पावसाळ्यात साधी सोपी ऋतुचर्या जर आपण स्वीकारली तर संसर्गाविना निरोगी राहता येईल. पावसाळ्याच्या दिवसात लघू आणि गरम म्हणजेच उष्ण गुणाचा आहार घ्यावा. या ऋतूत ओवा, हळद, मिरी, सुंठ यांची पावडर करून भाकरी, चपातीत वापरल्यास उत्तम.
मांसाहारी व्यक्तीने पावसाळ्यात मांस खाण्यापेक्षा त्याचे सूप करून प्यावे. यातही सुंठ, मिरी, पुदिन्याचा सढळ हाताने वापर करावा. आपल्या आहारातील विविध अन्नपदार्थ तयार करण्यासाठी आपण जे धान्य वापरतो ते जुने असावे. पण एक वर्षापेक्षा अधिक जुने मात्र शक्यतो असू नये. ज्वारीची भाकरी, कमी तेलाच्या पोळ्या, गरम दूध, शक्यतो मुगाचे वरण, भात अशी आहाराची मांडणी असावी. नवीन धान्य वापरायचे असेल तर ते धान्य भाजून घेतल्यास अधिक चांगले. त्यामुळे अशा भर्जित धान्यवत अग्नीचे संस्कार होऊन ते शरीरातील अग्नीकडून पचविण्यास हलके - लघू बनते. आठवड्यातून एकदा लंघन करावे. तेलापेक्षा साजूक तुपाचा अधिक वापर करावा. या दिवसांत ताजे व गरम अन्न सेवन करावे. पचनास हलका, शक्तिदायक, शुष्क आहार घ्यावा.
या ऋतूमध्ये स्वयंपाकामध्ये मुरे, जिरे, हिंग, सुंठ, लिंबू, लसूण, कांदा, आले, कडुलिंब यांचा नेहमीपेक्षा थोडा अधिकच वापर करावा. कारण हे सर्व पदार्थ उष्ण असून पचण्यास हलके असे आहेत. ते आहाराच्या पचण्यास खूपच साहाय्यकारी ठरतात. पावसाळ्यात सर्वसामान्य आहारात लाह्या, भाकरी, चपाती, दूधभात, पिठले चालेल. पावसाळ्याच्या काळात दिवसा झोपणे, जास्त परिश्रम, रूक्ष पदार्थ सेवन हे आयुर्वेदाने निषिद्ध मानले आहे. ते टाळलेले बरे. दह्याऐवजी ताक घ्यावे. तेदेखील ताजे, पातळ व जिरे, हिंग, काळे मीठ घालून प्यावे. ताक नसेल तर आयत्यावेळी दह्यामध्ये थोडे पाणी घालून, घुसळून ताक करून घ्यावे. दही ताजे असावे. आंबट, शिळे असू नये. आहाराचे प्रमाणही पावसाळ्याच्या सुरुवातीस अधिक असू नये. जसजसा अग्नी प्रदीप्त होईल म्हणजेच भूक वाढेल तशी आहाराची मात्रा वाढवावी. पचण्यास जड, शिळा, थंड असा आहार टाळावा. पोटात कळ येणे, द्रवमल प्रवृत्ती होणे यासाठी शंखवटी, संजीवनी वटी, मोचरस, कर्पूरवटी इ. चा उपयोग करावा. अर्थात यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हितकारक.
पावसाळ्याच्या दिवसात पचनसंस्था आणि जठराचे काम मंदावते. परिणामी, शरीरात इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते. पावसाळ्याच्या काळात सर्व प्रकारच्या भाज्या व फळे स्वच्छ धुवून घ्यावीत. फळभाज्या स्वच्छ धुतल्या नाहीत तर पोटाचे विकार होण्याची शक्यता वाढीला लागते. मोजकेच तेल, वात कमी करणारे आहे, तर साजूक तूप, वात आणि पित्त दोन्ही कमी करणारं आहे. पावसाळ्यात वात आणि पित्त दोन्ही वाढलेले असते, म्हणून जमल्यास अन्नपदार्थ साजूक तुपात बनवावेत. वनस्पती तुपात नव्हे. तेलातील विशिष्ट घटकामुळे पित्त वाढते आणि वर्षा ऋतूत पित्तसंचयाचा ऋतू! म्हणून तेलात तळलेले पदार्थ या दिवसात खाऊ नयेत. पावसाळ्यात गरम भजी, बटाटेवडे खावेसे वाटले तरी, प्रमाणात खावेत. या दिवसांत हलके जेवण पचण्यास सोपे असते. तेल तसेच मसाल्याच्या पदार्थांपासून शक्यतो दूर राहावे. बराच काळ उघड्यावर राहिलेले खाद्यपदार्थ शरीरात इन्फेक्शन निर्माण करू शकतात.
या दिवसात पालेभाज्यांमध्ये माठाची भाजी योग्य. शिवाय दुधी, दोडका, पडवळ, भेंडी अशा वातशामक भाज्या अधिक प्रमाणात घ्या. पावसाळ्यात नदी, नाल्यांना पूर येतो, ते जलसाठ्यात येतं, तेच पिण्याच्या संपर्कात येतं, यासोबत पहिल्या पावसात अशुद्ध पाण्याचं प्रमाण अधिक असतं, म्हणून हगवण, उलट्या, जुलाब, पोट बिघडणे, गॅस धरणे, आव पडणे यासारख्या तक्रारी वाढतात. हे टाळण्यासाठी पाणी उकळून गार करून अथवा कोमट स्वरुपात प्यावे.
स्वयंपाकामध्ये तेल, तुपाचा, लोण्याचा वापर जरूर असावा, पण मर्यादित स्वरूपातच असणे चांगले. भेंडी, पडवळ, वांगी, कारले, दोडका, मुळा, पालक, तोंडली आदी भाज्या आवर्जून आहारात वापराव्यात. खायचाच असल्यास नुसत्या पावापेक्षा त्याचा टोस्ट बनवून खा. कडधान्यांपैकी मूग व मसूर पचनास हलकी असल्याने अवश्य खावीत. कुळीथ व उडीद हे पचनास जड असल्याने कमी प्रमाणात खावे. चवळी, पावटा, वाटाणा, मटकी हे वातवर्धक असल्याने टाळावेत. पावसाळ्यात आंबट, खारट व स्निग्ध पदार्थांचे सेवन करावे. पण फार गोड व अतिस्निग्ध पदार्थ, उसळी या दिवसात खाऊ नयेत. शक्यतो तांदूळ, गहू, जव, वरई, नाचणी, राजगिरा इत्यादी धान्ये वापरताना ती थोडी जुनी झालेली असावीत. नवीन धान्ये व मका टाळावा. दुधी, भेंडी, पडवळ, श्रावणघेवडा, वाल, गवार या भाज्या अवश्य खाव्यात पण पालेभाज्या टाळाव्यात. आपल्या आहारात लसूण, जिरे, हिंग, मिरे, आले हे फोडणीत वापरले जाणारे जिन्नस अग्निदीपक असतात. त्यामुळे पावसाळी आहारात त्यांचा नक्की वापर करावा. सर्व भारतीय मसाले हे अग्निदीपक असतात. त्यामुळे ते आहारात भरपूर वापरावेत.दूध पिताना सुंठ, हळद घालूनच प्यावे. हिंग, मिरी, आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना हे सर्व घटक अन्नपचनाला मदत करतात, ते वापरा. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हितकारक.