डॉ. संजय गायकवाड
मानवी शरीराची संपूर्ण रचना हाडांच्या सांगाड्यावर आधारित असते. दोन हाडे जिथे एकत्र येतात त्याला ‘जॉईंट’ किंवा सांधे म्हणतात. मानवी शरीरात सुमारे ३६० सांधे असतात, जे शरीराचा भार पेलण्याचे आणि विविध शारीरिक हालचाली करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. वयानुसार सांधे दुखणे किंवा हाडे कमकुवत होणे ही एक सामान्य बाब मानली जाते. परंतु, कमी वयातच हाडांच्या आणि सांध्यांच्या समस्या निर्माण होणे ही चिंतेची बाब आहे.
काही अयोग्य सवयी सांध्यांचे आरोग्य बिघडवू शकतात, याबद्दल जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर काही गंभीर आजारांची लक्षणे वेळेवर ओळखणे गरजेचे असते. उदाहरणार्थ, ऑस्टियोआर्थरायटिसमध्ये जोडांमध्ये तीव्र वेदना, ताठरता आणि लवचिकता कमी होणे अशी लक्षणे दिसतात. संधिवात किंवा संधिशोथ (र्हुमेटाईड आर्थरायटिस) या आजारात सकाळी उठल्यावर सांध्यांमध्ये जास्त ताठरता जाणवणे, थकवा, ताप, भूक मंदावणे आणि जोडांना सूज येणे ही लक्षणे आढळतात. ऑस्टियोपोरोसिसमध्ये पाठीत तीव्र वेदना, वाकलेला सांगडा आणि हाडे ठिसूळ होणे, असे त्रास होतात. याशिवाय गाऊट या आजारात जोडांमध्ये तीव्र वेदना, लालसरपणा आणि सूज येते.
आपल्या काही दैनंदिन सवयी नकळतपणे हाडांचे आणि सांध्यांचे नुकसान करत असतात. शरीराचे अतिरिक्त वजन हा यातील सर्वात मोठा घटक आहे. वजन जास्त असल्यास पाठीचा कणा, हिप्स आणि पायांवर जास्त ताण येतो, ज्यामुळे जोडांची झीज होऊन तीव्र वेदना सुरू होतात. तसेच अतिरिक्त वजनामुळे शरीरात दाह (इन्फ्लेमेशन) वाढून सर्वच जोड ताठ आणि सुजलेले राहू शकतात.
आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात सतत फोनवर मेसेज किंवा चॅटिंग करण्याच्या सवयीमुळे अंगठ्याच्या स्नायूंवर ताण येतो. याला वैद्यकीय भाषेत ‘टेक्स्टिंग थंब’ म्हटले जाते. यामुळे अंगठ्याच्या स्नायूंच्या ताणामध्ये सूज येते आणि अंगठा वाकवताना कट असा आवाज येतो. याशिवाय चुकीचे शूज वापरल्याने गुडघे, टाचा, पाठीचा कणा आणि हिप्सवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे दुखापत होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे चालणे, धावणे किंवा ट्रेकिंगसाठी योग्य आणि आरामदायक शूज वापरणे गरजेचे आहे.
बोटांची पेरं किंवा सांधे मोडणे ही अनेकांना सवय असते. सांध्यांमधील द्रवात निर्माण होणारे नायट्रोजनचे बुडबुडे फुटल्याने हा आवाज येतो. परंतु या सवयीमुळे हातांना सूज येणे आणि हाताची पकड कमकुवत होण्याचा धोका असतो. तंबाखूचे सेवन किंवा धूम्रपान हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. तंबाखूमुळे हाडांपर्यंत होणारा रक्तप्रवाह मंदावतो आणि शरीराची कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता कमी होते. तसेच पोटावर झोपण्याच्या वाईट पद्धतीमुळे पाठीच्या कण्यावर आणि जोडांवर अनावश्यक दाब पडतो.
शारीरिक हालचालींचा अभाव असल्यास नियमित स्ट्रेचिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. स्ट्रेचिंगमुळे स्नायू मजबूत होतात आणि जोडांची लवचिकता टिकून राहते. कमी वयातच योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वाईट सवयींचा त्याग केल्यास जोडांचे आरोग्य दीर्घकाळ उत्तम ठेवता येते. तसेच नियमितपणे हाडांच्या आरोग्याची तपासणी करून वेळीच योग्य ती काळजी घेणे हिताचे ठरते.