Lean Fatty Liver | लीन फॅटी लिव्हरच्या अंतरंगात... 
आरोग्य

Lean Fatty Liver | लीन फॅटी लिव्हरच्या अंतरंगात...

पुढारी वृत्तसेवा

डॉ. प्राजक्ता पाटील

सर्वसामान्यपणे असा समज रूढ आहे की, यकृतावर चरबी साचण्याची ही समस्या केवळ लठ्ठ किंवा जाड असणार्‍या लोकांनाच होते; परंतु वैद्यकीय संशोधनानुसार अनेकदा सडपातळ किंवा सामान्य वजन असणार्‍या व्यक्तींनाही हा त्रास होऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत 'लीन फॅटी लिव्हर’ असे म्हटले जाते.

वरवर पाहता शरीर सुदृढ आणि बारीक वाटत असले, तरी शरीराच्या आतील भागात लपलेली चरबी आरोग्यासाठी घातक ठरू शकते. या प्रकारच्या आजारात शरीराचे बाह्य वजन नियंत्रणात असते; परंतु पोटाचा घेर वाढलेला असू शकतो किंवा व्हिसेरल फॅटचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचलेले असते. यामागे अनुवंशिकता, जनुकीय रचना, चयापचयातील बिघाड, अतिगोड पदार्थांचे सेवन, पॅकबंद अन्न खाण्याची सवय आणि व्यायामाचा पूर्ण अभाव ही प्रमुख कारणे असतात. अनेकदा शरीराची पचनसंस्था कॅलरीज योग्य प्रकारे बर्न करू शकत नाही आणि ती चरबी थेट यकृताच्या पेशींमध्ये साचू लागते.

दुर्लक्ष करण्याचे परिणाम

वजन आटोक्यात असल्याने आपण पूर्णपणे निरोगी आहोत, या चुकीच्या समजुतीमुळे लोक लीन फॅटी लिव्हरच्या लक्षणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. लठ्ठपणाची लक्षणे दिसत नसल्यामुळे वैद्यकीय तपासणी केली जात नाही आणि त्यामुळे हा आजार नकळत बळावत जातो. वेळेवर निदान न झाल्यास यकृतावर सूज येणे, यकृताच्या पेशी डॅमेज होणे आणि फायब्रोसिससारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. पुढे जाऊन याचे रूपांतर सिरोसिस किंवा यकृताच्या कर्करोगात होण्याचा धोकाही कैकपटीने वाढतो. शिवाय, अशा व्यक्तींमध्ये टाईप टू मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सामान्य लोकांच्या तुलनेत अधिक असतो.

या धोकादायक आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तो नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. आहारात मैदा, साखर आणि ट्रान्सफॅट्सचे‌ प्रमाण पूर्णपणे कमी करून फायबरयुक्त पालेभाज्या, फळे आणि धान्य यांचा समावेश करावा. रोजच्या दिनचर्येत किमान अर्धा तास चालणे, योगासने करणे किंवा कार्डिओ व्यायामाचा समावेश केल्यामुळे अंतर्गत अवयवांभोवती साचलेली चरबी कमी होण्यास मदत मिळते. वर्षातून एकदा नियमितपणे रक्त तपासणी आणि पोटाची सोनोग्राफी करून घेणे फायदेशीर ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT