिणामकारक ठरतात. तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे आणि वेळेवर घेतल्यास सीओपीडीमुळे होणारा त्रास आटोक्यात राहू शकतो.

सीओपीडीमुळे हृदयविकार, फुफ्फुसाचा कॅन्सर आणि न्यूमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. सीओपीडीबरोबर जर हृदयविकार, मधुमेह असे विकार असतील तर अशा व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी लागते. नियमित औषधोपचारासह आहारयोजनाही महत्त्वाची असते. ज्यात सर्व अन्नघटकांचा समावेश असलेला सकस आहार घ्यावा. सीओपीडीच्या तीव—तेनुसार व्यायाम करणे आणि मानसिक ताणतणावांपासून दूर राहणे या बाबी सीओपीडीवर मात करतात.

सीओपीडीच्या पुढच्या टप्प्यात, छोट्या श्रमानेही दम लागतो. काही व्यक्तींना ऑक्सिजन घ्यावा लागतो. आपल्या आजूबाजूला असणारा प्राणवायू आपल्या पेशीपर्यंत नीटपणे पोहोचवायचा असेल तर, आपली फुफ्फुसे निरोगी असणे महत्त्वाचे. म्हणून फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी आपला परिसर स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवा.

डॉ. अनिल मडके

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT