डॉ. महेश बरामदे
सामान्यतः रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ४८ तासांनंतर या संसर्गाची लक्षणे दिसून येतात. विशेषतः वृद्ध रुग्ण, उपचारादरम्यान प्रतिकारशक्ती खालावलेले लोक किंवा आधीपासूनच इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असणार्या व्यक्तींसाठी हा आजार अत्यंत घातक ठरू शकतो. हा संसर्ग प्रामुख्याने श्वासमार्गात सूक्ष्मजीवांच्या प्रवेशामुळे होतो. तोंडातील किंवा जठरातील द्रवपदार्थ नकळत फुप्फुसात गेल्याने तेथे सूज निर्माण होते. या संसर्गासाठी प्रामुख्याने एरोबिक ग्रॅम-नेगेटिव्ह बॅक्टेरिया कारणीभूत असतात. याशिवाय स्टॅफिलोकोकस ऑरियस, सुडोमोनास एरुगिनोसा, इशिरिचिया कोलाय आणि क्लेबसिएला न्यूमोनी हे जीवाणूदेखील मोठ्या प्रमाणावर न्यूमोनिया पसरवतात.
काही प्रकरणांमध्ये इन्फ्लुएंझा किंवा हर्पीससारखे विषाणू आणि बुरशीजन्य संसर्गसुद्धा या आजाराला कारणीभूत ठरतात. ज्या रुग्णांना मधुमेह, हृदयविकार, पक्षाघात किंवा फुप्फुसाचे जुने आजार आहेत, त्यांना या संसर्गाचा धोका अधिक असतो. तसेच ७० वर्षांवरील वृद्ध, अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असणारे रुग्ण किंवा छातीची शस्त्रक्रिया झालेले लोक या आजाराला लवकर बळी पडतात.
रुग्णाला जास्त ताप येणे, श्वासोच्छ्वासाचा वेग वाढणे, छातीतून घरघर आवाज येणे, कफयुक्त खोकला येणे, नाडीचे ठोके अनियमित होणे आणि रुग्णाची मानसिक स्थिती खालावून गोंधळ निर्माण होणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत. याचे निदान करण्यासाठी क्ष-किरण तपासणी केली जाते. परंतु, रोगाची अचूक व्याप्ती आणि संसर्गाचे मूळ स्वरूप जाणून घेण्यासाठी संगणकीय टॉमोग्राफी म्हणजेच सीटी स्कॅन अधिक प्रभावी ठरते. सीटी स्कॅनमुळे फुप्फुसातील संसर्ग जीवाणू, विषाणू की बुरशीमुळे झाला आहे हे स्पष्ट होते.
या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी रुग्णालयांमध्ये योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. रुग्णांची तोंडाची स्वच्छता राखणे, डोक्याचा भाग पाठीपेक्षा थोडा उंचावर ठेवणे आणि रुग्णाला हालचाल करण्यास प्रोत्साहन देणे या गोष्टी फायदेशीर ठरतात. वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णाला भेटायला येणार्या नातेवाईकांनी हातांची स्वच्छता राखणे आणि निर्जंतुकीकरणाच्या नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. योग्य वेळी झालेले निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार आणि रुग्णालयातील स्वच्छता यांच्या समन्वयातून या आजारावर यशस्वीपणे मात करता येते.