कोरोनामुळे आज संपूर्ण जग भयभयीत झाले आहे. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. या कोरोनाच्या महामारीत किती तरी लोक भीतीनेच आजारी पडत आहेत. आज मागील दोन महिने जगात भीतीचे वातावरण पसरले आहे. आपल्याला समजत नाही आपण काय करायचे काय? कशा पद्धतीने परिस्थितीला तोंड द्यायचे? त्यामुळे आपल्याला भीती वाटत आहे आणि या भीतीमुळे एक भयानक वातावरण आपल्याभोवती तयार झाले आहे. तसे पाहिले तर संपूर्ण जगामध्ये अशी परिस्थिती पहिल्यांदा दिसून येत आहे. त्यामुळे आपण खूपच भयभीत झालो आहोत.
या कोरोना विषाणूच्या महामारीमुळे आपण त्रस्त होणे सामान्य आहे. आपल्या मनाचा तणाव वाढणे सामान्य आहे आणि त्यामुळे भीती निर्माण होणेसुद्धा सामान्य आहे. म्हणजेच आपण नकारात्मक भावनांना सामान्य स्वरूप दिले. लहानपणापासूनच आपण आपल्या मनाची स्थिती नकारात्मक घडविलेली आहे. संपर्ण जगातील लोक याच भीतीच्या नकारात्मक विचारात जगत आहेत.
आज कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये शांत रहाणे, स्थिर राहणे, निडर राहणे, निर्भय राहणे जरुरीचे आहे. आता पाहा कोरोना विषाणू महामारी ही परिस्थिती आपल्या सभोवती आहे. मनाची स्थिती आपल्या आत आहे तसे पाहिले, तर परिस्थिती मनाच्या परिस्थितीला घडवत नाही. परंतु, मनाच्या स्थितीचा परिस्थितीवर भरपूर परिणाम दिसून येतो आणि मनाची स्थिती ही परिस्थिती घडवत असते. आपण नकारात्मक विचार केले, तर परिस्थिती भयानक होेते आणि आपण सकारात्मक विचार केले, तर परिस्थिती खूप सोपी आणि सहज होते. आज आपण या विषाणूपासून आपल्या परिवाराला, देशाला, विश्वाला संरक्षण देण्यासाठी जे काही सांगितले जात आहे त्याचे पालन करीत आहोत. परंतु, यावेळेस आपण आपल्या मनाच्या स्थितीचा कधी विचार केला आहे का? स्वतःला वाचवताना आणि सर्वांना वाचवताना आपले मानसिक स्वास्थ्य किती भीतीदायक असते, याचा आपण विचार करत नाही. म्हणूनच मानसिक स्वास्थ मजबूत करणे गरजेचे आहे.
वैद्यकीय अभ्यासानुसार आपल्या मानसिक स्वास्थ्याचा परिणाम आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्तीवर होत असतो. आपले स्वास्थ्य ताणतणावाखाली असेल, भयभीत असेल, तर आपली प्रतिकार शक्ती कमी होते आणि आपण अशा जीव घेणार्या आजाराला बळी पडतो. तसे पाहिले, तर आपण घाबरल्यामुळे आपला ताण जास्त वाढतो. त्यामुळे आपल्या शरीरातील तणावाच्या हार्मोन्सचे प्रमाण वाढते. ते हार्मोन्स म्हणजे अॅर्डिनॅलिन आणि कॉरटिकोसोल या हॉर्मोन्सचे प्रमाण वाढले तर आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते आणि आपण अशा विषाणूचे भागीदार होतो. या विषाणूची भीती आपल्या मनात असेल, तर ती काढून टाकणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण पूर्णपणे सकारात्मक असणे गरजेचे आहे आणि आपली इच्छाशक्ती मजबूत केली पाहिजे. म्हणजेच आपली प्रतिकार शक्ती मजबूत राहील आणि आपण जोमाने या कोरोना विषाणूच्या महामारीला तोंड देऊ शकू आणि आपला देश तसेच हे विश्व वाचवू शकू. आपला द़ृष्टिकोन सकारात्मक करण्यासाठी आपण ध्यानधारणा केली पाहिजे. ध्यान म्हणजे काय, तर आपली सर्व भीती, चिंता परमेश्वरावर सोपविणे आणि आपण शांत राहणे. अशा जीवघेण्या महामारीमध्ये सकारात्मकता आपल्याला जीवदान देते. त्यामुळे सर्वांनी सकारात्मक द़ृष्टिकोन ठेवून स्वतःला वाचवूया आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण करूया!