डॉ. राजेश जोशी
भारतात सध्या एक अद़ृश्य आरोग्य संकट उभे राहिले आहे. अनेकजण दिसायला तंदुरुस्त असले, तरी त्यांना सुप्त दाहाची समस्या भेडसावत असते. या स्थितीला ‘स्लो बर्न’ असे संबोधत आहेत. मधुमेह, हृदयविकार आणि फॅटी लिव्हर यांसारख्या आजारांच्या वाढत्या प्रमाणामागे हेच मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.
भारतीयांमध्ये ‘थिन-फॅट फिनोटाईप’ ही स्थिती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यात व्यक्तीचा ‘बीएमआय’ सामान्य असतो; परंतु पोटाच्या अंतर्गत अवयवांभोवती घातक चरबी साठलेली असते. ही चरबी केवळ निष्क्रिय मांस नसून ती एका ग्रंथीप्रमाणे काम करते आणि शरीरात सतत दाह निर्माण करणारे घटक सोडत असते. जनुकीय रचनेमुळे दक्षिण आशियाई लोकांमध्ये त्वचेखाली चरबी साठवण्याची मर्यादित क्षमता असल्यामुळे ही अतिरिक्त चरबी थेट यकृत आणि हृदयाभोवती जमा होते.
आहारातील अतिप्रक्रिया केलेले पदार्थ, शुद्ध कर्बोदके आणि साखरेचा अतिवापर यामुळे हा दाह अधिक तीव्र होतो. फायबरचा अभाव असलेल्या आहारामुळे आतड्यांमधील सूक्ष्मजीवांचे संतुलन बिघडून त्याचा परिणाम शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. याव्यतिरिक्त, हवेचे वाढते प्रदूषण आणि अपुरी झोप हे घटकही आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. संशोधनानुसार, रात्रीची झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीरातील ‘सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन’ वाढते. अंतर्गत सूज किंवा दाहाचे ते निदर्शक असते.
या समस्येवर मात करण्यासाठी आहारात आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. हळद आणि काळी मिरी यांचे मिश्रण नैसर्गिक दाहशामक म्हणून कार्य करते. आहारात हिरव्या पालेभाज्या, ओमेगा-3 युक्तपदार्थ आणि प्रथिनांचा समावेश वाढवणे गरजेचे आहे. केवळ वजन कमी करण्यापेक्षा शरीरातील चरबीचे प्रमाण संतुलित ठेवण्यावर भर दिला पाहिजे. नियमित शारीरिक हालचाल, तणावमुक्ती आणि किमान सात ते आठ तासांची गाढ झोप हे या ‘स्लो बर्न’ला रोखण्याचे प्रभावी मार्ग आहेत.