Dirty Vegetables Brain Dangerous | अस्वच्छ भाज्यांचे सेवन मेंदूसाठीही घातक 
आरोग्य

Dirty Vegetables Brain Dangerous | अस्वच्छ भाज्यांचे सेवन मेंदूसाठीही घातक

पुढारी वृत्तसेवा

डॉ. महेश बरामदे

लहान मुलांमध्ये अचानक फिटस् येण्याचे प्रमाण वाढले असून यामागे ताप किंवा आनुवंशिकता यापेक्षाही संसर्गजन्य कारणे अधिक प्रभावी ठरत असल्याचे वैद्यकीय निदानातून समोर येत आहे. लोकसंख्येची घनता आणि विस्कळीत अन्नपुरवठा साखळी असलेल्या भागांमध्ये मेंदूच्या संसर्गाचे प्रमाण चिंताजनक असून यात न्यूरोसिस्टिकर्सोसिस हा आजार प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे.

अनेकदा ज्या मुलांच्या मेंदूत जन्मत: कोणताही दोष नसतो, त्यांना अचानक फिटस् येऊ लागल्याने पालकांमध्ये घबराट निर्माण होते. परंतु याचे मूळ जैविक संसर्गात असल्याचे काही चेतापेशी तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. हा आजार प्रामुख्याने डुकराच्या पट्टकृमीच्या म्हणजे टॅनिया सोलियमच्या अंड्यांमुळे होतो आणि बालकांमधील फिटस्चे हे सर्वात सामान्य संसर्गजन्य कारण मानले जाते. या आजाराचा प्रसार होण्याबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. मात्र हा संसर्ग केवळ मांस खाल्ल्याने होतो असे नाही, तर तो प्रामुख्याने दूषित माती किंवा अस्वच्छ अन्नाद्वारे शरीरात पोहोचतो.

कोबीसारख्या पानांचे थर असणार्‍या भाज्या व्यवस्थित धुतल्या नाहीत, तर त्यामध्ये ही सूक्ष्म अंडी अडकून राहतात. महत्त्वाची बाब म्हणजे मेंदूत प्रत्यक्ष जंत जात नाहीत, तर ही सूक्ष्म अंडी रक्ताद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतात आणि तिथे स्थिरावतात. ही अंडी पोटातील आम्लामध्येही नष्ट होत नाहीत. त्यामुळे ती शरीराच्या अंतर्गत प्रवासात जिवंत राहतात. जेव्हा ही अंडी मेंदूच्या ऊतींमध्ये शिरतात, तेव्हा मानवी शरीर त्यांना बाह्य घटक ओळखून त्याविरुद्ध प्रतिक्रिया देते आणि त्या भागावर सूज येते. ही सूज मेंदूतील विद्युत लहरींच्या कार्यात अडथळा आणते आणि त्यातून फिटस् किंवा झटके येण्याचा त्रास सुरू होतो.

लक्षणे कोणती?

या आजाराची सुरुवातीची लक्षणे अत्यंत साधी असल्याने अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मुलांमध्ये सतत होणारी डोकेदुखी, पोटातील बिघाडाशिवाय होणार्‍या उलट्या, अचानक जाणवणारी सुस्ती किंवा वर्तनातील बदल ही या आजाराची पूर्वलक्षणे असू शकतात.

नवीन अभ्यासानुसार, मेंदूतील ज्या भागात ही अंडी पोहोचतात, त्यानुसार मुलाची द़ृष्टी जाणे किंवा चालताना तोल जाणे असे गंभीर प्रकारही घडू शकतात. तापाशिवाय किंवा पूर्वी कोणताही त्रास नसताना अचानक फिटस् येणे हे या आजाराचे प्रमुख लक्षण मानले जाते. अशा वेळी तातडीने बे्रन स्कॅनिंग चाचणी करणे गरजेचे असते. यामुळे वेळेवर उपचार करून पुढील गुंतागुंत टाळता येते.

पूर्णपणे टाळणे शक्य

न्यूरोसिस्टिकर्सोसिस हा आजार केवळ स्वच्छतेच्या अभावामुळे होणारा आजार असल्याने तो पूर्णपणे टाळणे शक्य आहे. भाज्या नळाच्या वाहत्या पाण्याखाली व्यवस्थित धुणे आणि त्या चांगल्या प्रकारे शिजवून खाणे हाच यावर सर्वात प्रभावी उपाय आहे. ही अंडी उकळत्या तापमानात नष्ट होतात. वैयक्तिक स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची शुद्धता आणि घराभोवतीचे आरोग्यदायी वातावरण या गोष्टींची काळजी घेतल्यास बालकांना या गंभीर समस्येपासून सुरक्षित ठेवता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT