आरोग्य

आयोडीनची कमतरता आणि हायपोथायरॉइडिज्म | पुढारी

Pudhari News

डॉ. संतोष डफळे

आयोडीन डिफीसियन्सी म्हणजे काय?

आयोडीन हा थायरॉइड होर्मोनच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेला एक महत्त्वपूर्ण मायक्रो-न्यूट्रियंट आहे. आयोडीन डिफीशियन्सी ही आयोडीन तत्त्वाची कमतरता असते, हे आपल्या डाएटचे एक आवश्यक पोषण तत्त्व आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे हायपोथायरॉइडिज्म होतो. जर वेळेच्या आत याचा उपचार करण्यात आला नाही तर गर्भधारणेत समस्या येणे, वंध्यत्व, नवजात बालकात मज्जातंतू तंत्राशी संबंधित समस्या इत्यादी होण्याचा धोका वाढतो.       

लक्षणे

काही लोकांमध्ये आयोडीनची पातळी कमी झाल्यासही कोणतीच लक्षणे दिसून येत नाहीत. अशी तर अनेक लक्षणे आहेत ज्यांच्याद्वारे हायपोथायरॉइडिज्मची ओळख पटवली जाऊ शकते. ती पुढीलप्रमाणे ः

–   थकवा आणि झोपेची गुंगी येणे

–   स्नायूंमधील अशक्‍तपणा

–   मासिक पाळीशी संबंधित समस्या

–   लक्ष केंद्रित करण्यात समस्या येणे

–   स्मरणशक्‍ती कमी होणे

–   असामान्यपणे वजन वाढणे

–   औदासीन्य

–   केस गळणे

–   त्वचा कोरडी पडणे

–   हृदयाचे ठोके कमी होणे

आयोडीनची कमतरता आणि वंध्यत्वाचे कारण

महिलांच्या शरीरातील आयोडीनच्या कमतरतेचा त्यांच्या प्रजनन तंत्राच्या कार्यपद्धतीशी सरळ संबंध आहे. हायपोथायरॉइडिज्म हे वंध्यत्व व गर्भपाताचे सर्वात महत्वाचे कारण आहे. जेव्हा थायरॉइड ग्लँडची कार्यप्रणाली संथ पडते, तेव्हा तिला पुरेशा प्रमाणात होर्मोन्सचे उत्पादन करता येत नाही. यामुळे अंडाशयातून अंड्यांना उत्पादित करण्यात अडथळा निर्माण होतो आणि हे वंध्यत्वाचे कारण बनते. ज्या महिला हायपोथायरॉइडिज्मला बळी पडतात त्यांच्यात  समागमात निरसता, मासिक पाळीशी संबंधित समस्या व गर्भधारणा करण्यात समस्या येणे हे पाहण्यात आले आहे. हायपोथायरॉइडिज्मने बाधित महिलांनी गर्भधारणा जरी केली तरी गर्भाचा विकासावर परिणाम होतो.

हायपोथायरॉइडिज्मला आळा घालताना…

धूम्रपान बंद करा

धूम्रपान थायरॉइडवर थेट प्रभाव टाकते, यासोबतच निकोटीन शरीरातून आयोडीनला शोषून घेते, ज्यामुळे होर्मोनचा स्राव होणे यावर परिणाम होतो. हे वंध्यत्वात योगदान देणारे सर्वात मोठे कारण आहे.

बाटलीबंद पाणी पिणे

या पाण्यात असलेले फ्लोराइड व परक्लोरेट हे तत्त्व आहेत जे हायपोथायरॉइडिज्मला साहाय्य करतात किंवा थायरॉइडशी निगडित इतर समस्यांची कारणे ठरतात.

योग्य प्रमाणात आयोडीनचे सेवन करा

आयोडीनचे सेवन योग्य प्रमाणात करायला हवे. जास्त किंवा कमी प्रमाणात आयोडीनचे सेवन केल्याने आयोडीनशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होते.

ताणतणाव कमी करा

नियमितपणे योग व ध्यान करावे. याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल, जी थायरॉइडचा अटकाव करण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकते.

सोया उत्पादनांचे सेवन जास्त प्रमाणात करू नये

जास्त प्रमाणात सोया आयसोफ्लेवोन्स हायपोथायरॉइडिज्म, गॉयटर किंवा नोड्युल्सला साहाय्य किंवा गंभीर परिणाम करू शकतात. सोया सप्लिमेंट्स व पावडरचे सेवन कमी प्रमाणात करावे. दिवसभरात सोयाबीनचा पदार्थ एकापेक्षा जास्त खाऊ नये आणि तेही कमी प्रमाणात.

नवजात बालकाला सोया-बेस्ड पदार्थ देऊ नये

ज्या मुलांना फार कमी वयात सोयाबीनयुक्‍त उत्पादने खाण्यास दिली जातात त्यांच्या मोठेपणी थायरॉइड रोगाच्या धोक्यात वाढ होते.

हायपोथायरॉइडिज्मचा उपचार

वंध्यत्व दूर करण्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नांमध्ये हायपोथायरॉइडिज्मचा उपचार करणे एक महत्त्वाचा भाग आहे. जर हायपोथायरॉइडिज्मचा उपचार केल्यानंतरही वंध्यत्वाची समस्या तशीच राहिल्यास वंध्यत्वासाठी दुसर्‍या उपचारांची गरज पडते. गर्भवती महिलांनी लवकरात लवकर शरीरात थायरॉइडच्या असामान्य पातळीची डायग्‍नोसिस करून घ्यायला हवी. डायग्‍नोसिस तसेच प्रसूती व गर्भावस्थेतील बाळाच्या आरोग्यासाठी त्वरित उपचार करावेत.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT