उष्माघातापासून वाचवणारं कैरीचे आरोग्यदायी पन्हे   Kairi Panhe Recipe
आरोग्य

Kairi Panhe Recipe : उष्माघातापासून वाचवणारं कैरीचे आरोग्यदायी पन्हे  

उष्माघातापासून वाचवणारं कैरीचे आरोग्यदायी पन्हे  

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुडीपाडवा साजरा झाला की, फळांचा राजा असे बिरुद मिरवणार्‍या आंबा फळाची चर्चा सुरु हाेते. आंबा कच्चा असो (कैरी) वा पिकलेला तो चवीने खातात. कच्चा आणि पिकलेल्या आंब्यापासुन आपण बरेच चविष्ट आणि आरोग्यदायी बनवतो. कच्च्या आंब्यापासून (कैरी) लोणचं, चटणी, पन्हे असो वा पिकलेल्या आंब्यापासुन बनवलेलं गोड असा आमरस, मँगो मिल्क शेक, असे एकापेक्षा एक पदार्थ चविष्ट पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत, कच्च्या आंब्यापासून (कैरी) बनवलेलं आंबट गोड स्वाद असलेले पन्हे. (Kairi Panhe)

रणरणता उन्हाळा सुरू झाला की, नक्कीच कैरीच्या पन्ह्याची आठवण येते. हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. तसेच त्‍याचे आराेग्‍यालाही अनेक फायदे आहेत. कैरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स हे घटक आपल्या आरोग्यदायी असतात. तुम्हाला उष्माघाताचा त्रास होत असेल तर पन्हेचे सेवन नक्की करा. चला तर मग पाहूया आंबट गोड स्वाद असलेल्या आंब्याच्या पन्ह्याची रेसिपी.

Kairi Panhe कैरीचं पन्हं – साहित्य

  • मध्यम आकाराचे ५ ते ६ कच्चे आंबे (कैरी)

  • १५ ते २० पुदिन्याची ताजी पाने

  • अर्धा चमचा काळी मिरी पावडर

  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर १ चमचा

  • २०० ग्रॅम साखर (तुम्हाला गुळ आवडत असेल तर गुळही घालू शकता)

  • वेलची आणि केशर

  • काळे किंवा पांढरे मीठ चवीनुसार

  • आवश्यकतेनुसार बर्फाचे छोटे तुकडे

Kairi Panhe : पन्हे बनविण्याची पध्दत

  • कैरी कुकरमध्ये घ्या आणि त्यामध्ये कमीत-कमी २ ग्लास पाणी घाला.

  • कुकरची एक शिट्टी होईपर्यंत कैरी गरम करुन घ्या.

  • थोड्यावेळाने कुकर थंड झाल्यावर कैरी काढून घ्या आणि त्यातील पाणी गाळून घ्या.

  • कैरीची साल आणि कोय बाजुला करुन घ्या.

  • गर बाजुला करुन तो मिक्सरला बारिक करुन घ्या.

  • बारीक गरमध्ये भाजलेले जिरे पूड, काळे मीठ किंवा पांढरे मीठ, साखर, पुदिन्याची पाने, वेलची पावडर घालून पुन्हा बारीक करुन घ्या.

  • गरजेनुसार थंड पाणी घालून ढवळा आणि चांगले मिक्स झाले की गाळून घ्या.

  • ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घाला आणि वरुन केशर घाला.

  • झालं तुमचं थंडगार, आरोग्यदायी असं कैरीचं पन्हं

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT