India- Pakistan Conflict : देशभरात सध्या पाकिस्तान विरोधात असलेल्या द्वेषाचे आणि युद्धाच्या नांदीचे वातावरण जोरात आहे. तुमच्या आमच्या सारखे प्रत्येकजणच सतत नव्या नव्या अपडेटसाठी टीव्ही किंवा सोशल मीडियाशी कनेक्ट असतो. यादरम्यान युद्धाच्या बातम्या, त्या संदर्भातील व्हिडीओ सतत पाहण्याचे, अपडेट घेण्याचे व्यसनच लागते. या सवयीचे रूपांतर हळूहळू पॅनिक होण्यामध्ये होऊ लागते.
नंतर हेच प्रमाण वाढून पॅनिक अटॅक येण्याची शक्यता कैकपटीने वाढते. याशिवाय 'हल्ला झाल्यास काय होईल' अशा आशयाच्या बातम्या ही भीती वाढवण्यास भरच घालतात. अशी काही लक्षणे यापूर्वीही युक्रेन-रशिया युद्धादरम्यान अनेक लोकांना जाणवल्याचे आढळून आले आहे. यामध्ये अस्वस्थ वाटणे, झोप न येणे, मळमळ, जड वाटणे, चक्कर येणे, अशी लक्षणे जाणवू शकतात.
तर या War Anxiety (वॉर एंझायटी) किंवा पॅनिक अटॅक येईल असे वाटत असेल किंवा त्रास होत असेल तर पुढील उपाय करा.
एकसारखे सतत टीव्हीवरील बातम्या किंवा सोशल मीडिया पाहू नका. त्यातून मध्ये मध्ये ब्रेक घ्या. विषयांतर करा. एखाद्या वेगळ्या विषयावर चर्चा करा.
एखाद्या जवळच्या व्यक्तीशी वेगळ्या विषयावर बोला.
थोडा ब्रेक घेऊन मध्ये मध्ये श्वासावर लक्ष केंद्रीत करा. यामध्ये दीर्घ श्वास घ्या. थोडा वेळ रोखून धरा. आता हळू हळू हा श्वास सोडा.
जर तुम्ही आधीपासूनच एंझायटी किंवा इतर मानसिक आजारांशी डील करत असाल तर युद्धाच्या लाईव्ह बातम्या पाहणे टाळा. याने तुमच्या अस्वस्थतेमध्ये अजूनच भर पडू शकते. अशावेळी या बातम्या तुमची एंझायटी ट्रीगर करू शकते.
लहान मुले तुमच्या आसपास असतील तर अशा बातम्या आवर्जून टाळा. सतत अशा बातम्या त्यांच्या कानावर पडणे किंवा त्यांनी पाहणे किंवा अशा रील्स पाहणे मुलांमध्ये सतत चीडचीड, अस्वस्थता वाढवणारे ठरते.