डॉ. अपर्णा गोविल-भास्कर
हर्नियाचा त्रास अबालवृद्धांना, कोणालाही होऊ शकतो. हर्निया हा आपोआप बरा होणारा आजार नाही. योग्यवेळी उपचार न केल्यास तो गंभीर आणि जीवघेणाही ठरू शकतो.
स्ट्रँग्युलेटेड हर्निया आणि इन्कार्सरेटेड हर्निया या दोन्ही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती मानल्या जातात. त्यामुळे त्यांना त्वरित शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. याच कारणामुळे, डॉक्टर सर्व प्रकारच्या हर्नियासाठी, मग तो साधा असो वा गुंतागुंतीचा, शस्त्रक्रियेची शिफारस करतात. हर्निया शस्त्रक्रिया ही एक अशी प्रक्रिया आहे, जी स्नायूंच्या कमकुवत जागेतून बाहेर आलेल्या अवयवाला त्याच्या मूळ जागी परत आणण्यासाठी केली जाते. सहसा, त्यास आधारासाठी जाळी (मेश) लावली जाते.
हर्नियाचे उपचार करताना हर्नियाची शस्त्रक्रिया ही ओपन पद्धतीने किंवा लॅप्रोरोस्कोपिक पद्धतीने केली जाऊ शकते. हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर, रुग्ण सहसा 36 ते 72 तासांत घरी जाऊ शकतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, रुग्ण शस्त्रक्रियेच्या त्याच दिवशी परततो.
शस्त्रक्रियेपूर्वी, रुग्णाला स्थानिक किंवा स्पाइनल अॅनेस्थेशिया दिला जातो, ज्यामुळे शरीराचा खालचा भाग बधीर होतो. ओपन सर्जरीमध्ये तज्ज्ञ हर्निया टाके किंवा जाळीच्या सहाय्याने दुरुस्त करतात. तर लहान छिद्र पाडून कॅमेर्याच्या सहाय्याने आधुनिक शस्त्रक्रिया केली जाते. लॅप्रोस्कोपिक हर्निया शस्त्रक्रियेनंतर रुग्ण सहसा लवकर बरा होतो.आजकाल रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारेदेखील हर्नियाची शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. यामुळे अधिक चांगले द़ृश्य मिळते आणि सर्जनसाठी ती अधिक सोयीस्कर ठरते. कोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे हे बहुतेकदा हर्नियाचा आकार, प्रकार आणि त्याचे स्थान यावर अवलंबून असते.
* गुंतागुंत नसलेले हर्निया म्हणजे जेव्हा आतडी पेरिटोनियममध्ये बाहेर येतात, परंतु अडकत नाहीत.
* अडकलेला (इन्कार्सरेटेड) हर्निया - जेव्हा आतडी कमकुवत जागेतून बाहेर येऊन तिथेच अडकते आणि पुन्हा आत जात नाही, तेव्हा त्याला अडकलेला हर्निया म्हणतात.
* स्ट्रॅन्ग्युलेटेड हर्निया तेव्हा दिसतो, जेव्हा अडकलेल्या हर्नियाला रक्तपुरवठा खंडित होतो तेव्हा यामुळे गँगरीन होऊ शकते.