Hot tea Esophageal cancer risk
नवी दिल्ली : अनेकांना गरमागरम चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. वाफाळलेला चहा किंवा कॉफी काही जणांना आवडते. मात्र, जर तुम्ही जीभ किंवा तोंड भाजेल इतका गरम चहा किंवा कॉफी पीत असाल, तर तुम्हाला ही सवय बदलावी लागेल. अलीकडील संशोधनानुसार, अतिशय गरम चहा किंवा कॉफीचे सेवन केल्याने अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो.
याबाबतचा एक अभ्यास इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर मध्ये प्रकाशित झाला आहे. यात युनायटेड किंगडममधील सुमारे ९,७०,००० लोकांच्या माहितीचा समावेश आहे. या संशोधनात प्रामुख्याने गरम चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आणि अन्ननलिकेचा कर्करोग यांच्यातील संबंध तपासण्यात आला.
ज्या लोकांनी खूप जास्त गरम चहा किंवा कॉफी घेतली, त्यांच्यामध्ये 'इसोफेजियल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा' या अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या प्रकाराचा धोका सामान्य तापमानाचे चहा-कॉफी पिणाऱ्यांच्या तुलनेत अधिक आढळला. हा धोका तीन पटींपर्यंत अधिक असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, याचे कारण चहा किंवा कॉफीमधील एखादा विशिष्ट घटक नसून, उष्णतेमुळे तोंड किंवा अन्ननलिकेला होणारी इजा हे आहे.
तोंडापासून पोटापर्यंत अन्न पोहोचवणारी नलिका अन्ननलिका म्हणतात. अतिगरम पदार्थ किंवा पेय वारंवार घेतल्यास त्याचा थेट परिणाम या नलिकेवर होतो. सततच्या उष्णतेमुळे अन्ननलिकेच्या आतील भागातील पेशींना इजा होऊ शकते. वारंवार होणाऱ्या या नुकसानीमुळे काही वेळा पेशींच्या वाढीमध्ये बदल होऊ शकतात. काही परिस्थितींमध्ये पेशींची असामान्य वाढ कर्करोगास कारणीभूत ठरू शकते. मात्र, गरम चहा किंवा कॉफी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कर्करोग होतो, असा याचा अर्थ नाही.
संशोधनानुसार, दिवसातून सहा किंवा त्यापेक्षा अधिक गरम पेये घेणाऱ्या व्यक्तींमध्ये अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका अधिक असल्याचे आढळले. चहा किंवा कॉफी किती गरम प्यावी, यासाठी तज्ज्ञांनी साधा नियम सांगितला आहे. चहा किंवा कॉफी तयार झाल्यानंतर लगेच पिऊ नका. काही मिनिटे ते थंड होऊ द्या आणि त्यानंतर हळूहळू घोट घेत प्या. चहा किंवा कॉफी घेताना ओठ किंवा जीभ भाजत असेल, तोंडात तीव्र उष्णता जाणवत असेल किंवा सहज घोट घेता येत नसेल, तर पिणे टाळावे. अतिगरम वारंवार पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.