डॉ. महेश बरामदे
आजच्या घडीला चुकीचा आहार, अनियमित दिनक्रम, सतत वाढता ताण आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे ग्रेड-1 फॅटी लिव्हर ही अवस्था झपाट्याने वाढत आहे. ही लिव्हरशी संबंधित सुरुवातीची समस्या असून, वेळीच निदान झाले आणि योग्य बदल केले तर नंतरचे गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात.
फॅटी लिव्हरमध्ये यकृताच्या पेशींमध्ये चरबी साचू लागते. यकृताच्या वजनातील 5 ते 10 टक्के भाग चरबीने व्यापला जातो, तेव्हा त्या अवस्थेला ‘ग्रेड-1 फॅटी लिव्हर’ असे म्हणतात. ही या रोगाची सर्वात प्रारंभिक पायरी मानली जाते. सामान्य आणि निरोगी लिव्हरमध्ये चरबी अतिशय कमी प्रमाणात असते. मात्र, हे प्रमाण वाढू लागले की लिव्हरची नियमित कार्यक्षमता बाधित होते. या अवस्थेत बहुतेकांना काहीही लक्षणे जाणवत नाहीत. परंतु, दुर्लक्ष केल्यास ही समस्या ग्रेड-2 किंवा ग्रेड-3 पर्यंत पोहोचू शकते आणि तेव्हा परिस्थिती गुंतागुंतीची बनू शकते.
कारणे काय?
ही समस्या अचानक उद्भवत नाही. ती आपल्या दैनंदिन सवयींशी थेट जोडलेली असते. अनियमित आणि असंतुलित आहार, साखर आणि कार्बोहायड्रेटचे अति सेवन, मद्यपान, इन्सुलिन रेजिस्टन्स, प्री-डायबिटीज, डायबिटीज, व्यायामाचा अभाव आणि आनुवंशिक घटक ही याची कारणे आहेत.
लक्षणे कोणती?
खरे पाहता, या अवस्थेला लक्षणहीन पातळी म्हणतात. कारण, बहुतेकांना कोणतीही ठोस लक्षणे जाणवत नाहीत. तरी शरीर हे कोणत्याही बदलांचे संकेत देतच असते. त्यानुसार यकृतात चरबी साठू लागल्यानंतर म्हणजेच फॅटी लिव्हर ग्रेड-1 ची सुरुवात झाली की, थोडेसे कष्ट केल्यानंतर थकवा जाणवणे, उजव्या बाजूला बरगडीखाली हलका त्रास जाणवणे, वारंवार गॅस, अपचन किंवा जेवल्यावर अस्वस्थता जाणवणे, पोट जड वाटणे अशी लक्षणे दिसू लागतात. यकृत शरीराला ऊर्जा पुरवत असल्यामुळे त्याची कार्यक्षमता घटल्यास मानसिक थकवाही जाणवतो.
या समस्येच्या निदानासाठी अल्ट्रासाऊंड ही सर्वात सोपी आणि खात्रीलायक चाचणी मानली जाते. या तपासणीत लिव्हर किंचित उजळ दिसणे किंवा आकार वाढणे याची माहिती मिळते, जी फॅटी लिव्हर ग्रेड-1ची पुष्टी करते. यासह लिव्हर फंक्शन टेस्ट, लिपिड प्रोफाईल आणि ब्लड शुगर तपासण्या यामुळे संपूर्ण चयापचय स्थितीचे चित्र स्पष्ट होते. निदानाच्या या प्रारंभी टप्प्यावर योग्य हस्तक्षेप केल्यास यकृत पुन्हा सद़ृढ किंवा पूर्ववत होण्याची क्षमता अत्यंत जास्त असते. त्यामुळे ही अवस्था धोकादायक ठरावी असे काहीच कारण राहत नाही. अट एकच, उपचाराची सुरुवात योग्य वेळी झाली पाहिजे.
उपचाराच्या द़ृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जीवनशैलीतील शिस्तबद्ध बदल. जादा वजन असलेल्या व्यक्तींनी केवळ 5 ते 10 टक्के वजन कमी केले तरी लिव्हरमधील चरबीचे प्रमाण स्पष्टपणे घटते. नियमित चालणे, हलका व्यायाम, शरीराला सक्रिय ठेवणारे साधे उपक्रम जसे की, जिने वापरणे, दर तासाने उठून काही पावले चालणे ही छोटी कृतीही मोठा फरक घडवते. आहारात कमी तेल, कमी साखर आणि अधिक तंतुमय पदार्थांचा समावेश केल्यास लिव्हरवरील ताण घटतो. फळे, भाज्या, डाळी, संपूर्ण धान्ये आणि भरपूर पाणी यांचे सेवन शरीराच्या स्वच्छता प्रक्रियेला चालना देते. मद्यसेवन पूर्णपणे टाळणे हे या अवस्थेत सर्वात सुरक्षित पाऊल मानले जाते. काही रुग्णांमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स अथवा वाढलेल्या एन्झाईम्ससाठी डॉक्टर आवश्यक असल्यास विशिष्ट औषधोपचार सुचवतात; परंतु सुरुवातीच्या टप्प्यात औषधांपेक्षा शिस्तबद्ध सवयींचा लाभ अधिक प्रभावी ठरतो.