कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा
कुणी कुणाशी बोलायचे नाही. शाळा-महाविद्यालयांतून सुटका झाल्यावर, कामावरून घरी परतताना; इतकेच नव्हे, तर घरात सतत कानाला हेडफोन लावून गाणी ऐकण्याचे अनेकांना फॅड आहे.
दिवसभरात आठ तासांपेक्षा अधिक काळ हेडफोन वापरल्यास आणि 80 ते 90 डेसिबलपेक्षा जास्त क्षमतेचा आवाज कानावर पडल्यास श्रवणक्षमतेवर परिणाम होऊन बहिरेपणा येऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
सीपीआरच्या नाक, कान, घसा विभागाकडे दररोज 80 ते 100 रुग्ण दाखल होतात. यामध्ये हेडफोनचा अतिरेकी वापर केल्यामुळे कानावर गंभीर परिणाम झाल्याचे तीन ते चार रुग्ण आढळू लागले आहेत.
हेडफोनच्या अतिवापरामुळे ऐकू येत नसल्याचे अनेक रुग्ण सांगतात. गेल्या काही महिन्यांपासून कानाला हेडफोन लावून बोलण्याचे फॅड तरुणांसह अन्य नागरिकांमध्ये पसरले आहे.
त्याचे अनुकरण लहान मुले करताना दिसून येत आहेत. या सगळ्याचा गंभीर परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत असून सर्वांनीच दक्ष राहणे गरजेचे आहे.
आता तरुणांच्या आरोग्यावर दिसून येत आहेत. दिवसभर काम करताना, कामावरून घरी परतताना, प्रवासात असताना, समारंभात सहभागी होताना, इतकेच नव्हे तर जेवतानाही अनेकांच्या कानात हेडफोन असतोच. त्यामुळेच तरुणांसह विद्यार्थ्यांमध्ये हेडफोन सिंड्रोमचे प्रमाण वाढल्याचे आढळून येत आहे.
एकाग्रता कमी होणे, चिडचिडेपणा असे प्रकार हेडफोन वापरामुळे होतात. अतिवापरामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो. आठ ते दहा तास हेडफोन वापरल्यास आणि 80 ते 90 डेसिबलपेक्षा जास्त क्षमतेचा आवाज कानावर पडत असल्यास श्रवणक्षमतेवर परिणाम होऊन बहिरेपणा येऊ शकतो.- डॉ. अजित लोकरे (सीपीआर कान, नाक, घसा विभाग प्रमुख)