घोरणे ही क्रिया व्याधी असू शकते, याची कल्पना आपल्यापैकी अनेकांना नसेल. याचे कारण आपल्या आजूबाजूची अनेक मंडळी घोरताना (how to control Snore) आढळून येतात. मात्र, घोरण्याच्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही जर घोरत असाल तर आपली वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे. याचे कारण जे लोक अनेक दिवसांपासून घोरतात त्यांना उच्च रक्तदाब, हृदयविकार यासारख्या गंभीर व्याधी होतात, असे दिसून आले आहे.
झोपेत माणूस घोरणे ही काही विशेष बाब राहिलेली नाही. अनेक जण झोपेत मोठमोठ्यांदा घोरत असतात. यापैकी अनेकांना आपण झोपेत घोरतो हेच मुळी माहीत नसते. घोरणे ही एक प्रकारची व्याधी आहे, हेही अनेकांना ठाऊक नसते. एका पाहणीत असे दिसून आले आहे की, 45 टक्के लोक अधूनमधून घोरत असतात; तर 25 टक्के लोक नेहमीच घोरत असतात. तुम्ही घोरत आहात याचा अर्थ तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत आहे. श्वास घेण्यास त्रास होणे ही व्याधी किंवा आजार दुर्मीळ नाही. अनेकांना श्वास घेण्याची समस्या दीर्घकाळापासून जाणवत असते; मात्र श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि त्याकडे तुम्ही अनेक दिवसांपासून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला गाढ झोप मिळू शकणार नाही.
गाढ झोप न मिळणे हे आरोग्यावर विपरित परिणाम करणारे असते. आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीसाठी तसेच मनाच्या शांतीसाठी गाढ झोप घेणे अत्यंत आवश्यक असते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या झोपेवर होताना दिसतो. घोरण्याचा अन्य व्यक्तींना होणारा त्रास हा वेगळाच असतो. म्हणूनच आपला व आपल्या कुटुंबियांचा विचार करून घोरण्याच्या समस्येवर मार्ग काढण्याचा निश्चय केला पाहिजे.
माणूस का घोरतो?
आपल्या श्वासनलिकेच्या जवळपास अतिरिक्त मेदयुक्त घटक जमा झाल्यामुळे श्वासनलिकेला जोडणार्या अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो. श्वासाच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आपल्या नैसर्गिकरित्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते. याचा परिणाम आपल्या घोरण्यात होतो. झोपताना तुमचे तोंड बंद असेल आणि तुम्ही घोरत असाल तर तुमच्या जीभेच्या रचनेचा संबंध त्याच्याशी जोडला जातो. झोपताना तुमचे तोंड उघडे असेल आणि तुम्ही घोरत असाल तर त्याचा संबंध श्वासनलिकेच्या आसपास जमा झालेल्या मेदयुक्त पदार्थांशी असतो. घोरणे म्हणजे झोपेत श्वास घेताना मोठा आवाज होणे. सर्दी किंवा अॅलर्जी झाल्यास अनेक जण घोरतात. मात्र असे घोरणे हंगामी स्वरूपाचे असते. सर्दी गेल्यावर किंवा अॅलर्जी दूर झाल्यावर अशा प्रकारचे घोरणे आपोआप थांबते. काही वेळा गर्भावस्थेतील महिला गळ्यात चरबीयुक्त भाग जमा झाल्यामुळे घोरतात असे दिसून आले आहे.
रात्री भरपूर झोप घेऊनही तुम्हाला सकाळी ताजेतवाने, उत्साही वाटत नसेल तर डॉक्टरांकडून आपल्या प्रकृतीची तपासणी करून घ्या. तुमच्यातील लक्षणांची पाहणी करून डॉक्टर तुम्हाला उपचार सुचवतील. याकरिता डॉक्टर रुग्णाच्या झोपेची संपूर्ण रात्रभर पाहणी करतात. अशा तपासणीत रुग्णाच्या शरीराला अनेक उपकरणे लावली जातात. या उपकरणातील शरीरातील हालचालींची नोंद ठेवली जाते. या उपकरणाद्वारे डोळे, मेंदू यांच्या हालचाली, हृदयाचे ठोके आणि शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण याची पाहणी केली जाते.
त्याआधारे रुग्ण नेमक्या कोणत्या कारणामुळे घोरतो यामागची कारणे शोधली जातात आणि त्यानुसार उपचार केले जातात. आपण स्वतःही आपल्या झोपेची वैद्यकीय पाहणी करू शकतो. बाजारात आपल्या झोपेच्या अवस्थेत शरीरातील वेगवेगळ्या हालचालींची नोंद ठेवणारे उपकरण मिळते. ज्यांना अनेक दिवसांपासून घोरण्याची समस्या जाणवत आहे अशा व्यक्तींना उच्च रक्तदाब, रात्री झोपेत छातीमध्ये दुखणे, एकाग्रता होऊ न शकणे, रक्तशर्करा नियंत्रणात न राहणे, फुफ्फुसांना संसर्ग होणे अशा व्याधी होण्याची शक्यता अधिक असते.
ज्या व्यक्ती अनेक दिवसांपासून घोरतात त्यांची हाडे ठिसूळ असतात, असे एका वैद्यकीय संशोधनातून दिसून आले आहे. सततच्या घोरण्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा करणार्या वाहिन्या प्रसरण पावतात. या रक्तवाहिन्यांचा काही भाग श्वासनलिकांच्या खूप जवळ असतो. घोरण्यामुळे होणार्या कंपनांचा परिणाम या रक्तवाहिन्यांवर होतो. या रक्तवाहिन्या प्रसरण पावल्यामुळे मस्तिष्काघात (ब्रेन हॅमरेज), तसेच रक्तवाहिन्या कडक होण्याची शक्यता अधिक असते. अशा स्थितीत हृदयाच्या कार्यावर अनिष्ट परिणाम होण्याची दाट शक्यता असते. श्वासनलिकेच्या वाहिन्यांमध्ये चरबीयुक्त पदार्थ जमा झाल्यामुळे या वाहिन्यांच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळेच आपल्या हृदयाच्या कार्यावर परिणाम होऊ द्यायचा नसेल तर घोरण्याच्या व्याधीवर त्वरेने उपचार करणे गरजेचे आहे.
घोरणे हे स्लीप अॅप्निया नामक व्याधीचे लक्षण असू शकते. स्लीप अॅप्निया या व्याधीमध्ये झोपेत श्वास घेण्यास त्रास होत असतो. या व्याधीमुळे रक्तामधील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. त्यामुळेच घोरणे सुरू होते. अनेकांना झोपेमध्ये आपली श्वास घेण्याची प्रक्रिया काही काळ बंद झालेली होती, हे समजतही नाही. अनेकदा श्वास घेणे थांबल्याने आणि गळा भरून आल्यामुळे (चोक झाल्यामुळे) झोपेतून जाग येते; मात्र ज्यांना स्लीप अॅप्निया ही व्याधी झालेली आहे अशी सर्व मंडळी घोरतात असेही नाही. एका पाहणीनुसार घोरणार्या लोकांपैकी 20 टक्के जणांना स्लीप अॅप्निया झालेला असतो. अधिक वजन असलेल्या महिलांना रजोनिवृत्तीनंतर स्लीप अॅप्नीया होण्याची शक्यता अधिक असते. वयोमानानुसार ही व्याधी होण्याची शक्यता बळावते. वैद्यकीय संशोधनानुसार घोरण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
1) जाडीमुळे श्वासनलिका आणि मुखनलिका यांच्यामध्ये चरबी जमा होणे.
2) वयोमानानुसार गळ्यातील नलिका आकुंचन पावणे. या कारणामुळे पुरुषांमध्ये घोरण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
3) मद्यपान, धूम्रपान आणि नैराश्य यांवर घेतल्या जाणार्या औषधांचा परिणाम म्हणून अनेक जण घोरतात.
4) अस्थमा आणि सायनस या कारणांमुळेही अनेक जण घोरतात.
5) ज्यांची टाळू व्यवस्थित भरली गेलेली नाही, तसेच ज्यांचा जिभेचा आकार प्रमाणापेक्षा मोठा आहे आणि टॉन्सिल्स या कारणांमुळेही घोरण्याची समस्या उद्भवू शकते.
जर तुम्ही खूपच मोठ्याने घोरत असाल आणि तुम्हाला दिवसभर थकल्यासारखे वाटत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. झोपेत श्वास घेण्यात अडथळे येणे, धाप लागणे अशी लक्षणे दिसत असली तरी डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून घ्या. तसेच बोलताना, टी.व्ही. बघताना, गाडी चालवताना अचानकपणे डोळा लागणे हेही लक्षण दुर्लक्षित करण्याजोगे नाही. ज्यांना घोरण्याची समस्या जाणवते आहे अशांनी त्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक ठरते. त्याकरिता आपले वजन कमी करण्याकडे लक्ष द्या. नियमित व्यायाम करा. झोपण्या अगोदर धूम्रपान, मद्यपान, गच्च जेवण करू नका. उताणे झोपण्याऐवजी कुशीवर झोपा. ज्या खोलीत तुम्ही झोपता त्या खोलीत पुरेशी हवा येते आहे याकडे लक्ष द्या. जाड उशी अथवा लोड घेऊन झोपा. जर घशात खवखव होत असेल तर पाण्यात मीठ घालून गुळण्या करा.
नियमित व्यायाम केल्यामुळे गळ्यातील मासपेशी मजबूत होतात. या मासपेशी मजबूत करण्याकरिता डॉक्टरांच्या सल्ल्याने खास गळ्यासाठीचे व्यायाम करा. ए-इ-आय-ओ-यू ही इंग्रजी अद्याक्षरे तीन मिनिटे मोठ्या मोठ्याने म्हणा. दिवसातून अनेकवेळा अशी कृती करा. तोंड उघडून खालच्या जबड्याला उजवीकडे न्या आणि तीस सेकंदांकरिता श्वास घेणे थांबवा. खालचा जबडा डावीकडे नेऊन पुन्हा तीस सेकंदांकरिता श्वास घेणे थांबवा. दिवसातून दोन तीन वेळा या कृती करा.
घोरणार्या प्रत्येक व्यक्तीवर सारखे उपचार होऊ शकतात असे नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील लक्षणे कशी आहेत, यावर त्याच्यावर केल्या जाणार्या उपचारांची दिशा ठरते. घोरण्यामागची कारणे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांकडून कोणत्या पद्धतीने उपचार करायचे हे ठरविले जाते. काही जणांच्या टाळूवर सोम्नोप्लास्टी नावाची शस्त्रक्रियाही केली जाते. भूल देऊन अशी शस्त्रक्रिया होते. या उपचारानंतर 77 टक्के रूग्णांचे घोरणे थांबले असे वैद्यकीय संशोधनात दिसले आहे. घोरण्यावर ओरल अॅप्लायन्स थेरपी या पद्धतीनेही उपाचर केले जातात.
बरेचजण घोरतात म्हणून घोरणे ही सर्वसामान्य समस्या आहे, त्यामुळे त्यात काही विशेष नाही, असे अनेक जण मानतात. तुम्ही तसे मानण्याची चूक करू नका. घोरणे हे लक्षण तुमच्या शरीरात काही तरी बिघाड झाल्याचे आहे. झोपताना शरीराला श्वास घेण्यात त्रास होतो आहे याचेही हे लक्षण आहे. त्याचबरोबर तुमच्या रक्तदाबात मोठी वाढ झालेली आहे किंवा तुम्हाला स्लिप अॅप्निया झाला आहे अशी सुद्धा शक्यता असते. स्लिप अॅप्नियावर वेळीच उपचार केला नाही तर हृदयविकाराचा झटका येण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. अनेक दिवसांपासून घोरणार्या व्यक्तींचा रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. घोरण्याचा आवाज नाकातून येत असतो. त्यामुळे नाक साफ केल्यावर घोरणे थांबू शकते असेही काही जाणांना वाटत असते.
नाक बंद झाल्यावर अनेकजण घोरतात हे जरी खरे असले तरी हे पूर्ण सत्य नाही. नुकत्याच झालेल्या वैद्यकीय संशोधनात असे दिसून आले आहे की, घोरण्यावर उपचार म्हणून ज्या व्यक्ती नाकावर शस्त्रक्रिया करून घेतात त्यांच्यापैकी फक्त दहा टक्के लोकांची स्लिप अॅप्निया व्याधी दूर होऊ शकते. ज्यांचे वजन जास्त असते अशांना घोरण्याची समस्या अधिक प्रमाणात जाणवते. ज्यांना स्लिप अॅप्निया झालेला असतो अशा व्यक्तींच्या शरीरात भूक लागणारी हार्मोन्स प्रमाणाबाहेर वाढतात. त्यामुळे अशा व्यक्तींची खा खा होते. उच्च रक्तदाब, मश्तिष्काघात आणि हृदयविकाराचा झटका अशा व्याधींमध्ये रुग्णांना अनुक्रमे 80 टक्के, 60 टक्के आणि 55 टक्के या प्रमाणात स्लिप अॅप्निया झालेला होता, असे एका पाहणीत दिसलेले आहे. घोरण्यावर कायमस्वरूपी उपचार असतो. त्यामुळे या व्याधीवर काही उपचार नाही असे समजू नका. या व्याधीवर शस्त्रक्रियेसाराखा उपचार करण्यापूर्वी अन्य उपचारांनी ही व्याधी बरी होते का? याची शक्यता पडताळून पहा. एखाद्या डॉक्टरने शस्त्रक्रियेचा सल्ला दिला तर दुसर्या डॉक्टरकडून त्याचा सल्ला घ्या.