मंजिरी फडके
हर्निया शस्त्रक्रियेनंतर शरीराला योग्य पोषण मिळाल्यास बरे होण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होते. अनेक रुग्ण केवळ विश्रांती आणि जखमेच्या मलमपट्टीवर लक्ष देतात; परंतु शस्त्रक्रियेनंतरचा आहार हा पेशींच्या दुरुस्तीमध्ये आणि शरीराच्या पुनर्बांधणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.
योग्य आहार घेतल्यामुळे शरीराची सूज नियंत्रित राहते आणि उतींच्या दुरुस्तीला गती मिळते, ज्यामुळे बद्धकोष्ठता किंवा पोटातील गॅसेससारख्या सामान्य समस्यांपासून सुटका मिळते. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस पचनसंस्था मंदावणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. भूल, वेदनाशामक औषधे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे आतड्यांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी, पोट जड वाटणे किंवा गॅस होणे अशा तक्रारी उद्भवतात. हर्निया दुरुस्तीनंतर पोटाच्या स्नायूंवर ताण येण्याची शक्यता असते. म्हणून पचन पूर्णपणे सामान्य होईपर्यंत मऊ आहार घेणे अत्यंत गरजेचे असते. अन्न हे शरीराचे मुख्य औषध असून प्रथिनांमुळे जखम भरून येण्यास मदत होते, तर जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
शस्त्रक्रियेनंतरच्या सुरुवातीच्या काळात पचायला हलके आणि मऊ पदार्थ निवडावेत. यामध्ये ओटमील, मऊ शिजवलेली खिचडी, दही-भात, भाज्यांचे सूप आणि कुस्करलेले बटाटे यांचा समावेश करावा. प्रथिनांसाठी अंडी, मऊ शिजवलेले चिकन, मासे, डाळी आणि पनीर हे उत्तम पर्याय आहेत. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आहारात तंतुमय पदार्थांचा (फायबर) समावेश करणे आवश्यक आहे. यासाठी पपई, शिजवलेले गाजर आणि दुधी भोपळा यांसारख्या भाज्या फायदेशीर ठरतात. तसेच पचन सुधारण्यासाठी ताक आणि घरगुती दह्याचे सेवन करावे.
दुसरीकडे, काही पदार्थ टाळणे प्रकृतीसाठी हिताचे ठरते. तळलेले पदार्थ, अतितिखट रस्सा, मांसाहार, पिझ्झा आणि बर्गर यांसारखे जड अन्न टाळावे. कारण, यामुळे पोटावर ताण येतो. कोबी, फ्लॉवर आणि शीतपेये यांमुळे शरीरात गॅस निर्माण होऊन शस्त्रक्रिया केलेल्या जागी वेदना होऊ शकतात. मैद्याचे पदार्थ आणि पाकीटबंद मिठाई बद्धकोष्ठता वाढवतात, तर अल्कोहोल आणि कॅफिनमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन बरे होण्याची प्रक्रिया लांबू शकते. किमान दोन आठवडे पथ्य पाळल्यास रुग्ण पुन्हा आत्मविश्वासाने दैनंदिन कामाला सुरुवात करू शकतो.