Heart Attack Emergency | एकटे असताना हार्ट अ‍ॅटॅक आल्यास... 
आरोग्य

Heart Attack Emergency | एकटे असताना हार्ट अ‍ॅटॅक आल्यास...

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मनोज कुंभार

हृदयविकाराचा झटका ही जागतिक स्तरावर तसेच भारतात मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक ठरत आहे. जागतिक आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू हृदयविकारामुळे होतो. अशा वेळी एखादी व्यक्ती घरी पूर्णपणे एकटी असताना तिला हृदयविकाराचा झटका आला, तर काय करावे, हा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतो.

घरच्या घरी एकटे असताना अचानक छातीत तीव्र वेदना, दाब किंवा अस्वस्थता जाणवल्यास सर्वप्रथम रुग्णवाहिकेसाठी आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. भारतात वैद्यकीय आणीबाणीसाठी ११२ किंवा १०८ या क्रमांकावर त्वरित कॉल करावा. ही पायरी सर्वात महत्त्वाची आहे. कारण, वैद्यकीय मदत लवकरात लवकर पोहोचणे अत्यंत गरजेचे असते.

आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तत्काळ घराचा मुख्य दरवाजा उघडावा किंवा त्याची कडी उघडी ठेवावी. रात्र असेल तर घरातील आणि घराबाहेरील दिवे सुरू करावेत. यामुळे रुग्णवाहिकेतील वैद्यकीय पथकाला तुमचे घर सहज ओळखता येईल. तसेच रुग्णाची प्रकृती बिघडून तो असाहाय्य किंवा बेशुद्ध झाला, तरी वैद्यकीय पथकाला घरात प्रवेश करताना अडथळा निर्माण होणार नाही. अ‍ॅटॅक येऊन गेल्यानंतर रुग्णाने शांतपणे खाली बसावे किंवा सोफ्यावर अथवा जमिनीवर झोपावे. ज्या स्थितीत श्वास घेणे सर्वात सोपे आणि आरामदायी वाटेल ती स्थिती निवडावी. पाय थोडे उंचावर ठेवून झोपल्यास बहुतांश जणांना आराम मिळतो; मात्र उभे राहणे किंवा चालणे पूर्णपणे टाळावे. कारण, चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यास डोक्याला दुखापत होऊन परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

या सर्व प्रक्रिया करत असतानाच आपल्या जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला फोन करून परिस्थितीची कल्पना द्यावी. यामुळे आपण कोणत्या रुग्णालयात जात आहोत आणि आपत्कालीन मदत पोहोचत आहे, याची माहिती जवळच्या व्यक्तींना राहते. वैद्यकीय मदत येईपर्यंत अ‍ॅस्पिरिनची (१६२ ते ३२५ मिग्रॅ) एक गोळी चावून खाण्याचा पर्यायही प्रभावी ठरतो; पण रुग्णाला अ‍ॅस्पिरिनची अ‍ॅलर्जी नसेल, शरीरातून कुठेही अंतर्गत रक्तस्राव होत नसेल किंवा डॉक्टरांनी ती घेण्यास मनाई केलेली नसेल, तर हे औषध घेणे सुरक्षित मानले जाते. आपत्कालीन प्रसंगी सतर्कता आणि योग्य नियोजनच जीव वाचवू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT