Cancer Risk Factors | ​​कर्करोग होतो कसा? 
आरोग्य

Cancer Risk Factors | ​​कर्करोग होतो कसा?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. हेमंत जोशी, डॉ. अर्चना जोशी

भिंत विटांची बनते, तसे शरीर छोट्या पेशींनी बनते. रोज अनेक पेशी मरतात, पुन्हा रोज तयार होतात. पण, शरीरात काही गडबड झाल्याने नवीन पेशी खूप बनतात, त्या शरीर खराब करतात, याला कर्करोग म्हणतात.

कर्करोगात याच रोगाच्या पेशी वाढतात. प्रत्येक पेशी थोड्या काळात दुप्पट होतात. दोनाच्या ४, ८,१६, ३२ होतात. अशा त्या वाढतच जातात. त्या इतर पेशी आणि गरजेचे अन्न संपवतात. शरीर संपवतात. यासाठी स्वत:वर मर्यादा हवी.

अन्न घेण्याचा योग्य प्रकार

भूक लागली तरच खा. अर्धीच भूक भागवा. जे खातो त्याचा निम्मा भाग भाजी, कोशिंबीर, फळ यांचा असावा. तिसरा हिस्सा डाळ, मांसाहार यांचा असावा. चौथा हिस्सा भात किंवा पोळी यांचा. थोडे दही असावे.

जाडेपणा कमी करायला भात, पोळी, बटाटा, साबुदाणा, नाश्ता, चहा बंद करावा. त्याऐवजी भाजी, कोशिंबीर, फळ, पाणी घ्यावे. सर्वांचे अर्धे पोट भरेल एवढेच अन्न शिजवायला हवे. आग्रहाने वाढणे, जेवण संपवणे टाळावे. याने बद्धकोष्ठ, कर्करोग, जाडेपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यांचा त्रास घटेल.

तंबाखू , सिगारेट, दारूने कर्करोग होतो. ही व्यसने काही टक्केच लोक करतात. पण, दर तिसऱ्या बाईचे पोट दिसते. म्हणजे ती जाड आहे. बारीक होता येत नाही म्हणून ती व्यक्ती निराश आहे. जाडेपणा हेच कर्करोग, हृदयाचा आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, लकवा यांचे मूळ कारण आहे.

इंडोनेशियाच्या डॉ. हॅरी वॅटोन यांच्याविषयी एक गोष्ट आहे. त्यांची मुलगी शाळेतून आल्यावर त्यांना म्हणाली,‘‘बाबा मी कॉलेजला जाईल तेव्हा तू नसशील. आज आमच्या बाई रडत होत्या. त्यांचा तरुण नवरा मेला. तो सिगारेट ओढायचा. तू पण सिगारेट ओढतो. मग...’’ न सुटणारी डॉक्टरांची सिगारेट मुलीच्या एका सांगण्याने सुटली. आता ते डॉक्टर मुलांना आरोग्याचे महत्त्व सांगतात.

कारखान्यात तेल, कोळसा जाळतात. त्याच्या धुराड्याला काजळी धरते. ती पुसणाऱ्यांना काजळीतील रसायनाने कर्करोग होतो. तसाच सिगारेटच्या धुरातील रसायनाने कर्करोग होतो. स्वयंपाकघरातील धूर व वाहनांचा धूरही असाच अपायकारक आहे.

भारतातील एका भागातून अचानक कर्करोग झालेले खूप रुग्ण यायला लागले. डॉक्टरांनी अभ्यास केला. त्यांना दिसले की, तेथे सगळीकडे झाडांवर एन्डोसल्फान नावाचे औषध फवारतात. आता त्या एन्डोसल्फानवर बंदी आहे.

शेतीत फवारलेली कीटनाशके विषारी असतात. ती भाजी, फळांवर चिकटलेली असतात. म्हणूनच फळे, भाजीपाला नीट धुवून घ्यावा.

स्त्रियांमध्ये सर्वाधिक कर्करोग स्तनांचा होतो. पण, बाळाला दूध पाजणाऱ्यांमध्ये याचे प्रमाण कमी असते. तर दुसरा कर्करोग गर्भाशयाचा होतो. सर्व स्त्रियांनी आपल्या छातीत गाठ आहे का हे तपासून घ्यावे.

भारतात तोंडाचा, छातीचा व अन्ननलिकेचा कर्करोग सर्वाधिक होतो. हा तंबाखू, सिगारेटमुळे होतो. हे टाळावे. प्रोस्टेटचा पण कर्करोग होतो.

कारणाशिवाय दुखणे, रक्त जाणे, वजन घटणे, गाठ येणे, आवाज बदलणे असे झाले तर हा कर्करोग असू शकतो. लगेच डॉक्टरांना भेटावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT