डॉ. तरुण जैन
मूत्रपिंडातील खडे ही बर्याच लोकांमध्ये सामान्यतः उद्भवणारी समस्या आहे, यामुळे मूत्रपिंडाचा तीव्र रोग होऊ शकतो आणि शेवटी मूत्रपिंड निकामी होऊ शकते. भविष्यात मूत्रपिंडाच्या समस्या टाळण्यासाठी आपल्या द्रवपदार्थाचे सेवन करणे, संतुलित आहाराचे पालन करणे, योग्य प्रमाणात कॅल्शियम घेणे तसेच नियमित तपासणीसाठी जाणे आवश्यक आहे. एकूण लोकसंख्येपैकी 12 टक्के नागरिक मूतखड्याच्या विकाराने त्रस्त आहेत. तर, मूतखड्यासारख्या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्याने 50 टक्के व्यक्तींना किडनी फेल्युअरसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे.
आपल्या मूत्रपिंडाचे मुख्य कार्य म्हणजे मूत्र तयार करण्यासाठी रक्तातील कचरा आणि द्रव बाहेर टाकणे. परंतु, अशा बर्याच समस्या आहेत ज्या आपल्या मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळे निर्माण करतात. पुरेसे पाणी न पिणे, लठ्ठपणा, कौटुंबिक इतिहास, काही औषधे, पॉलीसिस्टिक मूत्रपिंडाचा रोग आणि यूरिक अॅसिड आणि कॅल्शियमची उच्च पातळी आदी कारणांमुळे मूत्रपिंडात खडे तयार होऊ शकतात. मूतखड्यांमुळे मूत्रपिंडावर दाब आला असेल, तर मूत्रपिंड कायमचे निकामी होऊ शकते. मूतखड्याची लक्षणे ही खडा कोठे आहे यावर अवलंबून असतात. क्ष-किरण तपासणीत (साधा क्ष-किरण फोटो वा शिरेतून विशिष्ट रंग शरीरात टोचून काढलेले मूत्रपिंडाचे फोटो) मूतखड्याचे निदान होऊ शकते. खड्याचा प्रकार व जागा यावरून भरपूर पाणी पिऊन तो पाडायचा प्रयत्न करणे, शस्त्रक्रिया करून काढून टाकणे, ध्वनिलहरींचा वापर करून खडा फोडून मूत्रमार्गे त्याचे कण बाहेर टाकणे, आदी उपाय करता येतात.
मूत्रमार्गातील वेदना, मळमळ, पोटदुखी, उलट्या आणि वारंवार लघवी करण्याची तीव्र इच्छा अशी लक्षणे आढळल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मूत्रपिंडातील खड्यांकडे दुर्लक्ष केल्यास तसेच उपचारास विलंब केला तर मूत्रपिंडाचे विविध आजार बळावण्याची शक्यता वाढते. आपले मूत्रपिंड कार्य करणे थांबवू शकते.
म्हणूनच आपल्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुरेसे द्रव पदार्थांचे सेवन करा. साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या द्रवपदार्थांचे सेवन करणे टाळा. दररोज व्यायाम करा, आहारात मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा आणि किडनी स्टोन सारख्या समस्या रोखण्यासाठी प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जंक फूडचे सेवन टाळा. ताजी फळे, भाज्या, कडधान्ये आणि तृणधान्याचा आहारात समावेश करा. आपल्या शरीरातील कॅल्शियमच्या पातळीचे निरीक्षण करा. मूत्रपिंड निकामी होऊ नये म्हणून किडनी स्टोन असलेल्यांनी नियमित तपासणीसाठी जावे. वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.