डॉ. प्राजक्ता पाटील
गर्भाशय काढणे हा अनेक महिलांसाठी आरोग्य सुधारण्याचा मार्ग असला, तरी त्यानंतर शरीरात होणारे बदल आणि दुष्परिणाम समजून घेणे गरजेचे आहे. वेळेवर घेतलेला सल्ला, अचूक माहिती आणि स्वतःची घेतलेली काळजी यांमुळे हे बदल स्वीकारणे सोपे होते.
हिस्टेरेक्टॉमी म्हणजेच गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया ही एक सामान्य शस्त्रक्रिया आहे, जी अनेक महिलांच्या जीवनमानात मोठा बदल घडवून आणू शकते. अतिरक्त स्राव, तीव्र वेदना, फायब्रॉईडस्, एंडोमेट्रिओसिस किंवा कर्करोग अशा गर्भाशयाशी संबंधित समस्या गंभीर स्वरूप धारण करतात, तेव्हा ही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो.
या शस्त्रक्रियेनंतर महिलेला मासिक पाळी येत नाही. कारण, गर्भाशयातून होणारा रक्तस्राव थांबलेला असतो. ज्या महिला दीर्घकाळापासून मासिक पाळीच्या वेदना किंवा अतिरक्तस्रावाचा त्रास सहन करतात त्यांच्यासाठी हा बदल दिलासादायक ठरू शकतो. शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीच्या काही आठवड्यांत वेदना, थकवा जाणवतो आणि शरीराला पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो; मात्र डॉक्टरांचा योग्य सल्ला आणि विश्रांती घेतल्यास बहुतांश महिला हळूहळू सामान्य जीवनात परततात.
तथापि, गर्भाशय काढल्यानंतर काही महिलांना संप्रेरकांमधील म्हणजेच हार्मोन्समधील बदल जाणवू शकतात. विशेषतः शस्त्रक्रियेदरम्यान अंडाशयदेखील काढले गेले असतील, तर हे बदल अधिक तीव्र असू शकतात. यामुळे शरीरातील उष्णता वाढणे, स्वभावात चिडचिडेपणा येणे आणि झोपेत बदल होणे यांसारखे मेनोपॉजमुळे होणारे त्रास तीव्र होऊ शकतात. शस्त्रक्रियेदरम्यान अंडाशय सुरक्षित ठेवले असतील, तर शरीरातील संप्रेरकांची निर्मिती सुरू राहते आणि लक्षणे सौम्य असतात. काही वेळा महिलांना लघवीशी संबंधित समस्या किंवा लैंगिक आयुष्यात कोरडेपणा यांसारखे बदल जाणवू शकतात. हे बदल सामान्य असून योग्य वैद्यकीय सल्ला आणि उपचारांनी त्यात सुधारणा करता येते.
गर्भाशय काढल्यानंतर नियमित तपासणी आणि डॉक्टरांचे निरीक्षण आवश्यक असते. डॉक्टर तुमच्या शरीरातील संप्रेरकांचे स्तर, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, हाडांची मजबुती आणि मानसिक स्थिती याकडे लक्ष देतात. लक्षणे जास्त असतील, तर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, सकस आहार, व्यायाम आणि मानसिक आधाराचे उपाय सुचवले जातात.