नवीन संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की लठ्ठपणा केवळ शारीरिक आरोग्याचाच नाही, तर मानसिक आरोग्याचाही मोठा शत्रू ठरू शकतो. एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार जॉर्जिया स्टेट विद्यापीठाच्या डॉ. डेसिरे वँडर्स यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अभ्यासात लठ्ठपणा, चिंता आणि मेंदूच्या कार्यक्षमतेमधील नातेसंबंध उघड करण्यात आला आहे.
या अभ्यासात उंदरांवर प्रयोग करण्यात आला. काही उंदरांना कमी फॅट असलेला आहार तर काहींना जास्त फॅट असलेला आहार दिला गेला. जास्त फॅट घेतलेल्या उंदरांमध्ये लठ्ठपणा वाढला आणि त्यांच्यात अधिक चिंता निर्माण झाली. विशेष म्हणजे त्यांच्या मेंदूतील हायपोथॅलॅमस या भागामध्ये सिग्नलिंग पद्धतीतही बदल आढळून आला.
तसेच, लठ्ठ उंदरांच्या पचनसंस्थेमधील बॅक्टेरियांच्या रचनेतही बदल दिसून आला, जे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतात. हे निष्कर्ष सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात.
डॉ. वँडर्स म्हणाल्या, "आमच्या संशोधनातून दिसून आले की आहारामुळे निर्माण होणारा लठ्ठपणा मानसिक आरोग्यावर परिणाम करतो. विशेषतः चिंता वाढण्याची शक्यता असते. मेंदूच्या कार्यपद्धतीत बदल आणि पचनसंस्थेतील बिघाड यामुळे हा परिणाम होत असल्याचे संकेत मिळतात."
लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या आजारांचे कारण ठरतोच, पण आता हेही स्पष्ट होत आहे की तो मेंदूच्या क्षमतेवर व मानसिक स्थितीवरही परिणाम करू शकतो. त्यामुळेच लठ्ठपणावर वेळीच नियंत्रण मिळवणे व पौष्टिक आहार घेणे, हे केवळ शरीरासाठीच नव्हे तर मेंदूसाठीही अत्यंत आवश्यक आहे, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.