आपण जर प्रयत्न केला, तर उशी न घेतादेखील चांगली झोप लागू शकते. उशी न घेता, घेतलेल्या या झोपेमुळे आपल्याला जास्त फायदा होतो.
उशी न घेता झोपल्याने आपली मान आणि पाठीचा कणा योग्य स्थितीत राहतो. विशेषतः, ज्यांना पोटावर झोपण्याची सवय असते त्यांच्यासाठी ही बाब गरजेची आहे. जाड उशी वापरल्याने मान वरच्या दिशेने झुकल्याने त्यावर ताण येऊ शकतो, तर सपाट पृष्ठभागावर झोपल्याने पाठीचा कणा तटस्थ राहतो आणि मणक्यावर वेदना किंवा दबाव येत नाही. मान आणि पाठदुखी कमी होते : खूप उंच उशी वापरल्याने मानेच्या मणक्याचे संरेखन बिघडू शकते, ज्यामुळे कडकपणा आणि अस्वस्थता येते. उशी काढून टाकल्याने मानेवरील दबाव आणि तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते. सामान्यतः, मानदुखी असलेल्या लोकांना याचा नक्कीच फायदा होतो. झोपेच्या चुकीच्या स्थितीमुळे ज्यांना दीर्घकालीन मानेच्या वेदनांची समस्या उद्भवते त्यांना उशी न वापरण्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
मान आणि खांद्यावर ताण : कुशीवर झोपणार्यांना उशीशिवाय झोपल्यास ताण येऊ शकतो. कारण, त्यांच्या डोक्याला मणक्याशी जुळवून घेण्यासाठी आधाराची आवश्यकता असते. आधाराच्या अभावामुळे मान आणि खांद्यातील स्नायूंचा कडकपणा किंवा वेदना होऊ शकतात. म्हणूनच, एखाद्याला तीव्र मानेच्या आणि खांद्याच्या वेदना उद्भवू शकतात. यासाठी मऊ समांतर उशी गरजेची असते. पोटावर झोपणार्यांना उशीशिवाय झोपल्याने फायदा होतो. पाठीवर आणि कुशीवर झोपणार्यांना योग्य पाठीचा कणा राखण्यासाठी काही प्रमाणात आधाराची आवश्यकता असते. तज्ज्ञांच्या सल्ल्याने उशी वापरणे किंवा उशीचा वापर हळूहळू टाळणे योग्य राहील.
उशीशिवाय झोपण्यासाठी टिप्स : सुरुवातीला पूर्णपणे उशीशिवाय झोपण्यापूर्वी केवळ जाड उशी वापरणे टाळा. कमी जाडीची उशी वापरुन पाहा. असे केल्यास तुमची मान आणि मणक्याला नवीन स्थितीत जुळवून घेण्यास मदत होईल. उशी न वापरता पाठीचा कणा योग्यरीत्या स्थितीत राखण्यासाठी मजबूत आधार देणारी गादी वापरा. उशी न वापरल्याने जर तुमच्या मानेला आधार मिळत नसेल, तर थोड्या उंचीकरिता आणि हळूहळू जुळवून घेण्यासाठी तुमच्या मानेखाली एक छोटा गुंडाळलेला टॉवेल ठेवा. उशीशिवाय झोपल्याने सतत अस्वस्थता किंवा वेदना होत असतील, तर कमी जाडीची उशी वापरा किंवा याबद्दल आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.