Dehydration symptoms | डिहायड्रेशन ओळखायचे कसे? 
आरोग्य

Dehydration symptoms | डिहायड्रेशन ओळखायचे कसे?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. महेश बरामदे

भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. वाढत्या तापमानासोबतच हवेतील आर्द्रता वाढल्यास शरीरातील घाम सुकण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे शरीराची नैसर्गिक शीतकरण यंत्रणा कोलमडू शकते.

निर्जलीकरण किंवा डिहायड्रेशन म्हणजे केवळ तहान लागणे नाही. हे शरीरातील द्रव्यांचे एक क्लिनिकल असंतुलन आहे. याचे रूपांतर काही तासांतच उष्माघातात होऊ शकते. आपण केवळ उष्णतेने त्रस्त आहोत की, शरीरातील पाणी धोकादायक पातळीपर्यंत कमी झाले आहे, हे ओळखण्यासाठी काही घरगुती चाचण्या उपयुक्त ठरू शकतात.

त्वचेची लवचिकता थेट शरीरातील पाण्याच्या प्रमाणाशी संबंधित असते. पिंच टेस्ट ही चाचणी करण्यासाठी हाताच्या मागील बाजूची किंवा खालच्या हाताची त्वचा दोन बोटांनी काही सेकंद जोरात चिमटीत पकडा आणि नंतर सोडून द्या. शरीर व्यवस्थित हायड्रेटेड असेल, तर त्वचा त्वरित आपल्या मूळ स्थितीत परत येते. मात्र, यासाठी वेळ लागत असेल किंवा ती तशीच उभी राहत असेल, तर ते मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या निर्जलीकरणाचे लक्षण आहे.

रक्ताभिसरण आणि पाण्याचे प्रमाण तपासण्यासाठी कॅपिलरी रिफिल टेस्ट ही चाचणी क्लिनिकल क्षेत्रात वापरली जाते. आपला हात हृदयाच्या पातळीच्या वर धरा आणि एका नखावर पांढरे होईपर्यंत जोरात दाब द्या. दाब काढून टाकल्यावर जर नखाचा गुलाबी रंग परत येण्यासाठी दोन सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला, तर रक्तातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्ताभिसरण मंदावले असल्याचे ते निदर्शक आहे.

यकृत आणि मूत्रपिंड शरीरातील पाण्याचे नियमन करतात. शरीरात पाणी कमी असल्यास मूत्रपिंड ते वाचवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे लघवी अधिक गडद रंगाची होते. लघवीचा रंग फिकट पिवळा किंवा लिंबाच्या रंगासारखा असेल, तर तुम्ही सुरक्षित आहात. मात्र, तो सफरचंदाच्या रसासारखा गडद पिवळा असेल, तर लगेच पाणी पिणे आवश्यक आहे. हा रंग गडद नारंगी किंवा तपकिरी असल्यास ती वैद्यकीय आणीबाणी असूनख मूत्रपिंडावर ताण येत असल्याचे लक्षण आहे.

वृद्ध व्यक्तींमध्ये अनेकदा तहान लागल्याची जाणीव उशिरा होते, अशा वेळी तोंडातील ओलसरपणा तपासणे महत्त्वाचे ठरते. आपली जीभ दातांवरून आणि टाळूवरून फिरवा. तोंडातून लाळ निसरडी आणि ओली वाटणे हे आरोग्याचे लक्षण आहे. लाळ चिकट वाटत असेल किंवा जीभ कोरडी पडली असेल, तर शरीर महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करण्यासाठी लाळ ग्रंथींमधील पाणी वळवत असल्याचे हे चिन्ह आहे.

निर्जलीकरणामुळे उरलेले रक्त शरीरात फिरवण्यासाठी हृदयाला अधिक वेगाने काम करावे लागते. एक मिनिट झोपलेल्या अवस्थेत स्वतःची नाडी तपासा आणि नंतर लगेच उभे राहून पुन्हा नाडी तपासा. हृदयाचे ठोके प्रतिमिनिट 15 ते 20 पेक्षा जास्त वाढले असतील, तर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे हे संकेत आहेत. उभे राहिल्यावर चक्कर येणे हे देखील याच स्थितीचे लक्षण आहे.

या घरगुती चाचण्या केवळ प्राथमिक निदानासाठी आहेत. एखाद्या व्यक्तीला ग्लानी येणे, 102 अंशांपेक्षा जास्त ताप असणे किंवा पाणी पिणे अशक्य होणे असा त्रास होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT