डॉ. मनोज शिंगाडे
घरातील प्रथमोपचार पेटीत ताप, सर्दी, डोकेदुखीपासून इतर आजारांपर्यंतची अनेक औषधे ठेवलेली असतात. औषधाची मुदत संपली आहे की नाही, हे आपण आवर्जून पाहतो; मात्र औषध कोणत्या वातावरणात साठवले आहे, याकडे अनेकदा दुर्लक्ष होते.
पावसाळ्यातील दमट हवा, जास्त उष्णता आणि थेट सूर्यप्रकाश यामुळे काही औषधांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुदत संपलेली नसली तरी औषध वापरण्यापूर्वी त्याच्या स्वरूपात बदल झाला आहे का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
औषध खराब झाले आहे का हे ओळखण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा.
गोळीचा मूळ रंग बदलला असेल किंवा तिच्यावर अनोळखी डाग दिसत असतील तर ती वापरण्यापूर्वी सावध व्हावे.
ओलाव्याच्या संपर्कात आल्याने काही गोळ्या फुगू शकतात किंवा त्यांना तडे जाऊ शकतात. हा बदल औषध योग्य स्थितीत नसल्याचा संकेत असू शकतो. नेहमी कडक असणारी गोळी मऊ पडली असेल किंवा अनेक गोळ्या एकमेकांना चिकटल्या असतील तर त्यामागे दमट वातावरण कारणीभूत असू शकते.
द्रवरूप औषध किंवा सिरपचा रंग, वास अथवा घट्टपणा नेहमीपेक्षा वेगळा वाटत असल्यास ते दुर्लक्षून वापरू नये. द्रवरूप औषधामध्ये पूर्वी नसलेले कण, गुठळ्या किंवा अन्य अनपेक्षित बदल दिसत असतील तर ते औषध वापरण्यापूर्वी डॉक्टर किंवा औषधविक्रेत्याचा सल्ला घ्यावा.
औषधे कुठे ठेवावीत?
सर्व औषधांसाठी एकच साठवण पद्धत योग्य नसते. औषधाच्या पाकिटावर किंवा बाटलीवर दिलेल्या साठवणुकीच्या सूचना सर्वांत महत्त्वाच्या आहेत. काही औषधे सामान्य खोलीच्या तापमानात ठेवता येतात, तर काहींसाठी विशिष्ट तापमान आवश्यक असते. त्यामुळे स्वतःच्या अंदाजाने औषध फ्रीजमध्ये ठेवणेही योग्य नाही.
औषधे थेट सूर्यप्रकाश, जास्त उष्णता आणि ओलावा यापासून दूर ठेवावीत. स्वयंपाकघरातील उष्ण जागा किंवा सतत ओलावा असणारी जागा औषधांच्या साठवणुकीसाठी टाळणे चांगले. औषध मूळ पॅकिंगमध्ये ठेवल्यास त्यावरील वापर आणि साठवणुकीच्या सूचना सहज तपासता येतात.