Healthy Lifestyle | औषधांशिवाय मधुमेह, रक्तदाब आणि वजन कमी करण्याची! 
आरोग्य

Healthy Lifestyle | औषधांशिवाय मधुमेह, रक्तदाब आणि वजन कमी करण्याची!

पुढारी वृत्तसेवा

डॉ. हेमंत जोशी डॉ. अर्चना जोशी

ज्यांचे पोट दिसते, ज्यांना मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्यांनी आहार कमी करायला हवा. हालचाल व व्यायाम वाढवावा. आपले वजन कमी करावे व मधुमेह व उच्च रक्तदाबातून मुक्त व्हावे. यासाठी सर्वांनीच उभे राहून सर्व कामे करावीत. दुसरा पर्याय नाही.

लँसेट या जगप्रसिद्ध मासिकात डॉक्टर रॉय टेलर यांनी एक रिपोर्ट शेअर केलाय. त्यांनी उच्च रक्तदाब, मधुमेह व वजन शंभर किलोच्यावर असलेल्या २९८ लोकांचा दोन वर्ष अभ्यास केला. त्या लोकांना ६ वर्षांपर्यंत मधुमेह होता. उच्च रक्तदाब पण होता. रॉय यांनी त्यांचे दोन वेगवेगळे गट केले. पहिल्या १४९ लोकांच्या गटाला आदर्श औषधोपचार व आहाराचे पथ्य सुरू ठेवले. एका वर्षात यातील सहा लोकांचा मधुमेह कमी झाला. पण १४३ लोकांचा आजार व औषधे वाढली होती. बरोबर औषध पथ्य केले तरी उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजार वाढतात. लवकरच आपल्याला मारतात. यातून सुटका कशी मिळवावी, हे हाच अभ्यास पुढे सांगतो.

दुसऱ्या गटातही १४९ लोक होते. डॉक्टरांनी त्यांची मधुमेहाची व रक्तदाबाची औषधे बंद केलीत. त्यांचे खाणे कमी केले. त्यांना रोज ८५० कॅलरीज मिळतील एवढाच आहार दिला. मात्र नियमित हालचाल वाढवायला व व्यायाम करायला सांगितले. या दुसऱ्या गटाला वर्षभरात खूपच फायदा झाला. यातील सर्वांचे वजन दर महिन्याला अंदाजे एक किलोने कमी झाले. असे वर्षाला दहा किलो कमी झाले. ज्या प्रमाणात वजन कमी झाले त्या प्रमाणात उच्च रक्तदाबही कमी झाला. मधुमेह कमी झाला. असे दर चौथ्या व्यक्तीचे वजन १५ किलोने कमी झाले. याचा अर्थ दर चौथ्या व्यक्तीचा मधुमेह गेला. या गटाचा त्यांनी पाच वर्षे पुढे अभ्यास केला. त्यातून हे कळले की, ज्यांनी ज्या प्रमाणात आहार कमी ठेवला, व्यायाम चालू ठेवला, त्यांना त्या प्रमाणात लाभ मिळाला.

यावरून असे निष्कर्ष मिळतात की, ज्यांचे पोट दिसते, ज्यांना मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्यांनी आहार कमी करायला हवा. हालचाल व व्यायाम वाढवावा. आपले वजन कमी करावे व मधुमेह व उच्च रक्तदाबातून मुक्त व्हावे. यासाठी सर्वांनीच उभे राहून सर्व कामे करावीत. दुसरा पर्याय नाही. असे केल्याने त्यांच्या हृदयाचा त्रास कमी होईल आणि आयुष्य निरोगी, सुखी होईल.

यासाठी नियोजनबद्ध आहार घ्यायला हवा. प्रत्येकाला गरजेचा असणारा ८५० कॅलरी देणारा आहार खालील प्रकारे मिळवता येईल. त्या आहाराचे हे सूत्र लक्षात ठेवावे.

* एक किलो काकडी, कोशिंबिरी खाल्ल्या तर २०० कॅलरी मिळतात. हे भरपूर खा, याने पोट भरते आणि सतत भूकही लागत नाही.

* पुढील गोष्टी प्रत्येकी अंदाजे १०० कॅलरी देतात. एक वाटी भात, एक वाटी डाळ, एक मध्यम आकाराची पोळी, एक केळ व त्या आकाराचे त्या गोडीचे दुसरे एखादे फळ.

* एक समोसा खाल्ल्यास २५० कॅलरी मिळतात. त्यासारख्या त्या आकाराच्या इतर वस्तूंनीही अशा कॅलरी मिळतील म्हणून त्या टाळा. मिठाई, साखर टाळा. घराबाहेरचे सर्व अन्न टाळा. बेकरीचे सर्व अन्न व बिस्किटे खाणे टाळा.

* प्रेमाचा अर्धा कप चहा किंवा तीन बिस्किटे रोज एकदा कमी केल्यास दरमहा पाव किलो वजन आपोआप कमी होते. हे कराल तर वरील प्रयोगातील दुसऱ्या गटाप्रमाणे समाविष्ट होऊन मधुमेह, उच्च रक्तदाबमुक्त व्हाल.

यासाठी आपली दैनंदिनी लिहा. आपण दिवसभरात काय खाल्ले, काय योग, सूर्य नमस्कार, व्यायाम, हालचाल केली ते लिहा. आपण किती कॅलरी घेतल्या हे मोजा आणि कमीत कमी कॅलरी घ्या. यातूनही जादाची कॅलरी खर्च होईल. हे न कराल तर आपण पहिल्या गटातच रहाल. वजन कमी न केल्यास औषध, पथ्य करूनही आजार बळावतो, असे हाच प्रयोग सांगतो.

ज्या महिलांची, पुरुषांची आणि मुलांची कंबर बारीक नाही, जाड आहे, त्यांच्या अंगात साखर, चरबी जास्त आहे, त्यांचा रक्तदाब वाढलेला आहे, हे ओळखावे. या सर्वांनी आजच आपला रक्तदाब मोजावा. पोटाचा घेर मोजावा आणि जास्त कष्ट करून खेळून, धावून, उड्या मारून पळून आपली कंबर बारीक करावी. घरी असलेल्या विठ्ठल-रुखमाईसारखे उभ्याने सर्व कामे करावीत. यासाठी हवे तर वारकरी व्हा. वारकऱ्यांसारखे अनेक किलोमीटर रोज चालावे. ८० सेंटिमीटरपेक्षा जास्त ज्याची कंबर आहे तो/ ती जाड, आजारी आहे, असे समजावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT