डॉ. अनिल ब्राडू
कॅल्शियम, युरिक अॅसिड आणि इतर खनिजांच्या अतिरेकामुळे मूत्रपिंडामध्ये खडे तयार होतात. हा आजार स्त्री आणि पुरुष दोघांनाही होऊ शकतो. वेळीच उपचार न केल्यास ते गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतात.
जेव्हा लघवीमध्ये कॅल्शियम, ऑक्झॅलेट किंवा युरिक सिडचे प्रमाण वाढते, तेव्हा ते स्फटिकयुक्त कणांच्या रूपात किडनीत जमा होतात. लहान खडे दुर्लक्षित होऊ शकतात; परंतु मोठ्या खड्यांवर वेळेवर उपचार न केल्यास वेदना आणि गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. मूत्रपिंडातील खड्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी वेळीच उपचार करणे महत्त्वाचे असते.
मूत्रमार्गाचे संसर्ग (यूटीआय) : मूतखड्यांमुळे मूत्र प्रवाह रोखला जातो, ज्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग होतो. लघवी करताना जळजळ होणे, दुर्गंधीयुक्त लघवी, वारंवार लघवी होणे, ओटीपोटात दुखणे आणि लघवीवाटे रक्त येणे अशी लक्षणे जाणवू शकतात.
हायड्रोनेफ्रोसिस :
मूत्र विसर्जनास अडथळा आल्याने मूत्रपिंडाला सूज येते. शिवाय त्यामुळे मूत्रावाटे रक्तस्राव होणे आणि मळमळणे तसेच उलट्या देखील होतात.
दीर्घकालीन मूत्रपिंड रोग :
वारंवार खडे होणे हे कालांतराने मूत्रपिंडाच्या ऊतींना नुकसान पोहोचवू शकते आणि दीर्घकालीन मूत्रपिंड रोगाचा धोका वाढू शकतो.
मोठे खडे बाहेर पडल्याने मूत्रमार्गाचे नुकसान होते आणि व्रण उठल्याने आरोग्यावर परिणाम होतो.
* निर्जलीकरण किंवा पाणी कमी पिणे.
* मीठ, साखर किंवा प्रथिनांचे अतिप्रमाणातील सेवन.
* लठ्ठपणा.
* मूत्रपिंडातील खड्यांचा कौटुंबिक इतिहास.
* मूत्रमार्गात संसर्ग किंवा सांध्यांचे विकार यासारख्या वैद्यकीय परिस्थिती मूत्रपिंडातील खड्यांची निर्मिती हे कारण ठरू शकतात.
* ओटीपोटाच्या खालच्या भागात किंवा कंबरेत वेदना.
* लघवी करताना वेदना.
* गुलाबी, लाल किंवा फेस येणारी लघवी.
* वारंवार लघवी करण्याची इच्छा. मळमळ किंवा उलट्या.
* या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि त्वरित निदान आणि व्यवस्थापनासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* लहान खडे जास्त पाणी पिऊन आणि वेदनाशामक औषधांनी नैसर्गिकरीत्या निघून जातात. मोठ्या खड्यांना शॉक वेव्ह थेरपी (लिथोट्रिप्सी), युरेटेरोस्कोपी किंवा दुर्बीण शस्त्रक्रियासारख्या प्रक्रियांची गरज भासते.
* दररोज भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करावा, आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे, रोजच्या आहारात लिंबू आणि संत्री यांसारखी लिंबूवर्गीय फळांचा समावेश करावा.
* वजन नियंत्रित राखावे आणि पूर्वी खडे झाले असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याचे तंतोतंत पालन करावे. आपल्या मूत्रपिंडाच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे आणि वेळीच उपचार करावेत.