डॉ. निकिता कोहली
इटालियन खाद्यपदार्थांमधील ‘व्हाईट सॉस पास्ता’ हा अनेकांचा, विशेषतः तरुणाईचा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे. मात्र, आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते या पदार्थाच्या वारंवार सेवनाने काही गंभीर समस्या उद्भवू शकतात. व्हाईट सॉस पास्ता बनवताना वापरले जाणारे घटक हे आयुर्वेदानुसार ‘विरुद्ध आहार’ या श्रेणीत येतात आणि ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
व्हाईट सॉस पास्ता तयार करताना मैदा, लोणी, मीठ आणि दूध या मुख्य घटकांचा वापर केला जातो. आयुर्वेद शास्त्रानुसार, दूध आणि मीठ यांचे एकत्र सेवन करणे हे अत्यंत चुकीचे अन्न संयोजन आहे. दुग्धजन्य पदार्थांसोबत मिठाचा वापर केल्यास शरीरातील दोषांचे संतुलन बिघडते. या विसंगत आहारामुळे ‘विटिलिगो’ म्हणजेच ज्याला आपण सामान्य भाषेत पांढरे डाग म्हणतो, अशा त्वचारोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. ज्या व्यक्तींंना आधीच त्वचेच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी असे पदार्थ आजार बळावण्यास कारणीभूत ठरतात.
कधीतरी एकदा असा पास्ता खाल्ल्याने लगेच आजार होत नाही. मात्र, जर तुम्ही वारंवार बाहेर हॉटेलमध्ये जाऊन किंवा घरच्या घरी बनवून हा पास्ता खात असाल, तर तुम्ही विटिलिगोसारख्या आजाराच्या निशाण्यावर असू शकता. दूध आणि मीठ यांच्या या चुकीच्या संयोगामुळे शरीरात साठलेले टॉक्सिन्स त्वचेवर पांढरे डाग निर्माण करू शकतात आणि हे डाग शरीराच्या इतर भागांत वेगाने पसरण्याची शक्यताही वाढते.
विटिलिगो हा एक त्वचारोग आहे, ज्यामध्ये त्वचेच्या विशिष्ट भागातील रंगद्रव्य नष्ट होते. आपल्या त्वचेला नैसर्गिक रंग देणार्या ‘मेलानिन’ या घटकाचे उत्पादन पेशींमधून बंद झाल्यामुळे त्वचेवर पांढर्या रंगाचे डाग दिसू लागतात. या बाधित भागातील केसांचा रंगही बदलून ते पांढरे किंवा चंदेरी होतात. त्यामुळे जिभेचे चोचले पुरवताना आपल्या आरोग्याचा आणि विशेषतः शरीरातील अंतर्गत संतुलनाचा विचार करणे आवश्यक आहे. व्हाईट सॉस पास्तासारखे ‘विरुद्ध आहार’ टाळणे हाच अशा आजारांपासून दूर राहण्याचा उत्तम मार्ग आहे.