डॉ. मनोज शिंगाडे
प्रवासात असताना अनेक जण सोयीसाठी गाडीतच पाण्याच्या काही प्लास्टिकच्या बाटल्या ठेवून देतात. प्रवास संपल्यानंतरही त्या बाटल्या अनेकदा गाडीतच पडून राहतात. बाटलीबंद असल्याने त्यातील पाणी नंतरही पिण्यास सुरक्षित असेल, असा समज असतो; मात्र तो चुकीचा आहे.
गाडीत ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी आरोग्यास अपायकारक ठरू शकते. गाडीत साठवून ठेवलेले पाणी उष्णतेमुळे आणि हवेशीर वातावरणाच्या अभावामुळे जीवाणूंसाठी आदर्श माध्यम ठरते. प्लास्टिकच्या बाटलीतील स्थिर, गरम झालेले पाणी हे बॅक्टेरियांच्या वाढीस पोषक असते. विशेषतः बाटली एकदा उघडली असेल किंवा तोंडाला लावून पाणी प्यायले असेल, तर लाळेमधील सूक्ष्मजीव पाण्यात मिसळतात. अशा पाण्यात ई. कोलाई किंवा स्यूडोमोनाससारखे जीवाणू वाढू शकतात. अशा पाण्याचे सेवन केल्यास पोटदुखी, अतिसार, उलटी, ताप यांसारख्या तक्रारी उद्भवू शकतात आणि काही वेळा अन्न विषबाधेपर्यंत परिस्थिती जाऊ शकते.
उन्हात उभी असलेली, बंद असलेली गाडी काही वेळातच प्रचंड तापते आणि या तापमानात जीवाणूंची वाढ झपाट्याने होते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. उष्णतेचा परिणाम केवळ जीवाणूंपुरता मर्यादित राहत नाही, तर पाण्याच्या गुणवत्तेवरही होतो. गाडीत दीर्घकाळ ठेवलेल्या प्लास्टिक बाटलीतील पाण्याचा वास आणि चव बदललेली अनेकांनी अनुभवली असेल. उष्णतेच्या संपर्कामुळे प्लास्टिक आणि पाण्यात रासायनिक प्रतिक्रिया घडू शकते. पाणी तांत्रिकद़ृष्ट्या पिण्यायोग्य असले, तरी ते ताजे राहात नाही. चवीतील बदल हादेखील पाणी दूषित झाल्याचा संकेत मानला जातो.
बहुतांश डिस्पोजेबल पाण्याच्या बाटल्या पॉलिइथिलीन टेरेफ्थेलेट या प्लास्टिकपासून बनवलेल्या असतात. उच्च तापमानाच्या संपर्कात आल्यावर या बाटल्यांमधून काही रसायने पाण्यात झिरपू शकतात. उन्हात उभ्या असलेल्या गाड्यांमधील तापमान सहजपणे खूप वाढते आणि त्यामुळे ही प्रक्रिया वेगाने घडते. अशा परिस्थितीत अँटिमनीसारख्या विषारी घटकांचे प्रमाण पाण्यात वाढू शकते, जे दीर्घकाळ आरोग्यास घातक ठरू शकते.