Pregnancy | गर्भधारणेपूर्वी ‘ही’ घ्या काळजी! Pudhari File Photo
आरोग्य

Pregnancy | गर्भधारणेपूर्वी ‘ही’ घ्या काळजी!

महिलांच्या मनात गर्भधारणेविषयी मोठी चिंता

पुढारी वृत्तसेवा
डॉ. अवंतिका वझे-परब

पीसीओएस (PCOS), एंडोमेट्रिओसिस (Endometriosis) किंवा थायरॉईडसारख्या आरोग्य समस्यांशी झगडणार्‍या अनेक महिलांच्या मनात गर्भधारणेविषयी मोठी चिंता घर करून असते. अशा स्थितीतही खचून न जाता योग्य वैद्यकीय मार्गदर्शन, जीवनशैलीतील सकारात्मक बदल आणि वेळीच उपचार घेतल्यास या आव्हानांवर यशस्वीपणे मात करून गर्भधारणा शक्य असते.

पीसीओएस, एंडोमेट्रिओसिस किंवा थायरॉईड विकार यासारख्या हार्मोनल आणि प्रजनन आरोग्याशी निगडित समस्यांमुळे ओव्हुलेशन प्रक्रियेत (Ovulation Process) नकारात्मक परिणाम होतो. अंड्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि त्यामुळे अनेकदा गर्भधारणा करणे आव्हानात्मक ठरते. पीसीओएसमुळे मासिक पाळी अनियमित होते, ज्यामुळे ओव्हुलेशनचा मागोवा घेणे कठीण होऊन बसते.

एंडोमेट्रिओसिसमुळे प्रजनन अवयवांना जखम किंवा सूज येण्याची शक्यता असते, ज्यामुळे गर्भधारणेत अडथळा येऊ शकतो. थायरॉईडच्या असंतुलनामुळे मग ते हायपोथायरॉईडीझम असो किंवा हायपरथायरॉईडीझम, केवळ प्रजननक्षमतेवरच नव्हे, तर गर्भाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे या आजारांनी त्रस्त असलेल्या महिलांनी अधिक सावधगिरी बाळगणे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कोणती काळजी घ्याल?

प्रजननतज्ज्ञांचा सल्ला घ्या : तुम्हाला प्रजनन आरोग्याशी संबंधित काही समस्या किंवा आजार असतील, तर सर्वप्रथम प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. ते तुमच्या आरोग्याचे अचूक मूल्यांकन करतील, आवश्यक त्या चाचण्या करतील आणि तुमच्यासाठी प्रभावी उपचारांची शिफारस करतील.

हार्मोन्सचे संतुलन साधा : दैनंदिन जीवनशैलीत छोटे पण महत्त्वपूर्ण बदल करून हार्मोन्सचे नियमन करता येते. यामध्ये संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि तुमच्या तणावाच्या पातळीचे योग्य व्यवस्थापन करणे समाविष्ट आहे. यामुळे नैसर्गिकरीत्या प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते.

पीसीओएसवर नियंत्रण मिळवा : पीसीओएससाठी कोणताही कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तथापि, आहार आणि जीवनशैलीतील सकारात्मक बदल हे पीसीओएस नियंत्रणात ठेवण्यात लक्षणीय मदत करू शकतात. नियमित व्यायाम, निरोगी आहार आणि शरीराचे वजन नियंत्रित राखणे हे पीसीओएसशी संबंधित लक्षणे कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.

एंडोमेट्रिओसिसचे योग्य व्यवस्थापन करा : एंडोमेट्रिओसिसमुळे मासिक पाळीच्या वेळी तीव्र वेदना, दीर्घकालीन ओटीपोटात दुखणे आणि वंध्यत्व यासारख्या समस्या उद्भवू शकतात. काही काळासाठी यावर वैद्यकीय उपचार केले जाऊ शकतात; परंतु अनेकदा लॅप्रोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करून त्याचे व्यवस्थापन केले जाते.

थायरॉईड पातळीचे नियमित निरीक्षण करा : T3, T4 आणि TSH सारख्या रक्त चाचण्यांच्या मदतीने तुमच्या थायरॉईड पातळीचे नियमितपणे निरीक्षण करणे आवश्यक आहे. थायरॉईडमधील असंतुलन ओव्हुलेशन आणि गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम करू शकते. नियमित वैद्यकीय तपासणी करून आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळेवर औषधे घेतल्याने तुमचे थायरॉईड कार्य संतुलित राहण्यास मदत होऊ शकते.

पीसीओएस, एंडोमेट्रिओसिस किंवा थायरॉईडसारख्या समस्या असल्या, तरीही निराश न होता योग्य वैद्यकीय सल्ला आणि सकारात्मक द़ृष्टिकोन ठेवल्यास गर्भधारणेचे स्वप्न साकार होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT