‘एज रिलेटेड मॅक्युलर डीजनरेशन’ या व्याधीमध्ये डोळ्याच्या मध्यभागच्या दृष्टीची हानी होते. त्यामुळे वाचन, लिखाण, वाहन चालवणे किंवा इतर बारीक कामे करताना अडचण येते. साधारणत: वयाच्या पन्नाशीनंतर या व्याधीची सुरुवात होऊ शकते. वेळेत उपचार केल्यास या व्याधीस रोखणे शक्य होते. त्यामुळे या व्याधीकडे दुर्लक्ष करू नये.
डोळ्याचे कामकाज योग्य पद्धतीने चालण्यासाठी नेत्रपटल (रेटिना) सुद़ृढ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. डोळ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या पडद्याला नेत्रपटल किंवा रेटिना असे म्हणतात. प्रकाशकिरण बुब्बुळातून डोळ्यात शिरतात आणि बुब्बुळाच्या खाली असलेल्या भिंगाद्वारे ते बरोबर नेत्रपटलावर पाडले जातात. त्यानंतर पडद्यावरील प्रतिमेचे विशिष्ट प्रकारच्या संदेशांमध्ये रुपांतर केले जाते आणि हे संदेश नेत्रपटलाच्या मागच्या बाजूला असलेल्या ‘ऑप्टिक नर्व्ह’द्वारे मेंदूपर्यंत पोहोचवले जातात आणि ते द़ृष्य आपल्याला दिसते. रेटिनाच्या मध्यभागी साधारणत: 5.5 मिलिमीटर व्यासाचा लंबगोलाकृती पिवळ्या रंगाचा भाग असतो. त्याला ‘मॅक्युला’ असे म्हणतात. मॅक्युलामध्ये असलेल्या ‘रॉडस्’ आणि ‘कोन्स’मुळे आपल्याला विविध रंगांचे ज्ञान होते. वयोमानानुसार मॅक्युलाचा डिजनरेशन (र्हास) होऊ शकतो. यालाच ‘एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन’ अर्थात (एआरएमडी किंवा एएमडी) असे म्हणतात.
एआरएमडी हे वयाच्या पन्नाशीनंतर द़ृष्टीच्या होणार्या र्हासाच्या सर्वात मोठ्या कारणांपैकी एक आहे. एआरएमडीमध्ये मॅक्युलाच्या पेशींचा र्हास होतोच, पण त्याचबरोबर रेटिनामधील ‘एपिथेलियम’ या रंगद्रव्याचे ‘पार्शियल ब्रेकडाऊन’ होते. त्याने पेशींची हानी होऊन त्या मरतात. मॅक्युलाची हानी झाल्यामुळे डोळ्याच्या मध्यभागच्या द़ृष्टीवर परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला लिहिणे, वाचणे, वाहन चालवणे, लोकांचे चेहरे ओळखणे आणि इतर बारीक कामांमध्ये अडचणी जाणवू शकतात. एआरएमडीमुळे पूर्ण अंधत्व येण्याची शक्यता कमीच असते. द़ृष्टीचा र्हास होण्याची प्रक्रिया काही महिने किंवा काही वर्षांपर्यंत सुरू राहू शकते. हे व्याधीची तीव्रता आणि प्रकारावर अवलंबून असते.
एएमडीचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला म्हणजे कोरडा एएमडी (ड्राय एएमडी). यात रेटिनाच्या एपिथेलियम या रंगद्रव्यातील (रेटिनल पिगमेंट एपिथेलियम किंवा आरपीइ) पेशी पातळ बनतात आणि त्यांचा र्हास होऊ लागतो (हळू हळू नष्ट होऊ लागतात). रॉडस् आणि कोन्सच्या योग्य कार्यासाठी या पेशींचा थर अतिशय महत्त्वाचा असतो. या पेशींचा र्हास झाल्यानंतर रॉडस् आणि कोन्सचाही र्हास होतो आणि ते मरतात. ड्राय एएमडीची प्रक्रिया खूप सावकाश सुरू असते. हळूहळू र्हास होणार्या पेशींची संख्या वाढत जाते.
या प्रकारच्या व्याधीच्या अनेक रुग्णांची वाचण्याची द़ृष्टी पूर्णपणे जात नाही. दुसर्या प्रकाराला ओला किंवा ‘वेट’ एएमडी असे म्हणतात. यालाच ‘निओव्हॅस्क्युलर’ किंवा ‘एक्झुडेटिव्ह’ एएमडी असेही म्हणतात. या प्रकारात तुलनेने कमी वेळात-काही वेळा केवळ काही महिन्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर द़ृष्टीचा र्हास होतो. अगदी क्वचितप्रसंगी एखाद्या नव्या रक्तवाहिनीतून रक्तस्राव (हॅमरेज) झाल्यास द़ृष्टीचा हा र्हास अचानक, केवळ काही तासांमध्येही होऊ शकतो. ओल्या एएमडीमध्ये रेटिनाच्या रंगद्रव्याच्या पेशींच्या र्हासाबरोबरच नेत्रपटल आणि डोळ्याच्या गोलाच्या बाहेरच्या थरामध्ये असलेल्या ‘कोरॉइड’मधील केशवाहिन्यांमधून (सूक्ष्म रक्तवाहिन्या) आणखी लहान केशवाहिन्या वाढू लागतात. याला ‘कोरॉइडल निओव्हॅस्क्युलरायझेशन’ असे म्हणतात. या नव्या केशवाहिन्या नाजूक असतात आणि त्यातून रक्त तसेच द्रव पदार्थ ‘लीक’ होऊ शकतात. त्यामुळे रॉडस् आणि कोन्सची हानी होऊ शकते. असे झाल्यास मॅक्युलावर डाग पडतो आणि द़ृष्टीची आणखी हानी होऊ शकते. एएमडीचे निदान करण्यासाठी नेत्रतज्ज्ञाला डोळ्याच्या मागच्या बाजूची ‘ऑफ्थॅल्मोस्कोप’च्या साह्याने तपासणी करावी लागते. एएमडीमध्ये नेत्रपटलामध्ये विशिष्ट लक्षणे आढळून येतात. नेत्रपटलाची नेमकी किती हानी झाली आहे हे पाहण्यासाठी नेत्रतज्ज्ञ आणखी काही तपासण्या सुचवू शकतो.
1. रेटिनाची विशिष्ट छायाचित्रे 2. फ्लुअरोसीन अँजिओग्राफी : यात हाताच्या रक्तवाहनीत एक डाय इंजेक्ट करतात. त्यानंतर विशिष्ट कॅमेर्याच्या साह्याने रेटिनाची छायाचित्रे घेतली जातात.
3. ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी : यात मॅक्युलाची सविस्तर त्रिमितीय माहिती मिळू शकते. ड्राय एएमडीच्या उपचारांमध्ये अँटी ऑक्सिडंट्सनी समृद्ध अशा पोषक आणि संतुलित आहाराला विशेष महत्त्व आहे. त्यात काही पूरक आहारही दिला जातो. क्वचितच होणार्या ओल्या एएमडीमध्ये उपचारांमुळे द़ृष्टीचा र्हास थांबवणे किंवा त्याचा वेग कमी करणे यासाठी प्रयत्न केले जातात. आधुनिक उपचारपद्धतीमुळे गेलेली द़ृष्टी काही प्रमाणात परत मिळवणेही शक्य होते.
या उपचारांमध्ये ‘अँटी व्हॅस्क्युलर एंडोथॅलियल ग्रोथ फॅक्टर’ (अँटीव्हीजीइएफ) औषधे, ‘फोटोडायनॅमिक थेरपी’ आणि ‘लेसर फोटोकोअॅग्युलेशन’यांचा समावेश होतो. अँटी-व्हीजीएएफमध्ये डोळ्याच्या मागच्या भागात एक इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनमधील औषध डोळ्यात रक्तवाहिन्या वाढण्यासाठी कारणीभूत ठरणार्या फॅक्टर्सना काढून टाकण्याचे काम करते.